फलकचित्रांचा असाही गौरव

प्रत्येक दिवसाला इतिहासात काहीतरी विशेष घडलेलं असतंच. हे दिनविशेष केवळ दिनदर्शिकेपुरते मर्यादित न राहता त्याविषयी जाहीर जनजागृती करण्याचा विडा नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील कलाशिक्षक भारत पवार यांनी उचलला आहे. त्याची ही गोष्ट.

देवळा एज्युकेशन संस्थेचे जिजामाता कन्या विद्यालय हे सटाणा नाशिक रस्त्याला लागून आहे. शालेय परिसरात इथं दिवसभर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. इथल्या दर्शनी भागातील फलकावर कलाशिक्षक भारत पवार रोजच्या दिनविशेषाला, तसंच सण-उत्सवाला अनुसरून खडूच्या सहाय्याने चित्रं रेखाटतात. दिवसभरात अनेक लोक ही चित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियाद्वारे शेअर करतात. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, शिक्षकदिन, पोळा, रक्षाबंधन, नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला तर या फळ्यांवरची चित्रकला कमालीची बहरते आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्याच मनाला भुरळ घालते.
या फलकचित्रांना कला विषयातील प्रसिद्ध लेखक आणि कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश जगताप यांच्या कला अध्यापन इंग्रजी आणि मराठी माध्यमातील ए.टी.डी.,ए.एम. जी.डी.आर्ट या कलेतील उच्चशिक्षण कोर्सच्या पुस्तकात भारत पवार यांनी रेखाटलेली फलक चित्रे छापण्यात आली आहेत. जे. जे. आर्ट बुक सिरीजचे हे २८ वे पुस्तक आहे. ‘आर्ट एक्स्प्रेशन’ या नावाने ते पुण्यात प्रकाशित झालं आहे.

भारत पवार यांचं शिक्षण ए. टी. डी. व आर्ट मास्टर, कला निकेतन नाशिक इथं झालं असून देवळा एज्युकेशन सोसायटीमध्ये कलाशिक्षक म्हणून तेरा वर्षापासून कार्यरत आहेत. प्रत्येक दिनविशेषला केवळ तोंडी माहिती देण्यापेक्षा त्या त्या दिनाचे वैशिष्ट्य असलेल्या व्यक्तीचं, घटनेचं चित्र काढून मुलांना त्याची सचित्र माहिती द्यावी या हेतूने हा फलक चित्र उपक्रम सुरू केल्याचे पवार यांनी सांगितले. सुरवातीला सहज काढत गेलेल्या फलक चित्रांना हळूहळू चांगला प्रतिसाद मिळत गेला. विद्यार्थी, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि कर्मचारी यांच्याकडून कौतुक होऊ लागलं. त्यातून नवनवीन कल्पना सुचत गेल्या.

भारत पवार यांनी या फलक चित्रांची आतापर्यंत लहान-मोठी बारा चित्रप्रदर्शने भरविली आहेत. खडू-फळा जणूकाही त्यांचा कॅनव्हासच. काळ्या रंगाचा वापरातून अतिशय अभ्यासपूर्ण चित्र रेखाटून अक्षर लेखन किंवा व्यक्तींची चित्रे असो त्या फलकावर जणू काही कोरूनच काढतात. नाशिक जिल्ह्यात खडूचे चित्रकार म्हणूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. भारत पवार यांनी आतापर्यंत अनेक निसर्ग चित्रं, व्यक्तिचित्रं रेखाटलेली आहेत. स्केचिंग हा त्यांचा आवडता विषय. दैनंदिन स्केचिंग करणे हा नित्यनेम असल्यामुळे खऱ्या अर्थाने कला जिवंत राहते.

– भाग्यश्री मुळे, नाशिक

Leave a Reply