‘बाई, डागक्तर हात लावतुया म्हंजी हीला काई कोरुना झाला न्हाई बगा, चला आपुण हिला आंघुळ घालू अन् साडी बी नेसवू’. महिनाभरापूर्वी सखुबाईंना हात लावायला घाबरणा-या शेजारी बायांनी असं म्हणत त्यांना नीटनेटके केलं. कारण, डॉक्टरांनी त्यांना तपासलं होतं. पिंपरनई (ता.बीड) येथील ८० वर्षांच्या सखूबाई वायभट आणि त्यांच्यासारख्या हजारो गरिबांच्या मदतीला धावला ‘भाकरीचा दवाखाना’!
बीडमधल्या ‘जिओ जिंदगी’ ग्रुपच्या पुढाकारातून कोरोनाच्या दुस-या लाटेत ग्रामीण भागात ‘भाकरीचा दवाखाना’ सुरु झाला. आज बीड, शिरुर, वडवणी, धारुर या तालुक्यांतील ६० गावात हा दवाखाना पोहचला आहे.१८-२० डॉक्टर, ४००-५०० स्वयंसेवकांनी एप्रिल, मे पासून हजारो रुग्णांवर गावात जाऊन उपचार केले आहेत.
उपक्रमाचे समन्वयक धनंजय गुंदेकर म्हणतात, “२०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत कडक लाॅकडाऊनमुळे शहरात अनेकांची उपासमार होत होती. आम्ही गावातील नागरिकांना शहरातील गरीबांसाठी ‘भाकरी द्या’ असं आवाहन केलं अन् रोज एका गावातून भाकरी शहरात येऊ लागल्या. पाच लाखांहून अधिक भाकरी आम्ही या काळात वाटल्या.”
समन्वयक भास्कर ढवळे सांगत होते, “मार्च २०२१ अखेरीस पुन्हा लाॅकडाऊन लागू झाले. यावेळी संसर्ग झपाट्याने होत होता. ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. गावात आरोग्य सुविधांचा अभाव, गैरसमज यातून अंगावर आजारपण काढून लोक गंभीर होत. कोरोनाच्या धास्तीने लोक दवाखान्यात जात नसत. गावांची स्थिती बिकट होत होती. या संकटात गावांना मदतीची गरज असल्याचं जाणवलं अन् मागील वर्षी ज्या गावांनी भाकरी दिल्या त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून फिरता दवाखाना सुरू केला. त्याचं नाव म्हणजे, ‘भाकरीचा दवाखाना’.”
भागवत तावरे म्हणाले, “भाकरी दिलेल्या गावांत जाऊन आरोग्य तपासणी सुरू केली गेली. १ मे रोजी पहिला मोफत तपासणीचा उपक्रम सुरु केला. हजारो रूग्णांना याचा फायदा झाला. भाकरीच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे”. अजमेर मनियार यांनी सांगितलं, “या फिरत्या दवाखान्यांच्या मदतीसाठी नागरिकही पुढे आले. उपचारांसाठी सुमारे ५ते ८ लाखांची औषधे लोकांनी दिली.”
आज भाकरीचा दवाखाना ग्रामीण भागात मोठा आधार ठरतो आहे. दिवसागणिक डॉक्टर, दाते, स्वयंसेवक आणि नवी गावं यात जोडली जात आहेत.
– अमोल मुळे, बीड
Related