१० वर्षांच्या आर्यननं सुरू केली आयटी कंपनी
बीडमधला १० वर्षांचा आर्यन कुटे. शाळा सुटली की तो आईसोबत कंपनीत जात असे. आर्यन बीडच्या तिरूमला उद्योग समुहाचे प्रमुख सुरेश आणि अर्चना कुटे यांचा मुलगा.
आई जशी कायम कामात असते, मिटिंग घेते, कंपनी सांभाळते तसंच आपणही करावं, आपलीही कंपनी असावी,असं आर्यनला वाटू लागलं. त्यानं आपली कल्पना आईबाबांसमोर मांडली. आर्यनला गेम तयार करण्याची आवड होती. खरं तर अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून गेम खेळायला आर्यनच्या आईबाबांचा गेम खेळायला विरोध होता. पण हळूहळू आईबाबांच्या लक्षात आलं, आर्यनसाठी गेम म्हणजे फक्त टाईमपास नाही. या क्षेत्रातून त्याला व्यवसाय उभा करायचा आहे.
अडीच वर्षांपूर्वी आईबाबांच्या मदतीनं त्यानं पुण्यात ओ.ए.ओ इंडिया ही आयटी कंपनी सुरू केली. सुरुवातीला कंपनीच्या माध्यमातून कृष्णा माखन मस्ती आणि इंडियन फ़ूड बाश हे गेम काढले. त्यानंतर यंदा आर्यनने आईसह दसऱ्याला बीडमधूनच राईज ऑफ वॉर या तिसऱ्या गेमचा प्रारंभ केला. हा गेम तयार करण्यासाठी त्याला एक वर्ष लागलं.
लहान असो व मोठा धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनात प्रत्येकाला काही क्षण हलक्याफुलक्या मनोरंजनाची गरज असते. थोड्या वेळासाठी लोकांना टेंशन विसरायला लावणं, या गेमचा उद्देश हाच असल्याचं आर्यन सांगतो. आईबाबा, आजी,राधाकाकू यांच्यासह संपूर्ण कुटे ग्रुपचं सहकार्य लाभल्याचं तो सांगतो.
”मुलांना ज्या गोष्टीची आवड आहे, त्यात करिअर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं मत कुटे ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना कुटे यांनी यावेळी व्यक्त केलं. कुटे ग्रुपचे संस्थापक आणि आधारस्तंभ ज्ञानोबाराव कुटे यांनी दाखवलेला मार्ग आमच्यासाठी आदर्श असल्याचं त्या म्हणाल्या.
– दिनेश लिंबेकर ,बीड

Leave a Reply