तंत्रस्नेही होण्याला पर्याय नाही

ll गावासाठी शाळा शाळेसाठी गाव ll

महाराष्ट्राच्या तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक समुहाचे बी बी पाटील सर गेल्या ३ वर्षांपासून मुख्य प्रशिक्षक आहेत. माध्यमिक शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनाचं तंत्र जमलं पाहिजे, हे ते जाणून होते. त्यांच्या सहकारी शिक्षकांना ऑनलाईन अध्यापन करण्याबाबत काहीशी भीती होती. प्राथमिक शिक्षकांची तंत्रज्ञानाबाबत बरीच प्रशिक्षणं आयोजित केली जातात, पण माध्यमिक शिक्षक मात्र अभ्यासक्रम जास्त अवघड असल्याच्या कारणाखाली ऑनलाईन अध्यापन शिकायला फारसे उत्सुक नसतात. मात्र करोनाने माध्यमिक शिक्षकांसमोर तंत्रस्नेही होण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाही. त्यामुळे, पाटील सरांनी ते मुख्याध्यापक असलेल्या पी.एस. तोडकर हायस्कूल, वाकरे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या शाळेतल्या शिक्षकांसाठी तंत्रज्ञान प्रशिक्षण लॉकडाऊन सुरू झाल्याझाल्या सुरू केलं. ही शाळा आठवी ते दहावीची आहे. पटसंख्या १५०.


एससीईआरटीकडून ‘शाळा बंद,पण शिक्षण चालू’ ठेवण्यासाठी ऑनलाईन अभ्यास पाठविण्याची तयारी सुरू झाली होती. तो मुलांकडून करून घेण्यासाठी शिक्षकांनी तंत्रस्नेही होणं गरजेचंच होतं. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून प्रत्येकी पाच इच्छुक शिक्षकांची निवड करून व्हॉटसअॅप ग्रुप सुरू केला. २ एप्रिलपासून मायक्रोसॉफ्ट टीम्स अपद्वारे प्रशिक्षण सुरू करत . जूनपर्यंत माध्यमिक, प्राथमिक, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक अशा साडेसातहजार शिक्षकांना तंत्रस्नेही करण्याचा प्रयत्न केला.


व्हॉटसअॅप ग्रुप कसा तयार करावा, तो अॅडमिन ओन्ली कसा ठेवावा, झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरून अध्यापन कसं करावं, पीडीएफ कशा तयार कराव्यात, गुगलवरून तुमच्या इयत्तेशी संबधित अभ्यासक्रम, पूरक बाबी कशा शोधाव्यात, यापासून ते गुगलच्या भाषांतर, व्हॉईस टायपिंग, गुगल क्लासरूम, गुगल ड्राईव्ह या सेवा कशा वापराव्यात, यू ट्यूब व्हिडिओज कसे करावेत, यू ट्यूब चॅनल कसं सुरू करावं, ते जास्तीत मुलांपर्यंत पोचण्यासाठी काय करावं, दीक्षा अॅपचा कसा फायदा घेता येईल, जगभरातील विद्यापीठांशी अभ्यासाशी कसं जोडलं जाता येतं, हे सगळं प्रशिक्षणात होतं.
या प्रशिक्षणांतर बहुतेक शिक्षक ऑनलाईन अध्यापनात पारंगत झाले. पुण्यातील सासवडच्या मंगला कोकरे यांना यू ट्यूब चॅनल काढताच महिन्याभरात २३ हजार सदस्य मिळाले, कोल्हापुरातील चंदगडच्या प्रशांत मगदूम सर यांचही यू ट्यूब चॅनल गाजतंय. पाटील सरांची स्वत:ची टेक्नोसॅव्ही टीचर्स सेकंडरी आणि बी.बी. पाटील अशी दोन यू ट्यूब चॅनल्स आहेत. शिवाय हिंदी आणि इतिहास या त्यांच्या विषयांची दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 10th Hindi TSTS, 10th History TSTS ही अॅप्सही सुरू केली. अनेक शिक्षकांना ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर’ हा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सरांनी प्रोत्साहन दिलं. २५ जणांनी तर या अभ्यासक्रमाची उच्च पातळीही पूर्ण केली.
जूनमध्ये, शाळा सुरू होण्याआधीच दहावीसाठी प्रत्येक विषयाच्या अभ्यासाला पूरक स्मार्ट पीडीएफ तयार केल्या. सुमारे ६० टक्के मुलांकडे स्मार्टफोन होते, इतर ठिकाणी परिसरनिहाय गट करून शेजारी-मित्र-नातलग यांचे स्मार्टफोन वापरायला सांगितलं आणि १५ जूनपासून मायक्रोसॉफ्ट टीम्सवरून दहावीचे नियमित तास सुरू केले. आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांकडे गृहभेटीतून मार्गदर्शन, स्वाध्यायमालेच्या पीडीएफ झेरॉक्स देणं. गुगल फॉर्मद्वारे नियमित सरावचाचण्या. विशेष म्हणजे, शाळेबाहेरच्या १० हजार मुलांनीसुद्धा त्या चाचण्या सोडवल्या आहेत. यथावकाश आठवी- नववीचेही वर्ग सुरू झाले.
या शिवाय ‘लोकल ते ग्लोबल व्हाया लॉकडाऊन’ या पाटील सरांनी आयोजलेल्या उपक्रमात जगभरातल्या १२ देशांतील शाळांच्या विद्यार्थ्यांशी तोडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यात अमेरिका, इंग्लंड, रशिया, युरोप, ब्राझील, युरोप, अर्जेंटिना इ. वेगवेगळ्या देशातील शाळांना स्काईपवरून विनंती पाठवली आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सवरून त्यांच्याशी विद्यार्थी बोलले. मुलं सफाईदारपणे इंग्लिश बोलत होती. दुसरा देश, त्यांची शिक्षणव्यवस्था, अभ्यासक्रम, करोनाची परिस्थिती हे बोलण्याचे विषय. आपली मुलं जगातल्या वेगळ्याच टोकावर असलेल्या देशांतल्या मुलांशी बोलू शकतात हे पाहून त्यांचे पालक चकित आणि खुषही झाले. लॉकडाऊनने हे संधींचं दार उघडलं.
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर

बी बी पाटील, मुख्याध्यापक, पी एस तोडकर हायस्कूल, वाकरे ता करवीर जि कोल्हापूर

Leave a Reply