अन् पूजाचे सैन्य भरतीत जाण्याचे स्वप्न साकारले…

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा गाव. या छोट्याशा गावात राहणारी पूजा गंगाधर भूसलवाड. पूजाचं पहिली ते चौथी पर्यंतचं शिक्षण बरबडा जिल्हा परिषद शाळेत झाले. पाचवी ते 12 पर्यंतचं शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा इथंच पूर्ण केलं. 12 वीला तिने विज्ञान शाखेत चांगल्या प्रकारे यश संपादन करून पुढील शिक्षण याच महाविद्यालयात कला शाखेची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी घेतली आहे.

शिक्षण सुरू असतानाच 2018 साली तिने भारतीय सैन्य दलात भरती व्हायचं ठरवलं. पूजाचे तसे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी तिने नांदेड इथल्या एका खासगी अकॅडमीत प्रवेश घेतला. गट चर्चा, सामूहिक पद्धतीने तिने अभ्यास सुरू केला. सैन्यात भरती व्हायचं तर शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची. त्यामुळे दररोज 1200 मीटर धावत मैदानी सराव केला. सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेत यश मिळविलं. 2019 मध्ये पुण्यात झालेल्या मैदानी चाचणीतही ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर नागपूरला मेडिकल झाल्यानंतर आसाम रायफल्सपदी निवड झाली.

यासाठी तिला आई-वडलांचा पाठिंबा होता. प्रत्येक वेळी ते तिच्या सोबत असायचे, असं पूजा सांगते. स्पर्धेच्या युगात वावरत असताना आपल्यातील असलेला आत्मविश्‍वास कधीच गमावू नका व स्वतःला कधीच कमी समजू व सर्वानी विज्ञानवादी विचाराची कास धरावी, असं पूजा म्हणते.

छोट्या गावात राहून, शिकून आपलं स्वप्न पूर्ण करता येतं हे पूजाने दाखवून दिलं आहे.

– शरद काटकर, नांदेड

Leave a Reply