गडचिरोलीचे युवा सेलिब्रिटी – जिह्यातल्या अपंगांची सोबतीण संगीता

जिह्यातल्या अपंगांची सोबतीण संगीता

“भावाच्या मुलाचं बारसं. सर्वजण खुशीत. घरात आलेलं इवलसं बाळ, त्याला मांडीवर घ्यायला, त्याचा पापा घ्यायला जीव आतुरलेला. पण मध्येच हलक्याशा स्वरात भाऊ उच्चारला, ‘‘संगीता, तू बाळाला हात लावू नको. माझ्या बाळालाही कोड होईल.”

त्याचं हे वाक्य ऐकलं अन् काळजात धस्स झालं………….. संगीता सांगत होती. “शरीरावरच्या पांढऱ्या डागांमुळे बालपण कोमेजून गेलेलं. ग्रामीण भाग, गैरसमजुती अधिक. रोज नव्या अडचणी यायच्या. पुढे शिक्षण घेत गेले आणि जाणवलं की आपल्यासारख्या अडचणी जाणवणाऱ्या विकलांगांना, दीनदुबळ्यांना मदत केली पाहिजे. हीच अंत:प्रेरणा आज अपंगांच्या १६ संघटना व ९६ बचतगटांना दिशा देण्यासाठी बळ देतेयं.’ संगीता तुमडे म्हणाली.

राखी (ता.जि.गडचिरोली) या छोट्याशा गावातून आलेली संगीता तुमडे. आई-वडील, सहा भावंडं असे तिचं कुटूंब. वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या अंगाला अचानक कोड फुटलं. मुळात कोडाविषयी गैरसमजुती असतातच. त्यात, हा ग्रामीण भाग.  पालकही चिंतेत पडले. उपास-तापास, नवस-सायास. ठिकठिकाणी मिळणारी औषधं असे सारे प्रयोग माझ्यावर सुरु झाले. वय वाढत होतं, तसंतसं पालकांची चिंताही. मुलीचं लग्न कसं होणार? हा प्रश्न मुख्य.  घरासमोर राहणार्‍या एका शिक्षकाने संगीताची घालमेल जाणून घेतली. तू माझ्या घरी येत जा. माझ्या मुलांशी खेळत जा. आम्हाला काहीही अडचण नाही, असे सांगत त्यांनी संगीताचा आत्मविश्वास वाढवला.  सातवीपर्यंत गावी शिक्षण घेतल्यानंतर संगीता गडचिरोली शहरात आली. इथे वसतिगृहावर राहून तिने बारावीपर्यंतचं शिक्षण तर पूर्ण केलंच. पुढे आवडीने पदव्युत्तर पदवीही मिळवली. २००३ मध्ये महिला महाविद्यालय, गडचिरोली इथून ती एमए (मराठी साहित्य) झाली.
शिक्षण तर झालं. मात्र काम नव्हतं. मग गावी परतावं लागलं.

पालकांसह तेंदूपत्ता तोडायला जायचं, रोहयोच्या कामांवर जायचं, असा दिनक्रम सुरु झाला. त्वचा पांढरी असल्याने उन्हाचा खूप त्रास व्हायचा. पण नाईलाज झालेला. व्यक्त होणंही आवडतं नसायचं. अंगावरच्या कोडाने तिचं मन दुखरं झालं होतं. ती स्वतःमध्येच मग्न असायची. याच दरम्यान तिच्या राखी गावात ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेचं बचतगटाचं काम सुरु होतं. कुंदाताई उसेंडी इथे प्रशिक्षण देत होत्या. संगीताला पाहून तू एवढं शिकली आहेस. आमच्यासोबत काम करशील का? असं त्यांनी संगीताला विचारलं. जणू काही संगीता याच दिवसाची वाट पाहतं होती. एका क्षणाचीही उसंत न घेता तिने होकार दिला.

सन २००५ मध्ये संगीताच्या जीवनात नवी पहाट उगवली. मेंढालेखा गावात पंचायत राज महिला सक्षमीकरणाचा एक प्रकल्प सुरु होता. तिच्यावर अहवाललेखनाची जबाबदारी सोपवली गेली. तिचं काम इतकं सुंदर झालं की संस्थेने तिला पंचायत राज, महिला सक्षमीकरण, बचतगट बांधणी आणि महिला संघटनेची जबाबदारी दिली. आरमोरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीत महिलांच्या बैठकी घेणं, बचतगट बांधणं, ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, मालमत्ता पती-पत्नी दोघांच्या नावावर असावी यावर देखरेख करणं, अशा कामांत तिनं झोकून दिलं.  यासोबतच मागासवर्गीय अनुदान निधीबाबत प्रशिक्षण दिलं. संगीताच्या कामाची पाहणी करायला अधिकारी आले की, तिच्याकडून शिकलेले लोक तिचं कौतुक करायचे. मात्र, अबोल संगीता अधिकार्‍यांपर्यंत ते पोचवण्यात कमी पडायची. संस्थेच्या संचालक शुभदा देशमुख यांनी संगीताला समजावून सांगितलं. हा प्रसंगाने तिच्या आयु्ष्याला नवं वळण मिळालं.

संगीता आता मनमोकळेपणाने बोलू लागली, व्यक्त होऊ लागली. तिच्या स्वभावातील या बदलामुळे तिचं काम वेगाने वाढले. संगीताच्या प्रयत्नांतून तिच्या कार्यक्षेत्रात रोहयो कामांची संख्या वाढली. यासह ग्रामपंचायतीचा दहा टक्के निधी नियमानुसार महिला आणि बालकल्याणविषयक कामांवर प्रभावीपणे खर्च होऊ लागला. शिवा,य जाईल तिथे, ती महिलांना बोलतं करण्याचा प्रयत्न करु लागली. यातून महिलांचे चांगलं संघटन उभारलं गेलं.

पुढे २००९ मध्ये संगीतावर नवी जबाबदारी आली ती अपंग व्यक्तींच्या अधिकारांची. कुरखेडा, आरमोरी हे तालुके आणि संस्थेचं कार्यक्षेत्रात या परिसरातल्या अपंग व्यक्तींचं संघटन बांधणं, त्यांची क्षमतावृध्दी करणं, त्यांचे पुनर्वसन करणं या कामांवर भर दिला गेला. संगीता सांगते, ‘अपंगांच्या  वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसनाचं काम करताना मला खूप आनंद वाटला. समाजातील दीनदुबळ्या घटकांना मदतीचा हात हवा आहे, तो आपण देऊ शकतोय, याचे समाधान वाटतं. मी गावात जायचे. अपंगांना भेटून त्यांच्यात हक्क/अधिकारांची जागृती करत असे. काही वेळा अपंग म्हणायचे “तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आलाय. आमचं काय भलं करणार तुम्ही?” अशा संभाषणाने खचून न जाता, त्यांना किमान प्रमाणपत्र तरी काढा. अपंगत्वाचं प्रमाणपत्र असल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, हे सांगत राहायचे. हळूहळू या प्रयत्नांतून संजय गांधी निराधार योजना, बस पास, रेल्वे पास, घरकुल, अपंग व्यक्तीला घरकरात सूट, विवाह प्रोत्साहन अशा अनेक योजनांचा लाभ मिळू लागला. तेव्हा अपंग स्वत:हून माहिती देऊ लागले, मदत घेण्यासाठी संपर्क करू लागले.

डॉ.सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज संगीता अपंग व्यक्तींच्या १६ संघटना व ९६ बचतगटांची धुरा सांभाळते आहे. यासोबतच पाचशे अपंगांचा शेतकरी उत्पादक गटही स्थापन करण्यात आला. या गटाची संपूर्ण कार्यकारिणी अपंग असून शेळीपालक मालूताई इसरभोयर या अध्यक्ष आहेत.
त्यांच्यासह इतर सभासद शेळीपालन, कुक्कूटपालन, नाश्ता सेंटर अशा विविध प्रकारचे व्यवसाय करतात. बचतीचं महत्व उमजल्याने हे अपंग पै-पै साठवतात. बचत म्हणजे काय, इथपासून ते उद्योगउभारणीपर्यंत आवश्यक सहकार्य संगीता करते. दिव्यांगांना वैद्यकीय सहाय्यता योजनांतून उपचार मिळावेत, यासाठीही तिची धडपड सुरु असते. विविध आजारांनी त्रस्त असलेले शेकडो अपंग या पाठपुराव्यातून चांगल्या रुग्णालयांत उपचार घेऊन ठणठणीत झालेत.

या कामांमुळे संगीताचा संपर्क एवढा वाढत गेला की जिल्ह्याभरातून अपंगांच्या काहीही अडचणी असल्या की तिला फोन येतात. असाच एक प्रसंग कुरखेडा भागातील एका आदिवासी गावात घडलेला. दीड वर्षाचा एक चिमुकला रांगता रांगता पडला. त्याला जखम झाली होती. तिथल्या एका व्यक्तीने संगीताला माहिती दिली. त्या गावात जाऊन संगीताने मुलाला पाहिले. नीट निरखून पाहिले असता या बाळाला जन्मत:च मोतीबिंदू असल्याचं तिच्या लक्षात आलं. दुर्गम भागातील पालकांना हे कळणं, तसं कठीणंच. संगीताने गावातील प्रत्येक ग्रामस्थाकडून दहा रुपये मदत गोळा करुन या निधीतून या बाळाची शस्त्रक्रिया करुन घेतली. आज दहा वर्षानंतरही या मुलाचे पालक संगीताला भेटले की, “संगीता, तुझ्यामुळे माझं पोरं आज स्वत:च्या डोळ्याने जग पाहतोय.’ असं कृतज्ञपणे सांगतात.

२०२१ मध्ये गडचिरोलीतील २२२ अपंगांना एलिम्को कंपनी, मुंबई यांनी १६ प्रकारची पूरक उपकरणं दिली. गतवर्षी ३७५ अपंगांना ही उपकरणं मिळाली. हा उपक्रम राबवला गेला तो संगीताच्या प्रयत्नांतून. बलात्काराला बळी पडलेल्या एका स्त्रीला सन २०२० मध्ये सात लाख रुपयांची मदत मनोधैर्य योजनेतून मिळवून देत, तिचं नीट पुनर्वसन होईपर्यंत संगीता पाठपुरावा करत राहिली. डिसेंबर २०२२ मध्ये
तिने १८ ते ३० वयोगटातील अपंगांसाठी दोन महिने नि:शुल्क प्रशिक्षण घेतलं. रोजगार मेळावा घेऊन ६० अपंग मुलांना पुणे, मुंबई, बंगळुरु यासह वेगवेगळ्या ठिकाणच्या कंपन्यांत रोजगार मिळवून देण्यात आला. या उपक्रमाची समन्वयक म्हणून संगीताचा विशेष गौरवही झाला.

दिवसभर विकलांगांच्या उत्थानासाठी झटणाऱ्या संगीतला कथा, कविता व भवतालच्या समस्यांवर लिखाण करायलाही आवडतं. “माझ्या कार्यक्षेत्रातील सर्व अपंग बहीण-भावांना योजनांचा लाभ मिळून ते स्वयंपूर्ण होतील, तेव्हा माझं काम कमी होईल. अपंगांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावेल, हेच माझं समाधान असेल”, अशी भावना ती व्यक्त करते.

  • अनंत वैद्य 

Leave a Reply