बालदिनानिमित्त निश्चय करूया, मुलांसाठी पाणवठे सुरक्षित करण्याचा !

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातली लालवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. याच शाळेत सावन शिकतो. सावन ११ वर्षांचा. लालवाडी गावातल्याच  रामदास बारवाल यांचा मुलगा. गोष्ट साधारण दीड महिन्यांपूर्वीची म्हणजे २९ सप्टेंबरची. संध्याकाळची वेळ होती. सावन घरी अभ्यास करत होता. तोच त्याची बहीण भाग्यश्री धावतच आली. भाग्यश्री आणि शेजारची चौथीतली गौरी विहिरीवर पाणी आणायला गेल्या होत्या. विहीर ३५ फूट खोल आणि खडकाळ. विहिरीला पाणीही भरपूर. पाणी भरताना गौरीचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. ती बुडू लागली.

भाग्यश्रीनं जोरजोरात आरडाओरडा केला, पण आजूबाजूला कोणी नव्हतं. मग तिनं लगेच घराकडे धाव घेतली. सावनला सांगितलं. कोणताही विचार न करता सावनने विहीर गाठली आणि पाण्यात उडी मारली. त्यानं गौरीच्या ड्रेसला पकडून विहिरीतला पाईप आणि मोटारीला धरून गौरीला विहिरीच्या कडेला आणलं. तोपर्यंत ही बातमी हा हा म्हणता गावात पसरली.गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत विहिरीच्या कडेला असलेल्या गौरी आणि सावनला बाहेर काढलं. भाग्यश्री आणि सावनमुळे गौरीचा जीव वाचला. सावनच्या धाडसाचं कौतुक करण्यासाठी लालवाडी ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. यावेळी बदनापूरचे गटशिक्षणाधिकारी नारायण कुमावत, शिक्षण विस्ताराधिकारी क्षीरसागर, केंद्रप्रमुख तथा दाभाडी बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी देशमुख, सरपंच सुनील घोरपडे, मुख्याध्यापिका एम. यू. पाटोळे, सहशिक्षिका डी. एम. जोंधळे उपस्थित होते.
बदनापूर तहसीलचे तहसीलदार मुंडलोड यांनी सावनला  बोलावून त्याचा सत्कार केला.बदनापूरच्या गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनीही  सावन आणि त्याच्या आई- वडिलांचा कार्यालयात सत्कार केला.  त्याला एक पुस्तक आणि  रोख रक्कम भेट दिली. 
सावनच्या धाडसाची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी(प्राथमिक) कैलास दातखिळ आणि  उपशिक्षणाधिकारी बाळू खरात यांनी त्याच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी पाठवण्याच्या सूचना देत तत्परतेने पाठवलादेखील !

महाराष्ट्राच्या मातीला शौर्याची आणि धैर्याची परंपरा आहे. वीर बापू गायधनी यांचा पाठ वर्गात शिकवला जातो.  खेडोपाडी वाड्या-वस्त्यावर असे अनेक वीर बापू गायधनी आहेत, जे जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचविण्यात तत्पर आहेत. बालदिनानिमित्त या सर्वांच्या शौर्याला नवी उमेदचा सलाम !
मूल पाणी आणायला गेलं आणि पाणवठ्यात पडून जीव धोक्यात आल्याच्या दुर्घटना आपण वर्षानुवर्षे ऐकत आहोत. पाणी आणण्यासाठी मुलांना जीव धोक्यात घालावा लागू नये यासाठी ठोस कृती आपण कधी करणार? घरोघरी नळाने,सुरक्षितरित्या पाणी पोहोचेल, मुलांच्या दृष्टीने  पाणवठे सुरक्षित व्हावेत यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.

-अनंत साळी

Leave a Reply