पोटाला लॉकडाऊन कळत नाही..
“आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात चांगल काम केलं. २०१४, १५, १६ हे वर्ष पर्यटन क्षेत्रासाठी सुवर्णकाळ होतं. २०१९ पर्यंत मोठे ग्रुप प्रवास करत होते. आमचा व्यवसाय वाढला होता. २०१९ संपताना कोरोनाचं सावट सुरु झालं. त्यानंतर आमच्यासाठी लॉकडाऊन हे अचानक आलेलं संकट होतं. त्याचा पहिला फटका पर्यटन क्षेत्राला बसला. लोकांना सेवा देण्याचा टुरिझमचा आमचा व्यवसाय रात्रीतून बंद पडेल, असं कधीच वाटलं नव्हतं. लॉकडाऊन काय असतं?, हे माहित नव्हतं. मार्चमधला बँकॅाकचा टूर शेवटचा ठरला.” आनंद अशोकराव तेरकर सांगत होते.
नांदेडच्या आनंद तेरकरांचा पर्यटनाचा व्यवसाय होता. कोविड19 ची साथ आली. त्यामुळे लॉकडाऊन सुरू झालं आणि बरेचसे व्यवसाय बंद पडले. त्यातलाच एक व्यवसाय म्हणजे पर्यटनाचा. पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणारे आनंद तेरकर त्यांची गोष्ट सांगत होते.
तेरकर म्हणाले, “जिथं घराच्याच बाहेर पडू शकत नाही, तिथं देशाच्या बाहेर शक्यच नव्हतं. हे लॉकडाऊन लवकर संपेल असं शक्यही दिसत नव्हतं. पोटाला लॉकडाऊन कळत नाही. घर चालवायचं म्हणजे, जबाबदा-या असतात. नुसतं बसून करायचं काय? हा प्रश्न समोर आ वासून उभा होता. आपल्याला काही तरी केलं पाहिजे, हा विचार सतत डोक्यात येत होता. वेगवेगळया क्षेत्रातील संधी खुणावत होत्या. शेवटी फुड इंडस्ट्रीतील संधी ओळखून यात काम करायचं मी आणि पत्नीने ठरवलं. यातूच ‘आरंभ फुडस’ चा जन्म झाला. पहिल्या लॉकडाऊनमध्ये हॉटेल, पार्सल सेवाही बंद होत्या. अशावेळी आम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचलो. घरातूनच या व्यवसायाला सुरवात केली.”
‘स्वच्छ, सुरक्षित आणि घरगुती चव’ हे तेरकर यांच्या व्यवसायाचं घोषवाक्य आहे. जे मागवलं जाईल ते द्यायचं असं त्यांनी ठरवलं. सुरूवात झाली पाणीपुरीपासून. आनंद सांगतात, “आम्ही दोघांनी कामाची विभागणी केली. पत्नीने स्वयंपाकघर आणि मी बाहेरचं सांभाळायचं ठरलं. पुढे व्यवसायाचं स्वरुपही वाढत गेलं. विशेष म्हणजे यात ग्राहकांनी तुम्ही पाणीपुरी करता, मग पावभाजी का नाही करत असं विचारायला सुरूवात केली. मग, पावभाजी, पुलाव असं करत विविध पंजाबी पदार्थ असं एक एक करत सर्व सुरु केलं. आमच्याकडे मिळत नाही असं काहीच राहिलं नाही.”
तेरकर यांच्या मेनूकार्डातला एक एक पदार्थ वाढत असला तरी सुरूवातीला हे सगळं करणं अवघड होतं असं ते सांगतात. आनंद सांगत होते, “11 वर्षापासून पर्यटन क्षेत्रात रमलेला मी, मला कधी बाजारातून भाजीपालाही आणण्याचा अनुभव नव्हता. पण, आज भाजी आणण्यापासून ती कशी करायची हेही मी शिकून घेतलं आहे. पोळी सोडली तर बाकी सर्व काही मला जमतं. दरम्यानच्या काळात भाजीपालाही विकला. कुठलं काम लहान आणि मोठं हा विचार कधी केला नाही. लाजण्यापेक्षा काम महत्वाचं. लोकांना काय हवं ते सांभाळणं हेच ‘आरंभ’ च्या यशाचं गमक आहे.”
आनंद यांच्या पत्नी अस्मिता यांचा या व्यवसायात महत्त्वाचा वाटा आहे. त्या म्हणाल्या, “मी सुरवातीला एका खासगी बँकेत नोकरी करत होते. पुढे दोघांनीही एकत्र काम करायचं ठरवलं. लॉकडाऊनच्या परिस्थितीत स्वत:चा उद्योग उभारण्याचा अनुभव खूप काही शिकवून जातो. या व्यवसायात कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होतात. कुठलीही परिस्थिती कायम नसते. सुरवातीला आम्ही दोघंच काम करत होतो. आता सहा जणांच्या हाताला काम देत आहोत. इतरांनाही रोजगार देऊ शकतो, हा आनंदही वेगळाच आहे.”
– शरद काटकर, नांदेड

Leave a Reply