बापमाणूस
”मी गरीब शेतकरी कुटुंबातला. संघर्ष करत मोठा झालो. वडील गेल्यावरची हतबलता अनुभवली आहे, त्यामुळेच अनाथ मुलींची जबाबदारी उचलत आहे. ”नितीन हासे सांगत होते.
नितीन संगमनेर तालुक्यातल्या राजापूरचे. मोठ्या कष्टानं त्यांनी ‘सह्याद्री ॲग्रोवेट’ उद्योग उभारला आहे. आपल्यासारखा संघर्ष कोणाच्या वाट्याला येऊ नये या भावनेनं नेहमी इतरांना मदत करणारे. कोरोना काळात अनेक शेतकरी घरातल्या कर्ता पुरुषाचा मृत्यू होऊन कुटुंबाची वाताहत झाली. असाच एक प्रसंग संगमनेरमधल्या एका गावात घडला. कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर पत्नी घर सोडून निघून गेली. घरी वृद्ध आजोबा आणि पाच वर्षांची छकुली. नितीन यांना हा प्रसंग कळला. ते व्यथित झाले. १८ वर्षांपर्यंत मुलीचं पालनपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
एवढ्यावरच ते थांबले नाहीत. दीडदोन वर्षात कोरोनामुळे आईवडिलांचा मृत्यू झालेल्या १० वर्षांच्या आतल्या १४ मुली त्यांनी दत्तक घेतल्या. नगर, नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली अशा वेगवेगळ्या भागातील या मुली आहेत.
सह्याद्री ॲग्रोवेटच्या माध्यमातून राज्यभर कर्मचारी काम करत आहेत. अनाथ मुलींबाबत माहिती मिळाल्यावर कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन सबंधिताची माहिती घेतात. खरंच त्यांना गरज आहे का? अनाथ असतील तरी त्यांना इतर आधार आहे का? घरच्या परिस्थितीची खात्री केल्यानंतर पालन-पोषणाची जबाबदारी घेतली जाते. स्वखर्चातून ते ही जबाबदारी पार पाडत आहेत. यासाठी साधारण महिन्याला २५ हजार रुपये सध्या ते खर्च करत आहेत. १०० अनाथ मुलींच्या पालनपोषणाचा संकल्प त्यांनी केला आहे.
कोरोनामुळे अनेक कुटुंबं उध्वस्त झाली आहेत. त्यांना आधार देण्याची गरज आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून परिस्थितीनुसार काम करत असल्याचं नितीन सांगतात.
-सूर्यकांत नेटके, ता. संगमनेर जि. अहमदनगर

Leave a Reply