पोस्ट वाचण्याआधी सोबतचे फोटो पाहा. तसे तर आपण अनेक प्रकारचे दागिने बघतो. पण हे दागिने खास आहेत. कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची, जुनी ओळख पुसून नवी ताकद, नवी उमेद देण्याची ताकद यात आहे.
नाशिकमधला भद्रकाली परिसर. लॉकडाऊनच्या काळात या परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं. उत्पन्नाचं कुठलंच साधन उरलं नाही. पडेल ती कामं करत पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या महिला करत होत्या. पण देहविक्रय करणारी महिला ही ओळख आड येत होती.
प्रवरा मेडिकल ट्रस्टनं त्यांच्यासाठी पुढाकार घेतला. महिलांना दागिने तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. नवरात्रीत भद्रकाली कलेक्शन या नावानं त्यांनी हे दागिने नाशिककरांसमोर आणले. अभिनेत्री अनिता दाते यांच्या हस्ते ऑनलाईन उपक्रमाचं उदघाटन झालं. अवघ्या पाच महिन्यात १० हजारांहून अधिक किमतींच्या दागिन्यांची विक्री झाली.
दागिन्यांना बाजारपेठ मिळावी, यासाठी शहरातल्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. वस्तीतल्या आठ महिला सध्या दागिने तयार करत असून यामध्ये गुंतवलेलं १० हजार रुपयांचं भांडवल सोडवत व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करत आहेत, असं संस्थेच्या आसावरी देशपांडे यांनी सांगितलं.
– प्राची उन्मेष, नाशिक