दिवाळी म्हणजे मुलींचा सन्मान
”प्रत्येक मुलगी लक्ष्मी आहे, तिचा सन्मान झाला पाहिजे. समानता, मुलामुलींमध्ये परस्परांविषयी आदर,स्नेहभाव, वृद्धिंगत व्हावा,” या पद्धतीनं आम्ही दिवाळी साजरी करतो. बालग्रामचे संतोष गर्जे सांगत होते.
बालग्राम, बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरात पालख्या डोंगरापाशी आहे. इथे संतोष आणि त्यांची पत्नी प्रीती अनाथ, ऊसतोड कामगारांच्या मुलांचा सांभाळ करतात. २००४ मध्ये सात मुलांचा सांभाळ करत त्यांनी आश्रम सुरू केला. परिस्थितीमुळे सुरुवातीची वर्ष आश्रमात दिवाळी नव्हतीच. मात्र लोकांनी केलेल्या मदतीमुळे इथंही २०१० पासून दिवाळी साजरी होऊ लागली. इथल्या मुलांनी तेव्हा पहिल्यांदाच फराळ पाहिला. लोकांच्या मदतीतून फराळ, दिवे, कपडे मुलांसाठी येतं.
दिवाळी नियमित साजरी होऊ लागली. या सगळ्या वस्तूंसोबत मुलांना दिवाळीचा खरा अर्थही समजला पाहिजे, असं संतोष आणि प्रीती यांना वाटलं.
त्यांनी लक्ष्मीपूजनाला प्रकल्पातील मुलींचं पूजन सुरू केलं. प्रकल्पात ११५ मुलं, त्यात ४७ मुली. संचालक म्हणून संतोष सर्व मुलींना या दिवशी औक्षण करतात. घरात, समाजात मुलींचं स्थान महत्त्वाचं आहे, हे सांगण्यासाठी पूजन. तर शनिवारी भाऊबीज साजरी झाली. मुलींनी प्रकल्पातल्या ६४ मुलांचं औक्षण केलं. मुलींच्या संरक्षणासाठी, सन्मानासाठी आपण कायम सजग असलं पाहिजे,हा संदेश मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाऊबीज.
प्रकल्पात चार गायी आहेत. मुलांना प्राण्यांविषयी प्रेम वाटावं, यासाठी बलिप्रतिपदेला गायींचं पूजन. गेल्या तीन वर्षांपासून आश्रमात दिवाळी या पद्धतीनं साजरी होत आहे.
– दिनेश लिंबेकर, बीड

Leave a Reply