सातपुड्याच्या खडकाळ डोंगररांगांमधील आमराई
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रावलपाणी हे आदिवासीबहुल गाव. इथे राहणारा रतिलाल पावरा हा तरुण शेतकरी. रतिलालने सातपुड्यातील टेकड्यांच्या उतारावर ५०० आंब्यांची लागवड केली आहे. शेतात जायला रस्ता नाही, ना शेतात वीज, ना पाणी … तरी २०१६ पासून रतिलालने ही आंब्याची झाडं जागवली आहेत. आज या आमराईतील प्रत्येक झाड ६ ते ८ फुटांचे झाले आहे. यंदा त्यांना मोहर फुटला आणि छोट्या कैऱ्यादेखील लागल्या. येणाऱ्या काही वर्षात रतिलालच्या कुटुंबाला यातून शाश्वत उत्पन्न मिळेल आणि त्यातून त्याचा उदरनिर्वाह उत्तम होईल.
मात्र रतिलालच्या या स्वप्नपूर्तीचा संघर्ष मोठा आहे. कुठेही हिरवळ दिसत नाही अशा सातपुड्यात त्याने हिरवीगार वनराई उभी केली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने अशक्य ते शक्य करून दाखवले. २०१३ मध्ये रतिलालच्या वडिलांचे निधन झाले … कुटुंबाची जबाबदारी अंगावर आल्याने रतिलाल पारंपरिक पिकं घेऊ लागला. मग त्याने कृषी विभागाच्या मदतीने डोंगर उतारावर आंबा लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीला गावाने त्याला वेड्यात काढले. मात्र त्याने आणि त्याच्या कुटुंबाने हार पत्करली नाही. चार किलोमीटरपर्यंत रोपं खांद्यावर वाहून नेत त्यांनी आंब्यांच्या रोपांची लागवड केली. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निझरा नदीतून डिझेल पंपाने ३०० मीटरवरील शेततळ्यात पाणी आणले तिथून पुन्हा पंपाने ते पाणी फळबागेला दिले.
आता अनेक शेतकरी, जागरूक नागरिक खास आमराई पाहण्यासाठी भेट देतात.
– कावेरी परदेशी, ता. तळोदा जि .नंदुरबार.

Leave a Reply