३८ दिवसात १३२ बाधितांना पैसे न घेता सेवा
रोज पहाटे ब्रम्हगिरीवरच्या माकडांना काकड्या, फुटाणे, इतर खाऊ नेणं, मग आवरून कामाला सुरुवात. पीपीई किट घालून रुग्णांना तपासणीसाठी न्यायचं, ज्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल व्हायला सांगितलंय त्यांना कोविड सेंटरला न्यायचं, बरे झालेल्यांना दवाखान्यातून घरी पोहोचवणं आणि मृत रुग्णांना स्मशानात नेणं ….
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतल्या या आठवणींनी अक्षय अस्वस्थ होतो पण त्याच वेळी बरे झालेल्यांच्या नातलगांच्या शुभेच्छा आठवून त्याला समाधानही वाटतं. अक्षय नारळे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरचा. तो रुग्णवाहिका चालवतो.
कोरोनाच्या कठीण काळात त्र्यंबकेश्वरसारख्या छोटया शहरातून संपूर्ण तालुक्यातल्या बाधितांची कुठलेही पैसे न घेता ने-आण केली. ३८ दिवसात तालुक्यातील १३२ रुग्णांना रुग्णवाहिकेतून सेवा दिली. ३२ मृतदेह आणले. त्यातील २ रुग्णांवर स्वतः अंत्यसंस्कार केले. प्रादुर्भाव वाढल्यावर तर घरच्यांना त्रास नको म्हणून तो बाहेरच राहू लागला.
गेल्या वर्षी मार्च -एप्रिल या वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात जिल्हा रुग्णालयातून कॉल यायचे. रुग्णांचे नाव, पत्ता, नंबर आदी माहिती दिली जायची. ते टिपून ठेवण्यासाठी त्यानं एक रजिस्टरच केलं होतं.
”त्र्यंबक तालुका आदिवासीबहुल.” अक्षय सांगत होता. ”इथं शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धांचा पगडा. कोरोना झालेला जिवंत परत येत नाही, अशी ठाम समजूत. रुग्णाच्या घरी गेलो की तो आणि घरचे बऱ्याचदा रडायलाच लागायचे. मग त्यांना सेंटरला नेण्यापूर्वी त्यांची समजूत मी घालायचो. त्यांना बरं झाल्यावर घरी सोडण्याचा अनुभव सुखद असायचा. कधीकधी ओळखीतलेच मृतदेह नेण्याची वेळ यायची. तेव्हा मीही रडतच गाडी चालवायचो. ”
मध्यंतरी दोन महिला रुग्णांना घेऊन जाताना अक्षयच्या गाडीला समोरून येणाऱ्या भरधाव गाडीनं टक्कर दिली. त्या दोघींना किरकोळ लागलं पण अक्षयच्या हातांच्या बोटांचा चुराडा झाला. सक्तीनं विश्रांती घ्यावी लागली.
हे काम जरी आपण एकटे करत असलो तरी ‘सेवा फाऊंडेशन’सोबत असल्याचं अक्षय सांगतो . हा त्यांचा ४० जणांचा ग्रुप. पहिल्या लाटेपासूनच परिसरातल्या गोरगरिबांना आणि पशुपक्ष्यांनासुद्धा हा ग्रुप नियमितपणे अन्न पुरवत आहे. गरजूंना जीवनावश्यक वस्तू देत आहे. बाळासाहेब पाचोरकर, स्वप्नील शेलार,अंकुश परदेशी,पवन कुलथे, बंडू मालपाणी, धनंजय गुजराथी, आप्पा कदम, सुनील गायकवाड, निखिल कदम, सुनील शुक्ल, जीवन नाईकवाडी, सोमेश्वर गुंड, गुड्डू शिरसाठ, अनिल कुसवा,या साथीदारांनी मिळून कठीण काळात अनेकांना सेवा दिली आहे.

Leave a Reply