नाशिकच्या रानडे यांची कमाल, ग्रंथ तुमच्या दारी
जगात वास्तव्य कुठेही असलं तरी काहींना वाचनाची भूक मात्र स्वस्थ बसू देत नाही.  महाराष्ट्र असो की महाराष्ट्राबाहेर जगातलं कुठलंही ठिकाण, मराठी माणसाची वाचनाची भूक थेट त्याच्या दारापर्यंत पोहोचून  पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या माणसाची ही गोष्ट. या माणसाचं नाव विनायक रानडे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष. कुसुमाग्रज स्मारकाची ‘ ग्रंथ तुमच्या दारी’ संकल्पना त्यांनी अटकेपार पोहोचवली. या संकल्पनेअंतर्गत ‘ग्रंथपेटीचा उपक्रम.   १२  वर्ष, २०००  हून अधिक ग्रंथपेट्या आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी सव्वादोन कोटींहून अधिक किमतीची एक लाखांहून अधिक  ग्रंथसंपदा, ३५ हजारांपेक्षा अधिक वाचक.
रानडे यांचा प्रिंटिंगचा व्यवसाय. वर्ष २००४ च्या सुमाराला त्यांच्या गाडीला अपघात झाला. जवळपास दीड वर्ष ते अंथरुणाला खिळून होते. मृत्यू त्यांनी जवळून पाहिला. हानी झाली नाही असा एकही अवयव नव्हता. या अपघातानं जीवनाकडे पाहण्याची वेगळीच दृष्टी दिली.  पैसा येतो आणि जातो. पण समाधान दुसऱ्याला देण्यातून मिळतं आणि हा आनंद कधी संपत नाही.  आपल्याला मिळालेलं जीवनदान यापुढे समाजासाठी उपयोगात आणण्याचं त्यांनी ठरवलं. रानडे सांगतात,  ”पुस्तके हे समाज बदलण्याचे साधन आहे यावर माझी श्रध्दा आहे. त्यामुळे  वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी काम करण्याचं ठरवलं.”
व्यवसायामुळे रानडे यांचा दांडगा जनसंपर्क होता. कुसुमाग्रजांचे स्मारक उभे राहत असताना समृद्ध  वाचनायल उभे रहावे अशी व्यवस्थापकीय मंडळातल्या सर्वांचीच इच्छा होती. रानडे यांनी जोडलेल्या मित्रांपैकी अमेरिकेतल्या अनिल देशपांडे यांनी ५ लाख रुपये पाठवले. त्यातून पुस्तकांची खरेदी झाली. अन्य ठिकाणी आवाहन करत १५ दिवसांत पाच लाख जमा केले . त्यातून फर्निचरचा खर्च निघाला. लोकांनी संस्थेच्या वाचनालयासाठी पैसा दिला आहे, समारंभासाठी नाही, या ठाम विचारातून समारंभाचा खर्च टाळला. संस्थेला दिलेली देणगी पुस्तकांसाठीच वापरली जावी आपल्यावर संस्थेचा एकही रुपया खर्चला जाऊ नये, ही विनायक यांची ठाम भूमिका. मात्र आपले संबंध वापरले गेले पाहिजेत, हीसुध्दा इच्छा. त्यामुळे त्यांनी ५०० मित्रांकडून ५०० रुपयांची अपेक्षा व्यक्त केली. त्यातून अडीच  लाख रुपये उभे झाले. तेवढी पुस्तके आली. पण, आलेली पुस्तकांची थप्पी वाचनालयात तशीच वाढत गेली. एका कोप-यात असलेल्या वाचनालयात शहरातल्या अन्य भागांतून वाचकांना येणे शक्य नव्हते.
वाचकांना घरपोच पुस्तकं देण्याची, त्यासाठी वेगळी यंत्रणा राबवण्याची गरज भासू लागली. त्यातून  ग्रंथपेटीची संकल्पना सुचली.
एक पुस्तक ५० जण वाचतात असं गृहित धरून  १०० पुस्तकांची एक पेटी तयार करायची आणि ती ठिकठिकाणच्या वाचकगटापर्यंत पोहोचवायची.  त्यासाठी देणगीदार शोधले. २० हजार रुपये देणगी मिळवायची. त्या पेटीवर त्यांचं नाव टाकायचं.  पेटीत सर्व अभिरुचींची मिळून १०० पुस्तके.   
उपक्रमात  इच्छुक वाचकप्रेमी  मिळून साधारणतः ३५ जणांचा गट करतात.  ग्रंथपेटीची मागणी करतात.   त्या ३५ जणांपैकी एका समन्वयकाकडे ही पेटी पोहचवली जाते. त्यावेळी एक लेखी करार केला जातो. या पेटीतून पुस्तके वाचण्यासाठी नेणा-याकडून पैसे घेतले जाणार नाहीत, कुसुमाग्रज प्रतिष्ठानही कोणत्याही प्रकारच्या पैशांची मागणी करणार नाही. एका पेटीची मुदत चार महिने. त्यानंतर ती बदलते जाते.   पेटी बदलताना गहाळ झालेल्या पुस्तकांची विक्री किंमत रोखीत भरावी लागेल. हे नियम ठरलेले.  हा सगळा व्याप रानडे आपली  दैंनदिन कामे पूर्ण करून करतात.
 आठवड्यातले तीन दिवस ते स्वतः या ग्रंथपेट्या वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रवास करतात. स्वतःचा पैसा खर्च करत त्यांनी  या उपक्रमाला वाहून घेतलं आहे.  रानडे  या उपक्रमाच्या विस्तारासाठी  समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करतात. सुरुवातीला  परगावी पेट्या पोहचवणे कठीण जायचं.  या कामात पुस्तकांवर प्रेम असणा-या त्यांच्या मित्रांची मदत झाली.
या उपक्रमाचा देशात आणि देशाबाहेर विस्तार झाला आहे .  गोवा , गुजरात, दिल्ली , सिल्वासा , तामिळनाडू ,  कर्नाटक अशा देशातल्या विविध ठिकाणांबरोबरच दुबई , नेदरलँड , टोकियो , अटलांटा , स्वित्झरलॅन्ड , ऑस्ट्रेलिया , फिनलँड , वॉशिंग्टन  , मॉरिशस , ओमान , मस्कत ,  सॅनफ्रान्सिस्को , बे एरिया , सिंगापूर , लंडन , श्रीलंका  . . .अशा विविध ठिकाणी उपक्रम पोहोचला. त्याचसोबत अगदी आपल्या शहरातल्या जिल्हा रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना,रुग्णांना आनंद मिळावा, वेदना विसरता यावी यासाठी जिल्हा रुग्णालयापर्यंतही हा उपक्रम त्यांनी पोहोचवला.
आता तर त्यांनी ‘ जुनी पुस्तकं द्या आणि बदलून इतर पुस्तकं घ्या ‘ असाही उपक्रम सुरू  केला आहे. घराघरांत पडून असलेली पुस्तकं इतरांसाठी उपयोगाची ठरू शकतात.  यात जवळपास वीस हजार पुस्तकांची अदलाबदल आजवर झाली आहे. ”जिथे म्हणून मराठी शब्द ,मराठी भाषा आहे ,मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी आमची  इच्छा   आहे.” रानडे सांगतात.
एखादी संकल्पना मांडणे, तिचा पाठपुरावा करणे आणि त्याच्या विस्तारासाठी सतत प्रयत्नशील  राहणे ही सोपी गोष्ट नाही. रानडे यांनी ग्रथंपेट्या पोहचवण्यासाठी जगभर जवळपास साडेचार लाख किलोमिटरचा प्रवास स्वखर्चानं केलाय. विनायक रानडे यांनी हे सहजपणे साध्य केलेय. जिथे म्हणून मराठी शब्द, मराठी भाषा आहे, मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी आमची इच्छा असल्याचं रानडे नमूद करतात. वाचनसंस्कृती जपणारा.. त्याच्या प्रसारासाठी जगभर फिरणा-या या अवलियाने कारागृहातल्या कैद्यांनाही पुस्तकपेट्या पोहचवल्या आहेत. मराठी भाषेवर प्रेम असणारा हा ग्रंथवेडा माणूस म्हणूनच कौतुकास पात्र आहे.
-भाग्यश्री मुळे ,नाशिक

Leave a Reply