अंतरकरांच्या अळूवडीची खमंग गोष्ट
कुठलाही व्यवसाय असो किंवा नवं काही शिकणं असो या गोष्टीला वयाची अट नसते हेच खरं. सध्या 68 वय असणाऱ्या चिपळूणमधल्या अभय अंतरकर यांनी तीन वर्षांपूर्वी अळूवडीचे उकडलेले उंडे हॉटेल्सना पुरवण्याचा घरगुती छोटासा व्यवसाय सुरू केला. अंतरकर यांच्या या खमंग उद्योगाची ही गोष्ट.
अळूवडी हा आपल्याकडचा पारंपरिक पदार्थ. जवळपास प्रत्येक घरामध्ये तयार होणारा. काही हॉटेल्सही अळूवडीसाठी प्रसिद्ध आहेत. अळूवडी करत असताना अगोदर उकडून तळलेली व थेट तळण करुन खुशखुशीत खमंग केलेली असे दोन प्रकार पाहायला मिळतात. अळूवडीचा अभ्यास करुन चिपळूण शहरातील अभय अंतरकर यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अळूवडीचा व्यवसाय करायचं ठरवलं. अळूवडीचे उकडलेले उंडे हॉटेल्सना पुरवण्याचा घरगुती छोटासा व्यवसाय सुरु केला. हॉटेलचालक या उकडलेल्या अळूच्या उंड्यांच्या वड्या करुन तळण करुन विकायचे.
ग्राहकांना या अळूवड्या आवडल्या. मागणी वाढली तसं अंतरकरांनी या कामासाठी 2-3 महिला कर्मचारीही घेतल्या. काम सुरू झालं. पण, 2020च्या मार्चमध्ये कोविड-19 साथीमुळे इतर व्यवसायांप्रमाणे हॉटेल्सवर परिणाम झाला. पण आपल्याकडील कर्मचाऱ्यांचा रोजगार कायमस्वरुपी हिरावला जाऊ नये, यासाठी अभय अंतरकर यांनी अळूवडीवर संशोधन सुरु केलं. उकडलेल्या अळूवड्या जास्त काळ टिकत नाहीत. मग काय करता येईल असा विचार सुरू झाला. त्यातूनच उकडण्याऐवजी थेट तळलेली आणि दीर्घकाळ टिकणारी अळूवडी हा प्रकार खमंग स्नॅक्स त्यांनी तयार केला. भजीप्रमाणे थेट तळलेली अळूवडी हा प्रकार महाराष्ट्रात फारसा परिचित नाही.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत आणि लॉकडाऊन काळातही त्यांनी तळलेल्या अळूवडीच्या क्वालिटी कंट्रोलवर काम करत राहिल्याने त्या काळात त्यांच्या कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला नाही. आता या व्यवसायासाठी सुमारे 15 कर्मचारी त्यांच्याकडे आहेत. येत्या तीन महिन्यांच्या काळात ही संख्या दुप्पट होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागात आणि प्रसिद्ध भैरी मंदिराच्या पाठीमागे राहणारे अभय अंतरकर यांनी “कोकण गृहउद्योग” समूह निर्माण करून तळलेल्या अळूवडीची निर्मिती, पॅकेजिंग व विक्री व्यवसाय आता जम धरु लागला आहे. त्यांच्या या अळूवडी उत्पादनाला त्यांनी “अंतरकर अळूवडी” असं नाव दिलं आहे.
ही अळूवडी खमंग तळलेली असून हवाबंद प्लॅस्टीक पाकीटात येते. त्यामुळे सहा महिने अळूवडी सुरक्षित राहते, हे या अळूवडीचे वैशिष्ट्य. यासोबतच घरोघरी अळूची पाने विकण्यासाठी वणवण फिरणारे आसपासच्या गावातील विक्रेते थेट अभय अंतरकरांना अळू पाने विकतात. त्यामुळे विक्रेत्यांचा वेळ, श्रम वाचतात, शिवाय विक्रेत्यांना एकरकमी पैसे मिळतात. सुरुवातीला उकडलेल्या अळूवडीसाठी चिपळूण आणि आसपासच्या परिसरातील 10-12 शेतकरी 200 ते 300 पाने दरदिनी द्यायचे. पण कोविडनंतर सुरु केलेल्या तळलेल्या अळूवडीसाठी साधारणपणे 20-25 शेतकरी दरदिनी 500 अळूपानांपर्यंत पुरवठा करतात. सध्या अंतरकरांना 1200 ते 1500 अळूपाने दररोज लागतात. आसपासच्या शेतकऱ्यांकडून ही गरज पूर्ण होत नसल्याने सध्या त्यांना साताऱ्यावरुन अळूपाने मागवावी लागतात. बाहेरच्या मार्केटवरुन मिळणारी अळूपाने स्थानिक शेतकऱ्यांपेक्षा काही पैसे स्वस्तही मिळतात. पण स्थानिक शेतकऱ्यांच्या अळूशेतीला प्रोत्साहन म्हणून स्थानिकांच्या अळूपानांना अधिक प्राधान्य देत असल्याचं अंतरकर सांगतात.
हा व्यवसाय पूर्णपणे अळूपानांवर अवलंबून. व्यवसाय सुरू करतानाच हे लक्षात घेऊन अंतरकरांनी स्वतःच्या 30 गुंठे क्षेत्रावर अळूची लागवड केली होती. रानडुक्कर आणि घूस वगळता या पिकाला इतर गुरांकडून कसलाही धोका नाही. शिवाय कोणत्याही किडीला हे पीक बळी पडत नाही. रासायनिक खताची अजिबात गरज नाही. इतर पिकांच्या तुलनेत अळू शेती तशी कमी खर्चिक असून मुख्य पिकांसोबतच पाण्याची व्यवस्था असलेल्या, सांडपाण्याचा निचरा व्यवस्था केलेल्या ठिकाणीही अळूचं उत्पन्न घेता येतं. स्थानिक शेतकऱ्यांनी अळूची लागवड केल्यास ती अळू पाने रास्त बाजारभावाने विकत घेण्याची हमी अंतरकर घेतात. शिवाय यासाठी लागणारे बियाणे, लागवड व देखभाल मार्गदर्शन अंतरकर करतात.
अंतरकरांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 10-15 शेतकऱ्यांनी अळूची लागवड केली आहे पुढील तीन महिन्यांत प्रॉडक्टचा खप वाढणार असल्याने दरदिनी सुमारे 5000 अळूपांनांची गरज त्यांना भासणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी अळूशेती केल्यास त्यांच्या पानांच्या खरेदीची हमी व्यावसायिक म्हणून ते घ्यायला तयार आहेत, असं अंतरकर म्हणतात.
अळूचे पान, देठ तसंच कंद या तिन्हीपासून विविध पदार्थ बनवले जातात. त्यामुळे अळू शेतीत नक्कीच फायदा आहे. यासोबतच त्या कंदातून नवीन अळूची शेती करण्यासाठी बियाणं मिळतं. अळूच्या शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागत नाही. जमिनीचा सेंद्रीय कस वाढतो. या कारणांमुळे आसपासच्या विभागातून अळूची आवक वाढल्यास त्याचा फायदा जसा शेतकऱ्यांना होईल तसाच अंतरकर यांच्या व्यवसायालाही होईल असे अंतरकर सांगतात.
(अभय अंतरकर संपर्क क्रमांक – 7972005377 / 9423805050)
– तुषार गायकवाड, चिपळूण

Leave a Reply