बालकांचं भविष्य बेचिराख करणारं युद्ध
युद्धामुळं बालकं फक्त निर्वासित होतात असं नाही तर त्यातली काही युद्धाची बळीही ठरतात. युद्ध काळातल्या स्फोटात, गोळीबारात मुले, मुली बळी पडतात. निर्वासित अवस्थेत होणारी उपासमार, रोगराई हेही त्यांच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरतात. युध्दाच्या गदारोळात मुलं हरवतात, काही अनाथाश्रमाची वाट धरतात, तर काही मुलं, मुली लैंगिक शोषणाचे बळी ठरतात. यातून जी काही सुखरूप वाचून आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहचतात, त्यांच्या जीवनातील कोवळीक संपून गेलेली असते. त्यांचं हसणं, खेळणं मावळून गेलेलं असतं. अनेकांना मानसिक धक्का बसलेला असतो.
युद्ध जेवढी वित्त व जिवित हानी करतं त्याहीपेक्षा अधिक माणसाची मनं ते उध्वस्त करतं. युद्ध आणि त्यामागच्या राजकारणाशी यत्किंचितही संबंध नसतो अशा स्त्रिया, बालके व वृद्ध यांच्या भावविश्वाच्या चिरफाळ्या युद्ध उडवित असतं. तान्ही बाळं, शाळेत जाणारी, बागेत बागडणारी छोटी मुलं यांचं खेळकर आयुष्यं हे युद्ध एकदम अंध:कारमय करून टाकतं. सध्या चालू असलेल्या युक्रेन युद्धात लाखो निर्वासितांच्या गर्दीत आईच्या कडेवर असलेली बालकं, आसपासच्या विध्वंसाची भीती डोळ्यात घेऊन वावरणारी छोटी मुलं, मुली पाहिली की गलबलून येतंच, पण अशा युद्धापासून या मुलांना वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार सतत मनात येत राहतो. पण युद्ध हे निर्दय असतं. त्याला मुलं, असहाय स्त्रिया, वृद्ध यांच्याशी काहीच देणंघेणं नसतं.
मोठी माणसं अशा युद्धाची बळी ठरत असली तरी अशा युद्धांची कारणं त्यांना माहीत असतात, युद्धाचे परिणाम भोगण्याची त्यांच्या मनाची तयारी झालेली असते. पण मुलांच्या जीवनात मात्र अचानक बदल होतो. निरागसपणे खेळणारी मुलं अचानक प्रौढ होतात. निर्धास्तपणे आईवडिलांच्या अंगाखांद्यावर खेळणारी मुलं पोरकी होतात.
संयुक्त राष्ट्रांच्या बालकनिधी संघटनेनं (युनिसेफ) केलेल्या एका पाहणीत असं आढळून आलं की, युद्धामुळे निर्वासित होणाऱ्या लोकांमध्ये निम्मी संख्या १८ वर्षांखालील बालकांची असते. म्हणजे युक्रेनच्या सध्याच्या युद्धात दहा लाख लोक निर्वासित झाले असतील तर त्यात पाच लाख लोकसंख्या १८ वर्षांखालील बालकांची आहे. युक्रेनमध्ये गेल्या आठ वर्षांपासून संघर्ष चालू आहे, त्याचं आता युद्धात रुपांतर झालं आहे. पण गेल्या आठ वर्षांत मुलं लष्करी हल्ल्यांच्या सावटाखाली शाळेत जात होती. युद्धस्थितीमुळे पाणी, वीज व अन्य नागरी सुविधांमध्ये सतत खंड पडत होता, त्याचा फटका मुलांना मोठ्या प्रमाणात बसत होता. यातच कोविडच्या साथीमुळे नागरिकांबरोबर मुलांचं आरोग्यही धोक्यात आलं होतं.
युद्धामुळे या मुलांच्या शिक्षणात एक तर खंड पडतो किंवा त्यांचं शिक्षणच बंद पडतं. अनेक मुलांना बालमजूर म्हणून काम करावं लागतं. तर काही मुलींवर लहान वयातच देहविक्रीची सक्ती केली जाते.
जी बालकं युद्धकाळात जन्मतात, त्यांना तर जन्मताच युद्धाची झळ बसते. २०१८ ते २०२० या दोन वर्षांच्या काळात २ लाख ९० हजार ते ३ लाख ४० हजार इतकी बालकं निर्वासित अवस्थेत जन्मली असावीत असा युनिसेफचा अंदाज आहे. या काळात ८ लाख २४ हजार लोक निर्वासित झाले. त्यात साडेतीन लाख १८ वर्षाखालील मुले, मुली होत्या.
२०१० ते २०२० या दहा वर्षांच्या काळात ४५ लष्करी संघर्ष झाले. त्याचा फटका एक लाख ७० हजार मुलांना बसला. युनिसेफचे तत्कालीन कार्यकारी संचालक हेन्रिटा फोरे यांचं म्हणणं आहे की, हे संघर्ष दीर्घकाळ चालणारे व रक्तरंजित होते व त्यात मोठ्या प्रमाणात मुलांचे बळी गेले. युद्धातील हिंसाचारापासून मुलांना वगळावे असा अलिखित संकेत असताना मुलांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत होते. २०१८ साली युनिसेफने प्रत्यक्ष पुरावे जमवून २४ हजार मुले युद्ध अत्याचारांचे व हिंसाचाराचे बळी ठरल्याचे स्पष्ट केले आहे. यात मुलांना ठार करणे, अपंग करणे, लैंगिक अत्याचार, अपहरण, मानवी हक्क नाकारणे, मुलांना लढण्याची सक्ती करणे, शाळांवर व इस्पितळांवर हल्ले करणे आदी युद्ध गुन्ह्यांचा समावेश आहे. २०१० साली घडलेल्या अशाच गुन्ह्यांच्या अडीचपट हे आकडे आहेत. २०१८ साली जगात विविध ठिकाणी झालेल्या लष्करी संघर्षातील हवाईहल्ले, भूसुरुंग स्फोट, बॉम्बफेक, क्षेपणास्त्र हल्ले, तोफांचा मारा, क्लस्टर बॉम्बचे स्फोट यात १२ हजार मुले अपंग झाली किंवा ठार झाली.
युनिसेफने गेल्या २० वर्षांच्या काळात युद्धांमुळे ३ कोटी ३० लाख मुलांना घरादाराला मुकावं लागल्याची नोंद केली आहे. यातील १ कोटी १८ लाख मुलं निर्वासित झाली, १३ लाख मुलांना परदेशांत आश्रय घ्यावा लागला, तर २ कोटी ४ लाख मुलांना त्यांच्या देशातच घरादाराला मुकावं लागलं. या खेरीज नैसर्गिक आपत्तीमुळे २९ लाख मुलांना निराधार व्हावे लागले ते वेगळेच.
युनिसेफचं म्हणणं आहे की, जगातील निर्वासितांच्या एकूण संख्येत प्रौढांपेक्षा मुलांचीच संख्या अधिक आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांशपेक्षा थोडी कमी संख्या मुलांची आहे. पण जगातील निर्वासितांच्या एकूण संख्येत निम्मी संख्या मुलांची आहे. सध्या निर्वासित मुलांत ३ पैकी एक मुलगा परदेशात निर्वासित झाला आहे. प्रौढांमध्ये हे प्रमाण २० मागे १ असे आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण ५७ लाख पॅलेस्टिनी निर्वासित झाले आहेत व त्यांनी जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, गाझा व वेस्टबँक येथे आश्रय घेतला आहे, त्यात निम्मी तरी मुले असावीत असा अंदाज आहे.
युद्धाच्या परिणामांपासून मुलांना वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व राष्ट्रांनी काही हालचाल करणे आवश्यक आहे. विशेषत: संयुक्त राष्ट्रांच्या पाच कायम सदस्यांनी याबाबत काही निर्बंध स्वत:वर घालून घेणे आवश्यक आहे. कारण जगातल्या बहुतेक लष्करी संघर्षात दुरान्वयाने का होईना पण या राष्ट्रांचा संबंध असतो. युद्ध सुरू करणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध लादण्याची पद्धत आहे, तशाच प्रकारचे निर्बंध युद्धात बालकांच्या मानवाधिकारांची पायमल्ली करणाऱ्यांवर लादले जाणे आवश्यक आहे. दोन देशांमध्ये युद्ध झाल्यास बालकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित मार्ग आखणे, त्यांना सुरक्षित निवारा मिळणे, त्यांचा त्यांच्या पालकांबरोबर राहण्याचा हक्क मान्य करणे व निर्वासित अवस्थेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली एक आचारसंहिता आखली जाणे आवश्यक आहे. जगात युद्ध टाळण्याचे सतत प्रयत्न करूनही युद्ध टळत नाहीत, पण या युद्धांमध्ये निरपराध बालकांची ससेहोलपट होणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ते दिले नाही तर जगाचे भवितव्य अंध:कारमय होऊन जाईल.
– दिवाकर देशपांडे

Leave a Reply