भरोसा सेलवर आहे भरोसा
“मँडम… मला आता हिला घरी न्यायचंच नाही. मला घटस्फोट मिळवून द्या.”
“अरे पण का…? तुझा मुलगा अपंग आहे म्हणून का?”
“नाही, मला मुलाचा काहीच प्रॉब्लेम नाही. परंतू ही माझ्या घरच्यांसोबत नीट बोलत नाही, सतत फोनवर बोलत असते. घरात कामसुद्धा करत नाही, यामुळे आमची सतत भांडणं होत असतात. मी फक्त हीचाच बनून राहू शकत नाही. माझ्यावर माझ्या आई आणि बहिणीचीही जबाबदारी आहे.”
“तुझं म्हणणं काय आहे बाई…?”
“मॅडम, हा आई व बहिणीचेच म्हणणं ऐकतो, माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो.”
हा प्रसंग आहे नागपूर इथल्या पोलीस चौकीतल्या भरोसा सेलमधला.
महिला पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे या दांपत्यांची गोष्ट सांगत होत्या. त्या म्हणाल्या, “या जोडप्याशी बोलत होते. तेव्हा तिचा नवरा तिला नांदवायला तयार नव्हता. तिला घरी जायचं होतं पण त्याने तिच्याकडेच लक्ष द्यावं अशी तिची अट होती. नियमाप्रमाणे तीन ते चार वेळा दोघांचंही समुपदेशन केलं. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी फाईल बंद करून त्यांना पुढचा मार्ग निवडायला मोकळीक द्यावी असं ठरवलं. पण पुन्हा एकदा प्रयत्न करायचा ठरवला. आणि नंतरच्या भेटीत त्यांना एकत्र राहण्याचे आणि वेगळं होण्याचे फायदे, तोटे दोन्हीही समजावून सांगितले. सगळं बोलणं झाल्यावर शेवटी ते एकत्र नांदायला तयार झाले. आता या घटनेला चार महिने झाले. हे जोडपं एकत्र आहे आणि सुखाने नांदत आहेत. अशा तऱ्हेने एकत्र आलेल्या जोडप्याची नंतरही आम्हाला चौकशी करावी लागते. त्यामुळे एकत्र राहायला लागल्यानंतरही तीन वेळा हे जोडपं भरोसा सेलमध्ये भेटायला येऊन गेलं. आता त्यांच्यात सर्वकाही सुरळीत आहे हे बघून बरं वाटतं.”
महिलांच्या वाढत्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २० डिसेंबर २०१७ साली नागपूर शहरात ‘भरोसा’ या पहिल्या एकात्मीक बहुउद्देशीय सेवा केंद्राची स्थापना केली. पीडित महिला व बालके यांना एकाच छताखाली विविध सेवा पुरवून त्याद्वारे मानसिक बळ देवून त्यांचे पूनर्वसन करण्याचे कार्य भरोसा सेल मार्फत केलं जातं. या सेलमध्ये पोलीस अधिकारी, वकील, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय अधिकारी समाविष्ट असतात. एकाच छताखाली सर्व सुविधा असल्याने पिडीतेचा वेळ व पैशाची बचत होते.
नागपूर येथील भरोसा सेलची धुरा संपूर्ण महिला वर्गाच्या खांदयावर आहे. इथं दोन महिला अधिकारी तसेच १३ महिला कर्मचारी आणि ७ समुपदेशक आहेत. महिला पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे या सेलच्या प्रमुख आहेत. दामिनी पथक, ज्येष्ठ नागरीक तसेच कम्युनीटी पोलिसिंगची जबाबदारी सुद्धा सीमा सुर्वे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दामिनी पथकाकरीता दोन ड्रायव्हर पुरुष कर्मचारी व सात महिला पोलीस कर्मचारी आहेत. तर कम्युनिटी पोलिसिंग करीता ३ पुरुष पो. कर्मचारी नेमले आहेत. या सेलमध्ये रोज २०च्या वर तक्रार अर्ज येतात. जूनी ४ते ५ प्रकरणे सुद्धा असतातच. प्रत्येक समुपदेशकाकडे रोज ३ ते ४ प्रकरणे असतात. संबंधीतांना आपले मत मांडण्यासाठी वेळेचे बंधन नसते. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी कमीत कमी ३ महिन्याचा अवधी लागतो. एक प्रकरण ३ ते ४बैठकामध्ये शेवटास येते. या सेलमध्ये प्रकरणाशी संबंधीत व्यक्तींना बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते. हिंसात्मक गुन्हयाची भीती असेल तर तक्रारकर्तीस कोर्टाकडून प्रोटक्शन वारंट मिळवून दिला जातो.

तक्रारदार सूनेकडून सासू व नणंद, चारित्र्यावर संशय, दारु पिऊन मारझोड करणे, पतीचे अनैतीक संबंध, हूंडामागणी, पती जॉब करत नाही, मुलांनाही सांभाळत नाही, जॉब सोडण्याकरीता मारहाण, बदलत्या सवयी, सोशल मिडीयाचा अधिक वापर अशा तक्रारी येतात. आता पुरुष तक्रारदारांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यांच्यामध्ये पत्नीचे सतत मोबाईलवर बोलणे, माहेरी घरातील प्रत्येक गोष्टी सांगणे, कामात लक्ष न देणे, कुटुंबियांची काळजी न घेणे ही कारणे कारणीभूत आहेत. भरोसा सेलचा विशेष म्हणजे प्रकरण निपटलं गेल्यावरही अधिकाऱ्यांचं त्यावर लक्ष असतं.
– निता सोनवणे, नागपूर

Leave a Reply