‘आर्ची’च्या गावातलं कोविड सेंटर
पाहावं तिकडे केळीच्या बागा आणि रस्त्याच्या बाजूला असलेली नारळाची उंच उंच झाडं. . . लांबपर्यंत दिसणारी उसाची शेती… त्यात लक्ष वेधून घेणारा आर्चीचा बंगला. असं ‘सैराट’ चित्रपटातलं दृश्य सर्वाना आठवत असेल ना? हेच ते सोलापूर जिल्ह्यातलं कंदर गाव. वस्ती साधारण पाच हजार.
करमाळा-टेंभुर्णी रस्त्यावरचं, उजनी धरणाच्या काठावर वसलेलं, जिल्ह्यात केळी उत्पादनात अग्रेसर हे गाव. ‘सैराट’च्या चित्रीकरणामुळे गावाला वेगळी ओळख मिळाली.
कोरोनालाटेत मात्र गावातल्या बाधितांना अकलूज, सोलापूर, करमाळा किंवा बार्शीला जावे लागे. तिथे उपचार मिळण्यात अडचणी येऊ लागल्या, तसं गावातच कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय गावाने घेतला.
करमाळ्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड यांनी गावाची पाहणी केली. तुम्ही पुढाकार घेतल्यास, आम्ही सहकार्य करू, असं आश्वासन दिलं. गावातील तरुणांनी लोकवर्गणी काढली. यासाठी शक्य होईल ती सर्व मदत प्रत्येकाने केली. लोकवर्गणीतून जवळपास सव्वादोन लाख रुपये जमा झाले.
कण्वमुनी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये सेंटर उभं राहिलं. २५ सामान्य बेड आणि १० ऑक्सिजन बेड. आमदार संजयमामा शिंदे यांच्या साखर कारखान्यांकडून दूध, अंडी, केळी पुरवण्यात आली. उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांची नियुक्ती केली.
सरपंच मनिषा भास्करराव भांगे, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, ग्रामविकास अधिकारी सलीम तांबोळी, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ शिंदे, पत्रकार गणेश जगताप यांच्यासह ग्रामस्थ आणि बचतगटांनी पुढाकार घेतला.
सरपंच मनिषा भांगे सांगतात, ‘’कोरोनाच्या संकटात सर्व हेवेदावे विसरून गाव एकत्र आले. त्यामुळे गावातच उपचार मिळणे शक्य झाले.’’
-विनोद चव्हाण, सोलापूर

Leave a Reply