अर्णव अब्दागिरे, वय 10. जन्मतः पूर्ण अंध. अर्णव मुळचा परभणी जिल्ह्यातील हिंगला या गावचा. गावाला जायला ना धड रस्ता ना नदी ओलांडायला पूल. वडील महिंद्राच्या नाशिकच्या प्लांटमध्ये कामाला. त्यामुळे अर्णवचं शिक्षण नाशिकमध्येच सुरु आहे. विशेष म्हणजे अर्णव अंध असूनही अंध शाळेत न जाता सर्व सामान्य मुलांच्या शाळेत जातो. त्याच्या शिक्षिका देशपांडे मॅडम यांना एक दिवस एका लघुपटाविषयी कळलं. शिवराज वायचळ यांचा हा लघुपट होता. त्यांनी शिवराज यांना अर्णवचं नाव सुचवलं. शिवराजच्या टीमने अर्णवचे काही व्हिडीओ मागवले, लघुपटातल्या पात्रासाठी तो योग्य होता. मग कोणताही अनुभव नसताना ‘अर्जुन’ या लघुपटात अर्णवची थेट मुख्य भूमिकेसाठी निवड झाली.

हा लघुपट एका अंध मुलाच्या जीवनाविषयी आहे. या मुलाला त्याच्या अपंगत्वाला कुरवाळत जीवन जगायचं नाहीये. या लघुपटाचा नायक अर्जुन आपल्या गुरूंना गुरूपौर्णिमेनिमित्त भेट द्यायची ठरवतो. त्याचा हा प्रवासच या लघुपटात उलगडला आले. यातील अर्जुन आयुष्य त्याच्या दृष्टीने बघतो. त्यामुळे एखाद्या कलाकाराला घेऊन त्याला अंध मुलाचा अभिनय करायला लावण्यापेक्षा दिग्दर्शकाने खऱ्या जीवनातील अंध कलाकार निवडायचा निर्णय घेतला. आणि अर्णवनेही हा निर्णय सार्थ ठरवला. पूर्णतः अंध असताना, कोणताही पूर्वानुभव नसताना अर्णवने अगदी तरलतेने यात अभिनय केला. अभिनय म्हणण्यापेक्षा तो जे जगतो, जे अनुभवतो, त्याला जे प्रश्न पडतात, त्याचं जे भाव विश्व आहे ते त्याने अगदी सहजपणे कॅमेरासमोर मांडलं आहे. अर्णव सांगतो की, “मी पूर्वी कधी चित्रपटाच्या सेटवर गेलो नव्हतो आणि कधी शूटिंगबद्दल ऐकलंही नव्हतं. त्यामुळेच कदाचित या सेटवर मला काही दडपण आलंच नाही. अभिनय अवघड गेला नाही. स्क्रिप्ट मी एकदा वाचली होती मग प्रत्येक सीनला शिवराज दादा मला काय बोलायचं ते सांगायचा. त्यामुळे काहीच अवघड गेलं नाही. मला या सगळ्यात खूप मजा आली.”
शिवराज म्हणतो, “अर्णवसोबत काम करताना असं वाटलंच नाही की तो फिल्मसाठी प्रथमच काम करतोय. अनुभव नसतानाही त्याने अगदी उत्तम प्रकारे काम केलं. अर्णवला शूटिंग दरम्यान कोणतीच अडचण आली नाही.” या लघुपटाला सन 2021 सालचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. एक सर्वोत्कृष्ट लघुपट तर दुसरा सर्वोत्कृष्ट अभिनय. या लघुपटात अर्णवसोबत अश्विनी गिरी व महेंद्र वाळूंज या कलाकारांनी काम केलं आहे.
– गणेश डुकरे, परभणी
Related