आमचाही टीव्ही, फोनचा वापर कमी झाला
माझा मुलगा आरोह पाच वर्षांचा. लॉकडाऊनचा काळ सगळ्या पालकांसाठी कठीण परीक्षेचा काळ होता तसा आमच्यासाठीही. आम्ही दोघंही आयटी क्षेत्रातले. त्यामुळे घरून काम चालू होतंच. सुरवातीला खूप छान वाटलं पण नंतर मुलगा, घर सांभाळून ऑफिसचं काम करणं खूपच अवघड आहे हे लक्षात आलं. या सगळ्यात घाबरून न जाता माझ्या नवऱ्याची खूपच मदत झाली. मग आम्ही दोघांनी मिळून काही गोष्टी प्लॅन केल्या.
आधीपासूनच आरोहला आम्ही फोन, टीव्हीपासून लांब ठेवलं होतं आणि आता तेच पुढेही चालू ठेवायचं यावर आमचं एकमत होतं. त्यासाठी आम्ही आधी आमचा टीव्ही, फोनचा वापर कमी केला.
आम्ही आरोहला सकाळी लवकर उठवतो. नंतर तो बाबासोबत व्यायाम करतो आणि माझी घरातली कामं होईपर्यंत दोघं वेगवेगळे खेळ खेळतात. आम्ही त्याच्या साठी भिंतींवर खूप तक्ते लावले आहेत. त्यातले काही आम्ही घरी तयार केले तर काही बाहेरून मागवले. सध्या त्याला 120 देशांचे झेंडे आणि भारतातली सगळी राज्य, त्याच्या राजधान्या आणि आता महाराष्ट्रातले जिल्हे पण पाठ आहेत.
मी आणि आरोह रोज न चुकता गोष्टी वाचतो. आमच्याकडे सध्या 150 पुस्तकं आहेत. आम्ही त्याच्या साठी मुलांची मासिकं पण घ्यायला सुरूवात केली आहे. दर महिन्याला आम्ही त्याच्यासाठी पुस्तकं ऑर्डर करतो आणि वाचतो. रोजच्या वर्तमानपत्रातील 5 शब्द आरोहला वाचायला सांगतो. त्यामुळे तो मराठी छान वाचायला लागला आहे. ज्याला जसा वेळ मिळेल तसा तो आरोहला वेळ देतो.
क्रिकेट त्याला खूप आवडतं म्हणून गॅलरीला दोरीने बॉल लावला. त्यावर रोज बराच वेळ त्याची प्रॅक्टिस चालते. आरोह आजी आजोबांसोबत कॅरम, पत्ते, सापशिडी असे बैठे खेळ खेळतो. हे सगळं करताना दमछाक होते. पण त्याच्या सोबत खेळून आमचा थकवा नाहीसा होतो.
– अर्चना देवलेकर

Leave a Reply