बहुआयामी ओळखं सांगणारं माझं नाशिक
कुंभनगरी ही नाशिकची देशाच्या नकाशावरची ओळख. नाशिकच्या वाईनचा लौकिक जगभरात पसरलेला असल्यामुळे नाशिकला वाईन कॅपिटलचा असंही म्हटलं जातंच. आरोग्य विद्यापीठ, मुक्त विद्यापीठासह वेगवेगळ्या विद्याशाखेची अद्ययावत महाविद्यालये, प्रयोगशील शाळा यामुळे एज्युकेशन हब म्हणूनही पुण्यानंतर नाशिक सर्वांसमोर येतं. खाद्य संस्कृतीसाठी नाशिकची मिसळ तर सांस्कृतिक कार्यक्रमात नाशिकचा ढोल याचा नाद काही वेगळाच. नाशिकची अशी बहुआयामी ओळख समोर येत असताना माझ्या नजरेतलं, मी पूर्वी पाहिलेलं आणि आताचं नाशिक मला वेगळं भासतं.
मध्यवर्ती नाशिकपासून काहीशा अंतरावर असलेल्या सिडको परिसरात माझं लहानपण गेलं. शासकीय योजनेत अल्पदरात उपलब्ध झालेल्या घरांपैकी पाचव्या स्कीममधलं एक घरं माझं. चौकाच्या मुख्य रस्त्यावर. त्यावेळी घरासमोर तत्कालीन नगरसेवक अण्णा पाटील यांची लांबवर पसरलेली द्राक्षाची बाग. तिथून पुढे कोठावळेंची शेती, बाजूला लवाटेंचा पेरूचा मळा. तर एका टोकाला नाईकांचे दत्त मंदिर अशा हिरव्यागार परिसरात आम्ही राहत होतो. तेव्हाचा मुख्य चौक म्हणजे त्रिमुर्ती चौक. काही आणायचं तर या चौकात आमची पायी जत्रा निघायची. किराणा-भाजीपाला काही अडलं, नडलं तर कपड्याची दुकाने, दवाखाना, सोनाराची दुकाने, दवाखाने, मेडिकल सारं काही अवतीभवती. इथून जवळच शाळा आणि त्यापुढे कॉलेज. यामुळे या पलिकडे नाशिक शहर असेल हे तेव्हा माहिती नव्हतंच. आजुबाजुला मोरवाडी, उंटवाडी ही गावठाणं होती. आम्ही सिडकोत राहतो असे अभिमानाने सांगायचो. कारण इथे आमची गॅंग होती. तशी मोठ्यांचीही. सर्वधर्म समभाव आम्ही इथंच शिकलो. दिवाळी, ईद, ख्रिसमस, दांडिया कुठल्याच सण उत्सवाचं इथं वाकडं नव्हतं. सगळे उत्साहात यामध्ये सहभागी व्हायचे. कालिकेची यात्रा तर सर्वांचा विक पॉईंट. पायी, बसने यात्रेत पोहचायचे. मनपसंद खरेदी करत खाण्यावर हात मारायचा हा वार्षिक दिनक्रम होता.
दर उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत बाबा घरी आले की आम्ही बसने गावात यायचो म्हणजे गोदाकाकाठचा परिसर. इथं यायची कारणं दोन – मनपसंत खरेदी आणि गोदाकाठावर पाण्यात खेळायचे. काठावरील मंदिरांना आई भेट द्यायची. आम्ही मेनरोडवरची कपड्याची, किरकोळ खरेदीची दुकाने, हातगाडे साऱ्यांना भेटी देऊन गोदाकाठावर नाही तर शिवाजी उद्यानात खेळायला तयार असायचो. बस थांब्यावरील गर्व्हमेंट गर्ल्स हायस्कुल, बिटको शाळेविषयी अप्रुप असायचं. या शाळेतल्या मुलांना कसं छान बसने जा ये करता येते. यांची ‘ऐट निराळी बुवा!’ ही सल आजही मनात आहे. त्यावेळी गोदापात्र विस्तीर्ण, खोल होतं. दोन पायऱ्या खाली उतरलं तरी आजूबाजूचे लोकं ओरडायला लागायचे, पोरांकडे लक्ष द्या.. आता हे सारं चित्र बदललं आहे.
घराजवळची द्राक्षाची शेती गेली. एकत्र कुटुंब असलेले पाटलांचे घरही विखुरलं गेलं. त्यांच्या मळ्यातील घरे जाऊन टुमदार बंगला आला. आजूबाजूला सदनिका, शाळा, व्यापारी संकुले आली. लव्हाट्याचा पेरू मळा गायब होऊन आशिया खंडातील सर्वात मोठा मॉल असलेला सिटी सेंटर मॉल त्या ठिकाणी दिमाखात उभा आहे. या रस्त्यावर कॉलेजच्या मुला मुलींची धुमस्टाईल पाहण्यासारखी असते. या गर्दीत नाईकांचे दत्त मंदिर मागे पडले. अगदी आता आता त्या ठिकाणी पाच मजली इमारती तयार झाल्या. घरासमोरची हिरवाई नजरेआड होत असताना त्रिमुर्ती चौकातही व्यापारी संकुले दिमाखात उभी राहिली. चित्रपटगृह आले. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे वडापाव, मिसळ, भेळभत्ता अशी वेगवेगळी दुकाने आली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालं. गावठाणाने कात टाकली. मातीची घरे आता सिमेंटची झाली. त्रिमुर्ती चौकात नगरसेवकाच्या हट्टासाठी चौक ते सिटी सेंटर मॉल असा उड्डाणपूल आता तयार होत आहे. वास्तविक या पुलामुळे सिडकोचे दोन भाग होतील. पूर्वी आम्ही गंमतीने म्हणायचो, खालच्या पट्टातील- वरच्या पट्टातील. ती विभागणी या मॉलमुळे होईल. या रस्त्यावरील झाडांची कत्तल होईल. हे सारं नकोसं वाटतं. या गर्दीत हक्काची असणारी कालिका यात्राही आता आता औपचारिकता पार केल्यासाठी भरवली जाते. रहाट पाळणे, खाण्याच्या गाड्या पूर्वीपेक्षा जास्त असल्या तरी या साऱ्यात कुठेतरी कृत्रिमपणा जाणवतो. कामाच्या गर्दीत विरंगुळा वाटणारा गोदाकाठही आता सिमेंट-क्रॉक्रीटीकरणात अडकला आहे. कुंभमेळ्यात काठ बांधण्याच्या प्रयत्नात नदीचे मूळ स्त्रोत सिमेंट खाली दाबले गेले. पात्राची सखोलता, विर्स्तीणता कमी करण्यात आली. आता गोदाकाठवर सिमेंटचे ओटे नजरेत खुपतात.
इथला बुधवारचा भाजीबाजार मात्र आजही आपली ओळख टिकवून आहे. काठावर उन्हाळ्यात मिळणारी पॉट आईस्क्रीम खाण्यासाठी आजही माझा मोर्चा त्या ठिकाणी वळतो. तसा रंगपंचमीच्या रहाडी करता, रामनवमीला निघणाऱ्या रथयात्रेसाठी वळतो. नाशिक खऱ्या अर्थाने बदलत आहे. लालपरीची जागा आता सिटीलिंक बसने घेतली आहे. या साऱ्या बदलाची साक्षीदार मला होता. काही बदल नक्कीच चांगले आहेत, त्याचा आनंद वाटतो.
– प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply