संसार जोडण्याचा ‘भरोसा’
सीमा आणि नितीन..लग्नाला अवघी दोन वर्षे झालेली. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले पण नंतर दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद सुरू झाले. सीमा माहेरी राहायला आली. प्रकरण संसार मोडण्यापर्यंत गेलं. अखेर, भरोसा सेलकडे आलं. सुरुवातीला दोघांना एकेकटं बोलावून एकमेकांविषयीची मतं आणि वादाचे मुद्दे कर्मचाऱ्यांनी समजून घेतले. तिच्या मोबाईल वापरण्यावरून दोघात भांडण होई. गैरसमज वाढतच गेले होते. पण भरोसा सेलने ते दूर केले. नितीन-सीमाचा संसार पुन्हा एकत्र नांदू लागले.
अशी सुमारे साडेतीनशे जोडपी जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्यांच्या काळात भरोसा सेलकडे मदत मागण्यासाठी आली. यापैकी ७५ जणांचा संसार सुरळीत करण्यात सेलला यश आलं. काही प्रकरणात अजून समुपदेशन सुरू आहे तर सुमारे २०० प्रकरणं पोलीस ठाण्यांकडे पाठवली गेली.
भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मनिषा लटपटे म्हणतात, किरकोळ कारणांवरून पतीपत्नीमधील वाद टोकाला जातात. संवादाचा अभाव असतो. यातून गैरसमज निर्माण होऊन ते वाढत जातात. कधी सासूसुनांच्या वादातूनही संसार मोडण्याच्या स्थितीपर्यंत येतो. शिवाय, मोबाईल हेसुद्धा पतीपत्नीच्या भांडणातील एक कारण ठरत असल्याचं निरीक्षण आहे. केवळ सामान्यच नाही तर उच्चशिक्षित जोडप्यांमध्येही भांडणं होतात. भरोसा सेल त्यांच्यातील गैरसमज दूर करून त्यांना वाट दाखवणारा दुवा आहे.
सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल म्हेत्रे म्हणतात, एखादा संसार जोडल्यावर जेवढा आनंद त्या जोडप्याला होताे तेवढाच आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना होतो. येणाऱ्या प्रत्येक तक्रारीत संसार जोडला जावा अशीच आमची भूमिका असते. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करताे. यात कधी यश येते तर कधी अपयश. कोविड काळातही आम्ही योग्य ती काळजी घेऊन काम सुरू ठेवलं.
पोलीस नाईक रेखा गोरे म्हणाल्या, आमच्याकडे प्रकरण आल्यानंतर आम्ही दोघांच्या बाजू समजून घेतो. वादाचा मुद्दा कसा निकाली काढता येईल त्यासाठी समुपदेशन करतो. शिवाय, संसार मोडला तर मुलांची स्थिती कशी होईल, समोर काय अडचणी असू शकतात आणि भांडणाचा मुद्दा किती गौण आहे या बाबी जोडप्यांना सांगतो.
पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनिषा लटपटे, सहायक उपनिरीक्षक अनिल म्हेत्रे, रेखा गोरे, अनिता खरमाटे, दिपाली सावंत, कल्पना चव्हाण भरोसा सेलची जबाबदारी उत्तमप्रकारे निभावत आहेत.
– अमोल मुळे, बीड

Leave a Reply