अंधश्रद्धा झुगारली आईने, जीवनदान मिळवलं बाळाने
अमरावती जिल्ह्यातला मेळघाट जितका निसर्गसंपन्न आहे, तेवढाच मागासही. मेळघाटात बहुसंख्य आदिवासी. भौगोलिक दुर्गमतेमुळे जगाच्या काहीसा मागेच असलेला हा भाग. मेळघाटच्या मागासपणाच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे स्थानिक आदिवासी समाजात रूजलेल्या जुन्या, मागास प्रथा-परंपरा आणि अंधश्रद्धा. शिक्षणाचे प्रमाण कमी, शहरांशी संपर्क कमी आणि अंधश्रद्धांवर गाढ विश्वास, हा क्वचित प्रसंगी जीवावरही बेततो. मेळघाटातील अश्याच एका बालकाचा या अंधश्रद्धेने बळी घेतला असता, पण त्याच्या खमक्या आईनं कुणालाही न जुमानता अंधश्रद्धा नाकारली आणि बाळाचा जीव वाचला.
वेळेआधीच प्रसूती झाल्याने कुपोषित असलेले बाळ

त्याचं झालं असं की, मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील मनभंग गावच्या लता अविनाश दहीकर या पहिल्यांदाच गर्भवती राहिल्या. गर्भवती राहिल्यापासून सरकारी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व सेवा त्यांना देण्यात आल्या. मात्र लताताईंना सातव्या महिन्यातच प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे गावातील आशा सेविकेने मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले यांना फोन केला, त्यांनी तातडीने रूग्णवाहिका पाठवली देखील! मात्र रुग्णवाहिका घरी पोहोचायच्या आतच लताताई घरीच प्रसूत झाल्या. सातव्या महिन्यात जन्माला आलेले हे बाळ, कमी दिवसांचे असल्याने त्याचे वजन फक्त चौदाशे ग्राम होते. त्यामुळे आई आणि बाळाला उपचारासाठी अचलपूरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण बाळाची नाजूक तब्येत पाहून तिथल्या डॉक्टरांनी त्यांना अमरावती येथील डफरिन रुग्णालयात रेफर केले. त्याठिकाणी बाळ आणि आई तब्बल वीस दिवस भरती होत्या, मात्र काही केल्या बाळाच्या वजनात वाढ झाली नाही, उलट दोनशे ग्रामने बालकाचे वजन कमीच झाले. त्यामुळे वैतागून दहिकर कुटुंब बाळाला घेऊन घरी आले.

इकडे मेळघाटात आरोग्य विभागाचे कर्मचारी, या बाळाची परिस्थिती पाहून एखादा बालमृत्यू होईल की काय, या विचाराने चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे बाळ घरी आल्यावर आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी ताईंनी पुन्हा एकदा बाळाचे वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करून पाहूयात, असं म्हणत परतवाडा शहरातील खाजगी बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकृष्ण घुटे यांचा सल्ला घेतला. बाळाला तपासल्यानंतर डॉक्टरांनी अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मात्र दहीकर कुटुंब बाळाला पुन्हा एकदा दवाखान्यात भरती करण्यास तयार नव्हते. अखेर डॉक्टरांनी औषधं लिहून देत काही सूचना नीट पाळण्याचा सल्ला दिला.
मात्र लताताईंच्या सासरचे दहीकर कुटुंब हे अत्यंत अंधश्रद्ध असल्याने त्यांचा बाळाला गोळ्या- औषधं देण्यात, वैद्यकीय उपचार करण्यास विरोध होता. “बाळ देवानं दिलंय ना, मग तो त्याचं काय करायचं ते बघून घेईल” किंवा मग दवाखान्यात नेण्यापेक्षा बाळाला वस्तीतला देवऋषी ‘भुमका’कडे दाखवावं, तो तंत्र- मंत्र करेल किंवा सगळ्यात जालीम उपाय म्हणजे- डम्मा, बरं नसलेल्या बाळाच्या पोटावर गरम लोखंडी विळ्याचे चटके देणं, यानं बाळं बरी होतात अशी भीषण अंधश्रद्धा आदिवासींमध्ये आहे.
आईच्या धाडसाने योग्य औषधोपचार मिळून गुटगुटीत झालेले बाळ

हे अघोरी प्रकार ऐकून लताताई घाबरून गेल्या, या उपायांनी बाळाला बरं वाटणार नाही उलट त्रासच होईल असं त्यांना जाणवायला लागलं. बाळाला वाचवायचं असेल तर डॉ. घुटे यांनी दिलेली गोळ्या- औषधंच घ्यायला हवीत हे त्यांना उमगलं. आपल्या मरणाच्या दाढेत असलेल्या लेकरासाठी सासरच्यांच्या विरोधात जात लताताईंनी घर सोडलं. सगळ्या अंधश्रद्धा झुगारून त्या माहेरी आल्या आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधं दिली, त्यांनी सांगितलेल्या इतर सूचनांचे पूर्ण पालन केले.

बाराशे ग्रॅम वजन असलेल्या त्या बाळाचे वजन आता दोन किलो सहाशे ग्रॅम झालंय. बाळ आता सुदृढ आहे आणि कुपोषित दिसत नाही. आता बाळाला घेऊन त्या सासरी परतल्या आहेत. या सगळ्यात लताताईंची विवेकबुद्धी, बंडखोरी आणि त्यांचा धाडसीपणा महत्त्वाचा आहेच, पण त्यांच्या बाळासाठी योग्य सल्ला मिळावा म्हणून धडपडणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी- मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले, डॉ ढोके, आरोग्य सेविका हीना सौदागर, प्रविणा धाकडे, अंगणवाडी सेविका शांता पाटणकर, आशा सेविका चंद्रकला इ. चे परिश्रमही आहेत.
लेखन- जयंत सोनोने अमरावती

Leave a Reply