वरवर पाहता हा नेहमीसारखाच कोट, जॅकेट वाटते. पण त्याला जोड आहे, तंत्रज्ञानाची ! त्यामुळे हा सूट घातलेली महिला सुरक्षित राहू शकते. हा सूट तयार केला आहे अंकिता रोटे या मुलीनं.
अंकिता सोलापूरमधल्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातली. सध्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षात शिकत आहे.
अंकितानं केलेल्या सूटमध्ये एक सेन्सर आहे. हा सूट घातलेल्या महिलेची कोणी छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्या महिलेच्या जवळच्या नातलगाकडे, पोलिसांकडे संदेश जातो. मोठ्याने अलार्म वाजतो. आजूबाजूचे सर्व सतर्क होऊ शकतात. सूटमध्ये एक बटन आहे. महिलेवर जर शारीरिक हल्ला झाला तर त्याला प्रतिकार म्हणून. हे बटन कार्यान्वित केलं की हल्ला करणाऱ्याला विजेचा हलका शॉक बसून तो गोंधळून जाऊ शकतो.
”आसिफा, निर्भया या घटनांनी मी व्यथित झाले.” अंकिता सांगत होती. ” शेवटी प्रत्येक महिला शारीरिकदृष्ट्या सक्षम असेलच असं नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. तंत्रज्ञानाच्या मदतीनं काय करता येईल, यावर विचार सुरू असताना मला ही कल्पना सुचली. बरेच दिवस त्यावर काम केल्यावर हा कोट तयार झाला. त्याचं प्रात्यक्षिकही मी घेतलं आहे.”
हा प्रकल्प साकारण्यासाठी अंकिताला प्राध्यापक शशिकांत हिप्परगी तसंच विभागप्रमुख डॉ. एस.एम. जगदे, प्रा. एस. एस शिरगण यांनी मार्गदर्शन केलं. प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी वेळोवेळी प्रेरणा दिल्याचं अंकिता सांगते.
या वर्षीच्या वेगवेगळ्या प्रकल्प स्पर्धेत भाग घेऊन या सूटचं सादरीकरण अंकिता करणार आहे. पुढे जाऊन याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचादेखील तिचा मानस आहे. हा सूट तयार करण्यासाठी तिला ४००० रुपये खर्च आला असून कमीतकमी किमतीत हा सूट महिलांसाठी उपलब्ध करून देण्याची इच्छा असल्याचं अंकिता सांगते.
-जवेरीया रईस, सोलापूर
Related