पक्ष्यांची पिसं, आवाज आणि वनस्पतींच्या बिया गोळा करणारे भोईटे
सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातल्या राजस्व नगर इथं राहणारे संजय तानाजी भोईटे. सोनेरी, चंदेरी, पांढरा शुभ्र, शेंदरी, काजळी, काळ्या-पिवळ्या, तपकिरी, तांबूस, तपकिरी, सोनेरी, गुलाबी अशा विविध रंगांचे मनमोहक पिसारे त्यांच्या संग्रहात पाहायला मिळतात.
५३ वर्षांचे भोईटे मूळचे माळशिरस तालुक्यातले. १९९३ मध्ये ते सोलापुरातील वनविभागात शिपाई म्हणून रुजू झाले. वनविभागात काम करताना वरिष्ठ अधिकारी ए टी देशमुख यांच्यासोबत ते पक्षिनिरीक्षणाला जात. त्यांच्यासोबत राहून त्यांनादेखील हा छंद जडला. निरीक्षण करताना ते पक्ष्यांची पिसं गोळा करू लागले. अपघात, नैसर्गिक मृत्यू, गळून पडलेली पिसं असं करत दुर्मीळ पक्ष्यांच्या झुपकेदार पिसांचा संग्रह झाला.माळढोक, मोर, खवलेकरी, मुनिया, गोल्डन पिजन, हळदी, तनमोर, चिमणी, मकाऊ, चंडोल, पावसाळी दुर्लाव, तितर, शिक्रा, वेडा राघू, नीळपंख, कस्तुर, वटवट्या, मैना, सुतार घुबड, कबूतर यासह ५० पेक्षा अधिक पक्ष्यांची पिसं त्यांनी जमा केली. पिसं दीर्घकाळ टिकावी, यासाठी ते डांबर गोळ्या वापरतात. ती कोरड्या ठिकाणी ठेवतात.
भोईटे सांगतात, पक्ष्यांचीसुद्धा भाषा असते. स्वरातून ते एकमेकांशी संवाद साधतात. ७० पेक्षा अधिक मनमोहक पक्ष्यांचे स्वर भोईटे यांनी आपल्या व्हिडिओ कॅमेरात टिपले आहेत.पक्ष्यांच्या आवाजावर आधारित लघुपट त्यांना करायचा आहे.
भोईटे यांचं पक्ष्यांसोबत झाडांवरही प्रेम. उपसंचालक अशोक पाटील यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी काही वनस्पतींच्या बियाणांचादेखील संग्रह केला आहे. लालगुंज, काळे गुंज, पांढरे गुंज, कडुनिंब, बांबू, चिंच, शिरस, मेडशींग’ बोर, बाभूळ, वड, पिंपळ, अशोक, आंबा, बोर यासारख्या देशी वनस्पतींच्या बियाणांचा संग्रह त्यांनी केला आहे. काही वनस्पती आणि पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
पुढील पिढीला त्यांची माहिती व्हावी, यासाठी त्यांचा संग्रह सुरू असल्याचं भोईटे सांगतात. शाळांमध्ये ते संग्रहाचं प्रदर्शन यासाठी भरवतात. हा अनोखा संग्रह पाहून त्यांचे मित्रदेखील पिसं आणि बिया देतात.
-विनोद चव्हाण, सोलापूर

Leave a Reply