बोकडशक्तीवर प्रथमच वीजनिर्मिती,शेजबाभूळगावात घडत आहेत बालवैज्ञानिक
पाच हजारात घर,फोटोट्रॉन बाग,बोकडशक्तीवर वीजनिर्मिती,कंपोस्ट खताच्या खड्ड्यातून गरम पाणी,ग्रो युवर क्लासरूम,भूकंपरोधक घर,आगप्रतिबंधक झोपडी, असे वेगवेगळे संशोधन प्रकल्प. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातली अंकोलीची इनोव्हेटिव्ह स्कूल आणि शेजबाभूळगावची जिल्हा परिषद शाळा इथल्या मुलांनी गेल्या चार वर्षात हे प्रकल्प पूर्ण केले आहेत. मार्गदर्शक विज्ञानग्राममधले वैज्ञानिक अरुण देशपांडे आणि रियाझ तांबोळी व पैगंबर मनुलाल तांबोळी.
तांबोळी बंधूंचे वडीलही शिक्षक. पैगंबर तांबोळी सरांना पत्रकारिता, सामाजिक कामाची पार्श्वभूमी. जि.प मध्ये शिक्षक म्हणून त्यांनी अनेक नवोपक्रम राबवले. माळशिरस तालुक्यातील तुपेवस्ती(मेडद) ही जि.प.शाळा नावारुपाला आणली. गेली ४ वर्ष ते शेजबाभूळगावच्या शाळेत. आतापर्यंत २३ वर्षांची सेवा. त्यांची पत्नीही शिक्षिकाच.
मोहोळमध्ये बदली झाल्यावर त्यांना विज्ञानग्रामची साथ लाभली.इथं गेली ३५ वर्ष वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. सर स्वतः इथं वयाच्या पाचव्या- सहाव्या वर्षांपासून यायचे. त्यामुळे शिक्षक झाल्यानंतर अशी संधी मुलाना मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. परिसरातल्या इतर शाळांनाही सोबत घेतलं. विज्ञानग्राममध्ये देश-परदेशातील शास्त्रज्ञ,सामाजिक कार्यकर्ते,इंजिनिअरिंग,आर्किटेक्चर महावियालयांचे विद्यार्थी येतात. त्यांच्यासोबत तांबोळी बंधूंचे विद्यार्थीही शिबिरात सहभागी होतात. शेजबाभूळगाव जि.प. ची ५ वी ते ७ वीची आणि इनोव्हेटिव्ह स्कूलची ३ री ते ५ वीची मुले. विज्ञानग्राममधल्या प्रयोगांचं ती निरीक्षण करतात, त्यात सहभागी होतात आणि त्यातूनच त्यांना अनेक नवकल्पना सुचतात. पैगंबर तांबोळी सर सांगतात, ”त्या कल्पनांवर विद्यार्थी, शिक्षक, विज्ञानग्राममधले वैज्ञानिक विचार करून संशोधन करतात. काही संशोधन जगात इतरत्र कुठेतरीही झाले असते. त्यात नवीन भर घालतो. मुलांचे बरेचसे प्रयोग हे पहिलेच आहेत. बोकडशक्तीवर वीजनिर्मिती हे संशोधनही पहिल्यांदाच झाले. विज्ञानग्रामात बैलशक्तीवर वीजनिर्मिती केले जाते. ते पाहून आपल्या शाळेच्या पृथ्वीराजला बोकड किंवा शेळी गोलाकार फिरवून वीजनिर्मितीची कल्पना सुचली. ”
अभ्यासक्रमाशी संबंधित प्रयोगही सुरूच असतात. आकाशनिरिक्षण,सूर्यग्रहण,चंद्रग्रहण,वादळ,शून्य सावली दिवस,विषुववृत्तदिन,अशा विविध घटनांचा अभ्यास मुलं करतात.उघड्या डोळ्यांनी दिसणारे पाच ग्रह,२७ पैकी जवळपास १४ नक्षत्रं मुलं सहज ओळखतात.”मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं महत्त्वाचं.” सर सांगत होते. ”मुलांच्या कल्पनांचा आम्ही शिक्षक सन्मान करतो. त्यांना चुका करण्याची भरपूर संधी दिली जाते. प्रयोग करण्यातून मुलांमध्ये अनेक बदल घडतात. स्वयंअध्ययनाची सवय लागते. ताण न येत सहजशिक्षण घडते. प्रश्न विचारण्याची आणि उत्तरं शोधण्याची सवय त्यांना लागते. मात्र केवळ काही दिवस असे उपक्रम राबवून मुलं संशोधक घडत नाहीत. त्यासाठी वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न लागतात. असं झालं तर आपला देश निश्चितच मूलभूत संशोधनात प्रगती करेल. ”
प्रयोगासाठी लागणार्या वस्तू या परिसरातीलच असतात.शक्यतो मोडीत काढले गेलेले साहित्य मुलं वापरतात. त्यामुळे पर्यावरणाला नुकसान न पोहोचवता अनेक गोष्टी शक्य असल्याचं मुलांना समजतं.
पुढील काळात अनुभवातून शिक्षण या पद्धतीचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पैगंबर तांबोळी सांगतात. विज्ञान,संगीत,क्रीडा अशा माध्यमातून मुलांचा बौद्धिक,शारीरिक व मानसिक विकास व्हावा व मुलानी मुलभूत संशोधनाकडे वळावं, पर्यावरण आणि तंत्रज्ञान यातील समन्वय त्यांच्यात रुजावा, यासाठी ‘ग्रीन स्कूल‘ सारख्या नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आहे.
संतोष बोबडे,ता. मोहोळ जि. सोलापूर

Leave a Reply