कर्तबगार अश्विनी
नाशिक शहरातील पवननगरात राहणारी अश्विनी जाधव. कोविडची दुसरी लाट येण्यापूर्वी ती ब्लाऊज वगैरे शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावत होती. पण लॉकडाऊन सुरू झालं आणि तिचं शिवणकाम कमी झालं. घरखर्चाला अश्विनीकडून हातभार मिळत होता. आता आर्थिक गणित बिघडायला लागलं. कायमच काहीतरी काम करणाऱ्या अश्विनीला असं रिकामं बसायची सवय नाही. त्यातूनही तिची चिडचिड होऊ लागली. शेवटी एक दिवस तिने पतीला मी रिक्षा चालवायला घेऊ का? असं विचारलं. पतीने हसतमुखाने तिला होकार दिला.
अश्विनीचे पती गॅस एजन्सीत नोकरी करतात. मालेगावजवळचं रावळगाव हे तिचं सासर. अधूनमधून या गावी असतानाच अश्विनी रिक्षा चालवायला शिकली होती. त्याचाच आता तिला उपयोग झाला. आता पवननगर, सिडको ते सीबीएस, पंचवटी शहरातील अशा निरनिराळ्या उपनगरात प्रवासी घेऊन अश्विनीची रिक्षा वेगाने धावू लागली आहे. कोविड रुग्णसंख्येचा उच्चांक होता तेव्हाही अश्विनी मास्क, सॅनिटायझरसह स्वतःची काळजी घेत कोविड रुग्णांना दवाखान्यात, बरे झालेल्यांना दवाखान्यातून घरी आणण्याचं काम आत्मविश्वासाने आणि संवेदनशीलतेने करत होती. ती म्हणते, “आपल्यात आत्मविश्वास असेल आणि हेतू प्रामाणिक असेल तर आपल्या प्रयत्नांना देवाचीही साथ लाभते.”
अश्विनीचं 2009 साली लग्न झालं. तिला एक मुलगा, एक मुलगी असून ते चौथी आणि सहावीत शिक्षण घेत आहेत. लग्नानंतर अश्विनीने शिवणकामास सुरवात केली. कंपनीसाठी ती ग्लोव्हज शिवून द्यायची. काही काळ मेसमध्ये पोळ्याही लाटल्या. चार वर्षांपासून ती घरीच शिवणकाम करत होती. रिक्षा चालवायची आवड असल्याने पैसे साठवून रिक्षा घेतली. परवानाही मिळवला. याआधी कुणाचे फोन आले तर ती तेवढी ट्रीप करून द्यायची. इतर वेळी घरकाम आणि मुलांची जबाबदारी सांभाळून शिवणकाम चालू असायचं. आता मात्र ती पूर्णवेळ रिक्षा चालवण्याचं काम करते आहे. तिला पाहताच लोक भरभरून प्रतिक्रिया देतात. शुभेच्छा देतात. आमचा प्रवास सुरक्षित हाती आहे अशी भावनाही व्यक्त करतात. यामुळेच कामाला आणखी हुरूप येतो असं अश्विनी सांगते. एक ट्रीप झाली की अश्विनी घरी जाऊन मुलांची चौकशी करते. त्यांना हवंनको बघते आणि पुन्हा दुसऱ्या ट्रीपला सज्ज होते. आता अश्विनीला दोन पैसे व्यवस्थित मिळू लागले आहेत. कामाचं समाधान मिळत आहे. थोडक्यात सांगायचं तर तिची गाडी आता व्यवस्थित ट्रॅकवर धावते आहे.
– भाग्यश्री मुळे, नाशिक

Leave a Reply