अक्षरगंध

पवईतल्या पद्मावती सोसायटीत राहणाऱ्या उमा खोलगडे. सोसायटीतल्या ज्येष्ठ बायकांसाठी त्यांनी वाचनमंडळ सुरू केलं. ज्यांना घराबाहेर पडून कार्यक्रमांना हजेरी लावता येत नाही, ज्यांना फार वेळ वाचता येत नाही अशा सगळ्यांजणींसाठी विरंगुळा म्हणून वाचनमंडळ सुरू झालं. जमायचं कुठं तर सोसायटीच्या ऑफिसमध्ये. आठवड्यातून किती वेळा तर २ वेळा, तास ते दीड तास. प्रत्येकीच्या घरी भरपूर पुस्तकं. त्यामुळे काय वाचायचं, कुणी पुस्तकं आणायची असा काही प्रश्नच नाही. वाचन व्हायचं. त्यावर चर्चा व्हायची. प्रविणा सावला या मैत्रिणीच्या घरी भेटून अनेकदा बौद्धीक खेळ खेळले जायचे.सलग १२ वर्ष हा उपक्रम सुरू होता. नंतर आला कोविड. २०२० च्या मार्चच्या शेवटी लॉकडाऊन लागलं आणि हा उपक्रम थांबला. उमाताई सांगतात, लॉकडाऊन सुरू झालं आणि आमचं वाचनमंडळ बंद झालं. हे सगळं महिना फार तर महिना दोन महिने चालू राहिल मग सगळं सुरळीत होईल असं आम्हाला वाटत होतं. पण एप्रिल संपला तरी काही कमी व्हायची चिन्हं दिसेनात. तेव्हा सोसायटीतल्याच एका तरूण मैत्रिणीने, सुमती पाटीलने ऑनलाईन वाचनमंडळाचा प्रस्ताव मांडला. उमाताई म्हणाल्या, सुमतीने सुचवलेला पर्याय चांगला होताच. पण मंडळातल्या सगळ्या ज्येष्ठ मैत्रिणी. त्यांना या सगळ्यातल्या तांत्रिक बाबी कशा जमणार हा एक मोठा प्रश्न होता. तेव्हा सुमतीनेच पुढाकार घेऊन सगळ्याजणींना झूम कसं वापरायचं, मिटिंगमध्ये हजर कसं राहायचं ते शिकवलं. आता दोन वर्षात सगळ्या जणी झूम वापरात पारंगत झाल्या आहेत. वाचनमंडळ ऑनलाईन झालं आणि १४ सभासदांवरून ही संख्या ५५-५६ वर गेली. ऑनलाईन केल्यामुळे मुंबई बरोबरच नागपूर, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, गुहागर, बेंगलोर आणि अमेरिकेतून त्यांच्या वेळेनुसार एकदोघीजणी वाचनमंडळात हजेरी लावू लागल्या. गेली जवळपास १२ वर्ष उमाताई एकट्याचं पुस्तकांचं वाचन करायच्या. गंमत म्हणजे उमाताई कुठं गेल्या की सगळ्या वाचनमंडळाला सुट्टी घ्यायच्या. उमाताई सांगतात, “मी त्यांना विचारायचे की मी काय तुमच्यावर सक्ती करते का ऐकण्याची. मग तुम्ही का सुट्टी घेता? तुम्ही वाचा. पण तरीही तू छान वाचतेस तूच वाच असं सगळ्या म्हणायच्या.” मग उमाताईंनी नियम केला की सगळ्यांनी वाचायचं. त्या म्हणतात, “माझ्यापेक्षा चांगलं वाचणारं कुणीतरी असू शकेल. सुरूवातीला वाचन करताना आत्मविश्वास नसतो काहीवेळा पण हळूहळू तो वाढतो. वाचल्याशिवाय कसं कळणार की आपण चांगलं वाचतो आहोत ते. म्हणून मग सगळ्यांनीच वाचायचं असं ठरवलं.” या वाचनमंडळाचा एक नियम आहे तो म्हणजे धार्मिक, राजकारणातलं काही यात आणायचं नाही. ललित, आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या असं काहीही चालेल. मग बऱ्याच जणी वाचनासाठी पुढे यायला लागल्या. आठवड्यातून तीन वेळा भेटायचं ठरवलं. हळूहळू तर बायकांना हे व्यसनच लागलं. अरे आज कुठला वार आहे, अजून दोन दिवस आहेत अक्षरगंधला अशी त्या वाट बघू लागल्या. या गोष्टीने मला फार आनंद दिला, असं उमाताई म्हणतात. काही बायका अगदी अंथरुणाला खिळून आहेत. त्यांचाही खूप छान रिस्पॉन्स मिळाला. एकीने सांगितलं की घरात काम करणाऱ्या बायकांही बरेचदा वाचन ऐकत असतात. आता त्यांनाही त्याची गोडी लागली आहे. त्याही काही ऐकलं की प्रश्न विचारतात, समजून घेतात. उमाताई म्हणतात, यातून सगळ्यांना वेगळं काहीतरी शिकण्यासाठी खाद्य मिळतंय म्हणून मला आनंद मिळतो. आमचं वाचनमंडळ असं १२ वर्ष सुरू होतं. पण या काळात त्याला काही नाव नव्हतं. ऑनलाईन सुरू झाल्यावर नाव द्यायचं ठरलं. सगळ्यांकडून नावं मागवली. त्यावर मतदान घेतलं आणि ‘अक्षरगंध’ वर सगळ्यांची पसंतीची मोहोर उमटली.

आता वाचनाने सगळ्या चांगल्या श्रोत्या तर झाल्या होत्याच, वाचलेल्या विषयावर चांगली मतं मांडू लागल्या होत्या. मग चांगलं वाचतोय, ऐकतोय तर लिहायचं का नाही असा एकदा प्रश्न पडला. त्यावेळी उमाताईंची बहिण निर्मला पोतनीस मदतीला आली. तिने विषय सुचवला. दिवाळीच्या सुमारास आपण दिवे लावतो तर दिवा लावतो म्हणजे काय करतो? असा विषय. म्हणजेच तुमच्या आयुष्यात असा वेगळा प्रसंग कोणता घडला का की त्यामुळे तुमच्या मनात जागृती झाली, त्या अर्थाने दिवा लागणं असा विषय घेऊन सगळ्यांनी लिहा असं तिने सुचवलं. सगळ्या म्हणायला लागल्या की असं काही मला सुचतंच नाहीये. मग ताईने सांगितलं की, जे सुचतंय, हे मी केलं, हे मला जमलं, हे मी पूर्वी केलं नव्हतं. हा एक प्रकारे दिवाच लागला आहे. तुम्ही लिहा, हे सगळं आपलंच असणार आहे. चुकलं माकलं तरी हरकत नाही. बऱ्याचजणींनी लिहिलं. तेव्हा हे हस्तलिखित करायचं ठरलं. असे जवळपास 18 लेख उमाताईंनी लिहून काढले. नंतर एका मैत्रिणीच्या घरी याचं प्रकाशन केलं गेलं.

अक्षरगंधचं सुरूवातीचं स्वरूप बदललं आणि नवंनवं बरंच काही करता येऊ शकतं असं सगळ्यांच्याच लक्षात आलं. उमाताई सांगतात, वाचन करता करताच असं एक एक आमच्या डोक्यात येत गेलं आणि आम्ही ते करत गेलो. वेगवेगळं वाचतो, ऐकतो आहोत तर विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्यांना मंचावर बोलवू आणि त्यांचे विचार ऐकू असं मनात आलं. मग दर महिन्याला एक पाहुणा बोलवायला सुरूवात केली. न्यू जर्सीहून दाताच्या डॉक्टर पूर्वा पारनाईक यांना एकदा बोलावलं. वसुधा गाडगीळ म्हणून इंदौरच्या कवयित्री आहेत. त्या कविता आणि लघुकथा लिहितात. त्यांना बोलावलं. त्या मराठी आहेत पण हिंदीत सुंदर लिहितात. गीतांजली शेरीकर, फिजिओ थेरपिस्ट गौरी शेलारला बोलावलं. नंतर गायिका योजना शिवानंद यांना बोलावलं. मोनिका गजेंद्रगडकर यांची ‘उगम’ कादंबरी संपूर्ण, सलग वाचली. ती सगळ्यांना खूप आवडली. या कादंबरीविषयी सगळ्यांचंच काहीतरी म्हणणं, काही मतं होती. शेवटी त्यांना एक प्रश्नावली दिली. त्यात कुठलं पात्र आवडलं, का आवडलं असे काही प्रश्न विचारले. त्यामुळे बायका बोलू लागल्या, लिहू लागल्या. तेव्हा वाटलं की मोनिकाताईंना ही कादंबरी लिहिताना काय वाटलं, त्यांच्या मनाशी काय होतं असं त्यांच्याशीच बोलू या. एकदा त्यांच्याशी संपर्क केला. त्याही एका झूमला आल्या. तासदीड तास त्यांनीही आमच्याशी छान चर्चा केली.

साऊथची रेवती एक ट्रान्सजेंडर स्त्री. तिचं इंग्रजीमधलं मोठं पुस्तक विद्याताई आपटे यांनी थोडक्यात मराठीत आणलं. एकदा त्या पुस्तकाचं वाचन झालं. तृतीयपंथी किंवा हिजडे म्हणून त्यांना आपण हिणवतो. त्यांचं आयुष्य कसं असतं, त्यांना कशाकशाला सामोरं जावं लागतं, सामाजिक ठिकाणी त्यांना कसा सामना करावा लागतो हे सगळं वाचलं आणि तीही कशी माणसंच आहेत, त्यांना काय सोसावं लागतं हे सगळ्यांना समजलं. पुष्कळ जणींचा त्यांच्याबद्द्लचा दृष्टीकोन बदलला. ते पुस्तक सगळ्याजणींना अगदी आतून भिडलं असं उमाताई सांगतात. ८२ वर्षांच्या एक नागपूरच्या सभासद. हे पुस्तक वाचायचं ठरलं तेव्हा हिजडे म्हणजे वाईटच असतात असाच प्रतिसाद दिला त्यांनी सुरूवातीला. नंतर पुस्तक वाचन संपलं आणि त्यांचा उमाताईंना मेसेज आला, “की ताई, माझे आज डोळे उघडले. या समाजाबद्दलचा माझा दृष्टिकोन बदलून गेला.” उमाताई म्हणतात, माणसातल्या बदलाची ही मला पहिली पायरी वाटते.

उमाताई सांगत होत्या, या पुस्तकाच्या वाचनानंतर माझी मुलगी शाल्मली एका ट्रान्सजेंडर शेल्टरला गेली होती. तिथून आल्यावर ती म्हणाली, की त्यांचं आयुष्य बघून, त्याविषयी ऐकून, बघूनच रडू आलं. त्यांच्यातलंच कुणीतरी अक्षरगंधच्या मंचावर येतील का अशी चौकशीही तिच्याकडे केली. तेव्हा तिनं अभिना आहेर या ट्रान्सजेंडर स्त्रीचं नाव सुचवलं. अभिना आली, आणि इतकं मोकळेपणाने बोलली, की ते ऐकल्यावर कसा प्रतिसाद द्यावा ते आम्हाला उमजेना. तिचं बोलणं झालं. थोडावेळ अगदी शांतता पसरली. अशा आयुष्याविषयी कसं विचारावं, काय बोलावं असा सगळ्यांनाच प्रश्न पडला. तिने त्यांचं आयुष्य उलगडूनच दाखवलं होतं. यातून अक्षरगंधच्या बायकांमध्ये समाजातल्या या घटकाविषयी एक मोकळेपणा आला. बरेचदा असं असतं की ज्येष्ठ मंडळी आपल्या मनात काही कल्पना मनात घट्ट बसलेली असतात. त्यात एखादी गोष्ट चांगलीच आणि दुसरी वाईट असं मनानीच ठरवलेलं असतं. पण त्याही वाचनातून विचारात बदल करायला तयार होत आहेत हे या उपक्रमाचं यश. वाचनाने मनाचं उन्नयन होतं ते हे असं. आपल्या ठराविक जगापलीकडे जाऊन स्त्रिया विचार करू लागल्या हे या उदाहरणातून दिसतं.

उपक्रम ऑनलाईन झाला त्यामुळे अक्षरगंधचा व्हॉटसअप ग्रुपही तयार झाला. फॉरवर्डस करायचे नाहीत असा इथला नियम. आणि हा नियम सगळ्याजणीच पाळतात. मनातलं काही बोलायचंय, वाचलंय त्याविषयी लिहायचं असेल तर त्याचं इथं स्वागतच केलं जातं. उमाताई सांगतात, “बऱ्याचजणी ज्येष्ठ नागरीक. फोन वापरताना चुकून कुठंलतरी बटण दाबलं जायचं, कुठंतरी क्लिक व्हायचं आणि मेसेज जायचे. पण आता मात्र सगळ्याजणी व्हॉटसअपही नीट वापरू लागल्या आहेत. नियम नीट फॉलो करतात.”

एकदा हेरंब कुलकर्णींचा मिळून साऱ्याजणी अंकात कोविडमध्ये विधवा झालेल्या बायकांविषयी एक लेख अक्षरगंध मंडळात वाचला गेला. या स्त्रियांसाठी आर्थिक मदतीचं आवाहन त्यात त्यांनी केलं होतं. तो लेख वाचून उमाताईंनी अक्षरगंध ग्रुपमध्ये या मदतीविषयी सुचवलं. शक्य तेवढी मदत करू असं ठरलं. रक्कम ठरली नव्हती तरीही चार दिवसात 1 लाख 43 हजार रुपये केवळ या गटाकडून जमा झाले. हे सगळं उत्स्फूर्तपणे. विद्याताईंनी तो हिशोब ठेवला होता. त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या दोन बायकाही हे सगळं ऐकत, पाहत होत्याच. त्यांनीही उत्सुकतेने हे सगळं समजून घेतलं आणि त्या दोघीही आम्ही हजार-हजार रुपये देतो म्हणाल्या. तुटपुंज्या रकमेत स्वतःचा संसार चालवूनही त्या अशी मदत करायला तयार होत्या. शेवटी विद्याताईंनीच त्यांची परिस्थिती जाणून त्यांना तुमचा विचार खूप चांगला आहे, मला ऐकून बरं वाटतंय पण इच्छा आहे तर पाच पाचशे रुपये द्या, असं सांगितलं. मग त्या दोघांनीही पैसे दिले. उमाताई म्हणतात, असे इतके छान अनुभव आले. कुणाला तरी आपण आनंद देतोय, काहीतरी चांगलं करतोय अशी भावनाही या कामामुळे मनात निर्माण होते आहे.

हस्तलिखितामुळे आत्मविश्वास वाढला होता. निर्मला पोतनीस यांनी सभासदांना नवा गृहपाठ दिला. आपापले अनुभव लिहायचे. ‘आम्ही सारे संग संग’ अशा या पुस्तकाची निर्मिती झाली. यावेळी अंक प्रिंट करायचा असं ठरलं. याच सुमारास कोविडचे निर्बंध कमी झाल्यानंतर ग्रुपच्या 20 जणींची सहल काढली ती गरजू महिलांना उद्योगधंदे सुरू करून देणाऱ्या कोल्हापुरातल्या स्वयंसिद्धा संस्थेत. तेव्हा चांगले कपडे, साड्या, ड्रेस असे नीट स्वच्छ धुवून, इस्त्री करून या बायकांना देऊ असं ठरवलं. तेव्हाही या अक्षरगंधच्या ग्रुपने खूप छान प्रतिसाद दिला. पावनखिंड रिसॉर्ट मध्ये पुस्तकाचं थाटात प्रकाशन झालं.

सगळ्या महिला वेगवेगळ्या पद्धतीने या गटात काम करत असतात. एखादं मोठं पुस्तक वाचनासाठी घेतलं जातं तेव्हा त्यातला मजकूर निवडायचं काम काहीजणी करतात. झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या मुलांवरचा लेख वाचला तेव्हा त्यांना काम करताना काय काय अडचणी येतात ते कळलं. जयंत पवार यांचा सफाई कामगारांवरचा लेख वाचला तेव्हा त्या समाजाबद्दलच्या आपल्या कल्पना कशा फोल असतात हे कळलं.

अक्षरगंधची सुरूवात वाचन करायचं या उद्देशाने झाली तरी आता विविध पुस्तकं वाचून, एकमेकींशी बोलून, चर्चा करून या सगळ्याजणी खूप मोकळ्या झाल्याचं उमाताई सांगतात. एकदा स्मशानात पौरोहित्य करणाऱ्या महिलेविषयीचं ‘गार्गी अजून जिवंत आहे’ या पुस्तकाचं वाचन झालं. यानंतर गटातल्या बऱ्याचजणी त्यांच्या आयुष्याविषयी मोकळेपणाने, काही आडपडदा न ठेवता त्या बोलल्या. त्यांना आम्ही जवळच्या वाटलो हे आमचं यश. बायका मोकळ्या झाल्या, बोलायला लागल्या, लिहू लागल्या हे या उपक्रमाचं यश.

दुसरं म्हणजे भिशी, सहली, भजन-किर्तन अशा गोष्टीसाठी महिला एकत्र येताना दिसतात. इथे त्या वाचनासाठी एकत्र आल्या, हे वेगळेपण. विशेष म्हणजे फक्त वाचन करून थांबल्या नाहीत. तर, कृतीकडे वळल्या. वाचनातून त्यांनी समाजातील विविध घटकांविषयी जाणून घेतलं. आणि जिथं मदतीची गरज होती तिथं ती करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या.

पुस्तकं कुठून आणायची किंवा कुणी विकत घ्यायची असा प्रश्न कधीच आला नसल्याचं उमाताई सांगतात. त्या म्हणतात, पवई भागात वाचनसंस्कृती चांगली आहे. त्यामुळे इथं प्रत्येकीकडेच भरपूर पुस्तकं होती. मग हे वाचूया ते वाचूया असं ठरायचं. म्हणजे कधी कमी पडलीयेत असं झालंच नाही. शिवाय नव्याने पुस्तकं घेत असायचेच लोक. आता काय वाचायचं असा कधीच प्रश्न पडला नाही. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथपेटी या उपक्रमाची बरीच मदत वाचनमंडळाला  झाल्याचंही उमाताई सांगतात.

अक्षरगंध वाचनमंडळात ३० वर्ष वयापासून ८४ वयापर्यंतच्या बायका आहेत. ५०-६० मधल्यांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे यात पुरूष सभासद अगदी एखादाच आहे. उमाताई म्हणतात, घरात बायका जेव्हा झूमवरून वाचनमंडळात असतात तेव्हा त्यांचे पतीही बाजूला बसून ऐकत असतात. फक्त ते सभासद म्हणून गटात येत नाहीत. आता सगळंच ऑफलाईन सुरू झालंय तर हे मंडळही पुन्हा ऑफलाईन होणार का असा प्रश्न पडतो. तेव्हा उमाताई सांगतात, बुधवार, शनिवार आणि रविवार असं मंडळ भरतं. वेळ पाच ते सहा असते. तेव्हा ऑफिसमधून घरी परतणाऱ्या काही जणी ट्रेनमध्ये जागा पकडत, धक्काधक्की सहन करतात पण अक्षरगंधला हजर राहतातच. शिवाय काहीजणी अगदी अंथरूणाला खिळलेल्या आहेत. त्यांच्यासाठीही हे ऑनलाईन असणं चांगलं आहे. त्यामुळेच आठवड्यातला फारतर एखादा दिवस काहीजणी जमू शकतील तर एखादा दिवस ऑफलाईन करू. पण दोन दिवस असं ऑनलाईनच चालेल.

वाचन कमी झालंय अशी ओरड ऐकू येत असते. पण त्याचं स्वरुप बदललं, त्याला काही वेगळा आयाम दिला की तेच वाचन सगळ्यांना आवडू लागतं, असं या अक्षरगंधच्या उपक्रमातून दिसतं.

– वर्षा जोशी-आठवले

Leave a Reply