१० लाखांहून अधिक ज्येष्ठ निराधारांचा आधार लोकमंगलची अन्नपूर्णा
सोलापूरमधल्या एका खेड्यात राहणारी आरती. आजारी, वृद्ध आईला घेऊन ती सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला आली होती. आईच्या उपचारासाठी काही दिवस तिथेच राहणं भाग होतं. सोबत कोणीच नाही, पैसेही फार नाहीत आणि तसं ओळखीचंही कोणी नाही, अशा स्थितीत जेवायची काय व्यवस्था करावी, हा मोठा प्रश्न तिला पडला. तेव्हाच रुग्णालयात लावलेला अन्नपूर्णा योजनेचा फलक दिसला. लोकमंगल फाउंडेशनची अन्नपूर्णा योजना.
लोकमंगलचे संस्थापक-अध्यक्ष आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून २०१३ मध्ये ८ मार्चला ही योजना सुरू झाली. ‘एक पाऊल ज्येष्ठ निराधारांसाठी’, हे संस्थेचं ब्रीदवाक्य. गेल्या ८ वर्षात १० लाखांहून अधिक ज्येष्ठ निराधारांना मोफत घरपोच जेवणाचे डबे संस्थेनं दिले. सुरुवात ६० वर्षांवरच्या ६५ व्यक्तींपासून झाली. आता दररोज ५३० ज्येष्ठ निराधारांना ५ रिक्षांद्वारे दोन वेळचा डबा घरपोच दिला जातो.
याचसोबत आता नवा उपक्रम सुरू झाला आहे. सिव्हील म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात परगावाहून उपचारासाठी येणार्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत डबे पुरवले जात आहेत. त्यासाठी रुग्णालयातच एका बोर्डवर फोन क्रमांक दिला आहे. यामुळे आरतीसारख्या अनेकांची सोय होते. सध्या रोज 50-60 डब्यांची मागणी आहे.
रुग्णासोबत आलेला उपाशी राहू नये, यासाठी हा प्रयत्न असल्याचं अन्नपूर्णा योजना विभागाच्या प्रमुख दीपाली नंदुरकर सांगतात. कोविड आणि लॉकडाऊनच्या काळातही काम अविरत सुरू राहिल्याचं त्या सांगतात. सिव्हिलसोबतच बॉईज हॉस्पिटल, चिडगुपकर आणि इतर कोविड रुग्णालयात जेवण दिलं जातं. शहरातील, दिव्यांग व गोरगरिबांना धान्य देण्यात आलं.
यासाठी १७ जण स्वयंपाक करतात. जेवणात चपाती, भात, एक भाजी, पातळ भाजी/आमटी, सुट्टीच्या दिवशी गोड. दररोज किमान १६०० चपात्या, ४० किलो भात, १५ किलो डाळ, ४५ किलो भाजी. दिवसाचा खर्च २५,००० हून अधिक. यासाठी अनेक दानशुरांची मदत झाली असल्याचं दीपाली सांगतात. आपल्या इच्छेनुसार कोणीही योजनेसाठी मदत देऊ शकतं. शहरात कोणी उपाशी राहू नये, यासाठी सुरू या उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, संचालक मंडळ आणि कर्मचारी सर्वांचेच प्रयत्न असल्याचे दीपाली सांगतात.
-जवेरिया रईस, सोलापूर

Leave a Reply