बिनपैशाचा फिटनेस

जेव्हा फिटनेसचा मार्ग सापडतो

फिटनेसविषयी लिहायला नववर्ष प्रारंभाइतका योग्य मुहूर्त कोणता असेल?
तर, सुरूवात माझ्यापासूनच.
डायबेटिस झाल्याचं कळलं आणि मी व्यायाम, डाएट हे सगळं सुरू केल्याचं मागे माझ्या डायबेटिसची गोष्ट या पोस्टमध्ये लिहिलं होतंच. सुरूवातीला तरी वजन कमी करणं आणि शुगर आटोक्यात ठेवणं एवढंच ध्येय होतं. तेव्हा माझा व्यायाम म्हणजे डॉक्टरांनी सुचवल्यानुसार केवळ पाच किमी चालणं होतं. या व्यायामामुळे सुरूवातीला 4 ते 5 किलो वजन कमी झालंही. नंतर लक्षात आलं की आता वजन कमी होत नाहीये आणि खाण्यावरही अजून काही बंधनं हवीत. किंवा डायबेटिक खाणं आणि त्याच्या वेळा पाळायला हव्यात. व्यायामही वाढवायला हवा. तेव्हा डायटिशियन अर्चना रायरीकर यांनी सुचवलेला आहार घेतला. तेव्हा, माझी बहीण एका ग्रुपसोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग, रनिंग आणि सायकलिंग करत होतीच. तिनेच #PRS म्हणजेच पुणे रनिंग साऊथ या ग्रुपचं नाव सुचवलं. तिथं सगळ्यांचं ट्रेनिंग घेणाऱ्या पद्मराज सरांना फोन केला आणि लगेच दुसऱ्याच दिवशी पहाटे ट्रेनिंगला पोहोचले. ट्रेनिंगचा माझा पहिलाच दिवस असला तरी, तिथला तो महिन्याचा शेवटचा शुक्रवार होता. त्यामुळे तो दिवस तिथला 108 सूर्यनमस्काराचा होता. अगदी सगळे नाही तरी, किमान 70-80 सूर्यनमस्कार मी घालू शकले. पुढचे दोन दिवस मस्तपैकी सगळं अंग, स्नायू दुखवून घेतले. शनिवारची सुट्टी घेऊन रविवारी परत ग्रुपसोबत पुढच्या उपक्रमांना जाऊ लागले. हा ग्रुप नक्की काय काय करतो याची एक एक चुणूक हळूहळू बघायला मिळाली.
सरांना फोन केला तेव्हा, त्यांनी विचारलं होतं की, रनिंग पण करायचं आहे की फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंगला येणार? तेव्हा, मी जे जमेल ते करून बघू, अशा विचाराने सांगितलं की, रनिंगही बघेन करून. या ग्रुपचा विशेष मला भावला तो, इथं कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही. दुसरा विशेष म्हणजे, कुणी कुणाला उगीच शिकवायला जात नाही, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गतीने व्यायाम करू देतात. उगीचच टीका नसते किंवा त्यावर गॉसिपिंग नसतं. त्यामुळे मला हा ग्रुप खूपच आवडला. नवीन नवीन धावायला सुरूवात करतानाही सरांनी सोपा हिशेब सांगितला. रस्त्यावरच्या विजेच्या दोन खांबांचं अंतर पळायचं, दोन खांब अंतर चालायचं. त्यामुळे पळताना आपसूकच स्वतःचा अंदाज घेता येऊ लागला. सुरूवातीला एक खांब ते दुसरा खांब पळणंही कठीण वाटायचं. हळूहळू ते जमायला लागलं.
स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये पूर्ण उठाबशा, अर्ध्या उठाबशा, स्क्वॅट्स, सुमो स्क्वॅट्स, ब्रिज, रशियन ट्विस्ट्स, साईड प्लॅन्क, रिव्हर्स प्लॅन्क, प्लॅन्क हे आणि असे आणखीही बरेच व्यायाम प्रकार असतात. ॲनिमल वॉक हा असाच एक व्यायाम प्रकार. यात क्रॅब, डक, कॅमल, बेअर, हिल, टो, इनर एज, आऊटर एज वॉक याशिवाय बेडुक उडी, कांगारू उडी असेही प्रकार असतात. हे करताना मजा तर येतेच. हे सगळं करायला अजूनही शंभर टक्के जमतं, असं नाही. पण प्रयत्न सुरू ठेवावेच लागतात. हा व्यायाम आणि थोडं डाएट यानं एक मात्र नक्की झालं की, वजन कमी होताना मसल लॉस झाला नाही. त्यामुळे जेव्हा डाएटिशियनकडे पुढच्या व्हिजिटसाठी जायचे तेव्हा आपण योग्य पद्धतीने वजन कमी करतो आहोत, याची खात्री पटायची.
जानेवारी 2021 पासून पुढे वर्षभर दर महिन्याला साधारण एक ते दोन किलो या प्रमाणात वजन कमी करून मी उंचीनुसार वजनाचं प्रमाण पुन्हा गाठलं. मागच्या वर्षीच्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मी या गटात सामील झाले. यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून बाकी सदस्य काय काय करतात, कुठल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतात ते आणि इतरही बरेच उपक्रम कळू लागले. गेली काही वर्ष व्यायाम आणि योग्य आहार-विहार या सगळ्यातून बाजूला पडलेली मी परत योग्य जगाकडे वळले. पुण्याच्या आसपास असलेले हत्ती डोंगर, खंडोबा डोंगर हे तसे साधे साधे ट्रेकही करण्याची भीती वाटणारी मी ते करू शकले. नंतर एक दिवस कमळगडाचा ट्रेकही करू शकले, ते या स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे. शिवाय ग्रुपमधले सदस्य काय करतात, ते वाचून, त्यातून प्रेरित होऊन. रनिंगची मजल अजूनतरी 10 किमीच्या पुढे गेली नाहीये. पण तीही जाईल नक्कीच, असा आता विश्वास वाटतो.
शुगरची गोळी घ्यावी लागू नये म्हणून हे सगळं मी सुरू केलं. त्याला आता डिसेंबरमध्ये दोन वर्ष झाली. योग्य व्यायाम आणि डाएट यामुळे शुगरच्या गोळीची मात्रा नक्कीच कमी झाली. 10 वर्षांपूर्वी मी योगा, घराजवळ असलेली जिम हे सगळे प्रयोग केलेही होते. योगा क्लास आणि जिमला भरभक्कम फीही मोजली होती. पण त्यात सातत्य राहिलं नाही. कारण मला जाणवलं ते असं, जिममध्ये आपला आपण व्यायाम करतो, वेळ झाली की जातो, येतो. तिथं बाकी लोकांचा आणि आपला संबंध फारसा येत नाही. तसं करण्यासाठी स्वयंप्रेरणा हवी. माझ्यासारख्या व्यक्तींना मात्र प्रेरणेसाठी अशा ग्रुप्सचा मोठा आधार वाटतो. आता काहीवेळा असं घडतं की, तिथं प्रत्यक्ष जाणं काहीवेळा अगदी आठवडाभर शक्य होत नाही. अशावेळी सकाळी, संध्याकाळी किंवा दिवसभरात शक्य असेल त्यावेळी थोडा तरी व्यायाम करावासा वाटतो, केला जातो. पुणे रनिंग साऊथमुळेच ही सवय लागली.
मला आठवतं, माझी बहीण एनसी रनर्स ग्रुपसोबत व्यायाम करते. सुरूवातीला आमचेच सर तिथे त्यांना ट्रेनिंग द्यायला जायचे. तेव्हा कधीतरी एकमेकींच्या घरी राहायला वगैरे जायचं तर झोपायला उशीर व्हायचा. तेव्हा, ती असं रात्रीचं जागरण टाळायची. पण सकाळी स्ट्रेंथ ट्रेनिंगला वेळेत हजर राहायची. आम्ही म्हणायचो, एवढं काय त्यात एक दिवस उशीर झाला तर, बुडलं तर. तेव्हा तिने सांगितलेलं वाक्य मला नेहमी आठवतं, ती म्हणते, सर कात्रजवरून पार नांदेड सिटीतल्या एका टोकाला आम्हाला शिकवायला येतात. तेही पहाटे 5.30 वाजता हजर असतात. त्यासाठी त्यांना किमान अर्धा तास आधी घरातून निघावं लागत असेल. आम्हाला केवळ शिकवण्यासाठी ते एवढ्या लांबून येत असतील तर, त्यांच्या वेळेचा, शिकवण्याचा मान आपण ठेवायलाच हवा.
लोकांना रनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचं खास प्रशिक्षण विनामूल्य देत असूनही आम्ही काही तरी विशेष करतोय, असा अभिनिवेश न बाळगता पुणे रनिंगच्या 26 ग्रुप्सचं काम अविरत सुरू आहे. खरंतर सगळ्यांनाच व्यायामासाठी किंवा खेळासाठीही भरपूर पैसे मोजणं दरवेळी शक्य होतंच असं नाही. अशावेळी असे ग्रुप्सची आपल्याला मदत होऊ शकते. विनामूल्य असल्यामुळे व्यायाम शिकता येतोच शिवाय पुढे आवड निर्माण झाली आणि त्यातल्या खाचाखोचा कळू लागल्या की आपण हळूहळू आपल्याला आवडेल तो त्यातला प्रकार निवडूही शकतो. तर, या ग्रुप्सचं काम कसं चालतं हे बघू.

आणि ग्रुपने व्यायामाचं महत्त्व बिंबवलं
पुण्यात नांदेड सिटी नावाचा भाग आहे. तिथे राहणार्‍या नीलाक्षीने तिथला नांदेड सिटी रनिंग ग्रुप जॉईन केला, तो 2018 साली. ती सांगत होती, 2011 पासून मी नियमित जिमला जात होते. नंतर 16-17 साली पाठदुखी सुरू झाली. तेव्हा जिम थांबवावी लागली. व्यायाम तर आवश्यक होताच. मग घरीच युट्युबवर बघून बघून एक दिवस वेगवेगळे व्यायाम प्रकार करायचे तर दुसऱ्या दिवशी चालण्याचा व्यायाम असं सुरू केलं. जवळ राहणारी एक मैत्रीणही रोज फिरायला येऊ लागली. नंतर नंतर मला जाणवायला लागलं की चालण्यासोबत अवांतर गप्पा, नको ते विषय फारच बोलण्यात येऊ लागले आहेत. हे कमी करायला हवं, असंही जाणवत होतं. विचार करता करता, धावायला सुरूवात करू, असं ठरवलं. मैत्रिणीला यायचं नव्हतं. पण ठरवलं आहे तर सुरूवात करू, म्हणून थोडं पळणं, थोडं चालणं असं सुरू केलं. रोज पहाटे खाली उतरायचे तेव्हा आमच्याच इमारतीत राहणारे निखिल शहा त्याच वेळी लिफ्टमध्ये असायचे. त्यांनी मला रनिंग करताना पाहिलं आणि तिथं एक रनिंग ग्रुप असल्याचं सांगितलं. त्यांनीच पुण्यात नांदेड सिटी भागातला एनसी रनर्स हा रनिंग ग्रुप सुरू केला होता. नीलाक्षी सांगते, या ग्रुपमधल्या लोकांचं रनिंग मी रोज पाहायचे. हे जमेल का, असा विचार मनात यायचा. पण जसजशी ग्रुपमध्ये जायला लागले तसं त्यांच्याकडून धावण्याचं तंत्र आणि मंत्र अभ्यासता आलं, शिकता आलं. त्या ग्रुपसोबत सराव करायला लागले, तसं धावणं जमायला लागलं. नंतर नंतर लक्षात आलं की, इथं होणारं एसटी म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग ही महत्त्वाचं आहे. धावण्यासाठी स्नायूंमध्ये ताकद हवी. ही ताकद मिळते ती स्ट्रेंथ ट्रेनिंगमधून. नीलाक्षीने या ग्रुपसोबतच स्ट्रेंथ ट्रेनिंगही सुरू केलं. हे आवडायला लागलं. आणि पूर्वी कधी फारसा कुठला खेळही न खेळलेल्या नीलाक्षीने हाफ मॅरेथॉन तर पूर्ण केलीच. शिवाय सायकल शिकून ती पुणे-गोवा सायकलिंग, नंतर बुऱ्हाण घाटीसारखा हिमालयीन ट्रेकही पूर्ण करून आली. हे सगळं घडलं, ते तिची इच्छाशक्ती आणि तिच्या ग्रुपच्या पाठिंब्याने, मदतीने.
सिंहगड रस्त्यावरचा असाच दुसरा ग्रुप आहे पीआरसाऊथचा. आठवड्यातून दोन दिवस पुल देशपांडे बागेत, पहाटे 5.30 वाजता, स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी साधारण 30-35 जणांचा ग्रुप जमतो. या ग्रुपमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, रनिंगसाठी येणाऱ्यांपैकी अमित ताम्हणकर यांच्याशीही बोलणं झालं. ते सांगत होते, 16-17 साली वार्षिक आरोग्य तपासणी झाली. त्यात निदान झालं, ते डायबेटिसचं. बैठ्या जीवनशैलीची ती देन होती. कोलेस्ट्रॉलचा थोडासा त्रास होता. हे सगळं बघितल्यावर, मी स्वतःहूनच थोडा व्यायाम आणि रनिंगला सुरूवात केली होती. पण माझी मजल दोन ते अडीच किमीपर्यंतच जात होती. त्याच वेळी माझ्या कंपनीतल्या एक सहकारी स्वाती पानसे यांनी हा ग्रुपमध्ये सहभागी व्हायला सुचवलं. तेव्हा साधारण 17 सालच्या शेवटी मी पीआरसाऊथला जाऊ लागलो.
अमित यांनी त्यावेळी स्ट्रेंथ ट्रेनिंगचे दोन्ही दिवस अगदी न चुकता जायला सुरूवात केली. अमित सांगतात, स्ट्रेंथ ट्रेनिंगला सुरूवात केली खरी. पण माझं वजन जास्त होतं आणि स्टॅमिना कमी पडत होता. त्यामुळे सुरूवातीला भरपूर त्रास झाला. तेव्हा रनिंगला लगेचच सुरूवात न करता स्ट्रेंथ ट्रेनिंगवर भर दिला. स्नायू बळकट होणं, तयार होणं जास्त महत्त्वाचं असल्याचं, तेव्हा सगळ्यांनी मला सांगितलं होतं. अमित यांनी वर्षभर स्ट्रेंथ ट्रेनिंग, हळूहळू धावणं चालू करत 2018 साली पहिली हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांचा पुढचा आलेख मग असा छान चढाच राहिला. अमित सांगतात, शुगर आली होती ती ताणामुळे होती. त्यामुळे या व्यायामाने शुगरचं काय झालं, हे बघण्यापेक्षा मला दिवसभर अगदी उत्साही वाटू लागलं. हे सकाळचे जे दोन तास मी व्यायामाला द्यायचो, त्यामुळे दिवस उत्तम जायचा. बैठ्या जीवनशैलीमुळे शरीराला आलेलं जडत्व दूर झालं. शिवाय आयुष्याकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी मिळाली, ती या ग्रुपने प्रवृत्त केल्यामुळे.
हे दोन्ही अनुभव गेली पाच-सात वर्ष नियमितपणे एका ग्रुपसोबत धावणं आणि व्यायाम करणाऱ्या दोघांचे. पुणे रनिंग या संस्थेचे हे ग्रुप. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून जवळपास 26 ठिकाणी असे ग्रुप कार्यरत आहेत. विशेष म्हणजे कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या लॉकडाऊननंतरही तितक्याच जोमात हे ग्रुप लोकांमध्ये धावण्याचं, व्यायामाचं महत्त्व बिंबवण्याचं काम अविरतपणे करत आहेत. हे सगळं कसं सुरू झालं?.

होय, प्रत्येक व्यक्ती धावू शकते
रनिंगचा हा ग्रुप जसा नांदेड सिटी भागात जमतो, तसे ग्रुप पुण्याच्या अनेक भागात कार्यरत आहेत. सिंहगड रोडवरचा पुणे रनिंग साऊथ, पेठ, बिबवेवाडी, कोथरूड, औंध, पाषाण, बालेवाडी असे जवळपास 26 ग्रुप म्हणजे पुणे रनिंग या संस्थेच्या शाखा आहेत. यापैकी, पुणे रनिंग साऊथ या ग्रुपसोबत मी गेलं वर्षभर व्यायामाला जाते आहे. या व्यायामामुळे मला काय फायदा झाला, माझ्यात कोणते बदल झाले ते मी ‘माझी डायबेटिसची गोष्ट’ या मालिकेत लिहिलं होतंच. मला अपेक्षित होता, तो फिटनेस मला मिळाला. तेही वर्षभरात व्यायामासाठी एक रुपयाही न मोजता. अर्थात त्यासाठी धावायची आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची तयारी हवी. हे केवळ माझ्याच बाबतीत नाही, तर या ग्रुपमध्ये आजवर येत असणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येकासाठी तितकंच खरं आहे. या ग्रुपमध्ये वर्षभर राहून जेवढं ऐकत, पाहत आणि अनुभवत गेले, त्यातून लक्षात आलं की, आपल्या नजरेपलीकडचं बरंच काही या ग्रुप्सनी केलं आहे. याची नोंद व्हायला हवी. त्यातूनच या ग्रुप्सचं काम कसं चालतं, ते काय काय करतात, लोकांना धावण्याकडे, व्यायामाकडे कसं वळवतात हे पाहायची इच्छा झाली.
पुणे रनिंग हा सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात जमणारा मुख्य ग्रुप. या ग्रुपचे एक संस्थापक सदस्य सुधींद्र हरिभट. ते म्हणाले, 2008 च्या सुमारास मी धावायला सुरूवात केली. तेव्हा सोशल मिडियाचा वापर आताइतका वाढलेला नव्हता. त्यावेळी कुठल्यातरी साईटवर, कुणी रनर्स आहेत का असा मेसेज मी टाकलेला होता. पुण्यात तेव्हा धावण्याचं असं वातावरण नव्हतं. त्यामुळे त्यावर उत्तरही लगेच आलं नाही. जवळपास सहा महिन्यांनी मला दोन प्रतिसाद आले. त्यानुसार पुणे विद्यापीठातल्या शिवाजी पुतळ्याजवळ मी आणि आणखी तीन माझ्यासारखेच धावणारे असे आम्ही भेटलो. हे सगळं घडलं ते मेसेजनंतर सहा महिन्यांनी. हे चौघं म्हणजे सुधींद्र हरिभट, विकास कुमार, निखिल शहा आणि महेश नारकर. पुणे रनिंगचे हे संस्थापक.
विशेष म्हणजे हे चौघं भेटले तेव्हा व्हॉट्सअप भारतात तरी अस्तित्त्वात नव्हतंच. फेसबुक होतं, पण त्याचा वापर आजसारखा इतका सहजपणे होत नव्हता. त्यामुळे एकमेकांना भेटेपर्यंत पुण्यात धावणारे आहेत, किंवा धावण्याची आवड असणारे आहेत, हेही कळायला फारसा मार्ग नव्हता. हे तिघं भेटेपर्यंत सुधींद्र सरांनी आपली आपण रनिंगला सुरूवात केली होतीच. नंतर पुणे विद्यापीठात या चौघांनी पळायला सुरूवात केली. हे चौघंही आधी नियमित धावणारे होते, असंही नाही. सुधींद्र सर सांगतात, निखिल अमेरिकेत होता, तेव्हा धावायचा. विकासला धावणं आवडत होतं, महेश हौशी धावपटू होता. त्यामुळे आम्ही भेटलो, धावणं सुरू झालं. सुधींद्र सर सांगत होते, तेव्हा असे कुणी सहज धावणारे रस्त्यात भेटायचेही नाहीत. विद्यापीठात चालायला येणारे दिसायचे. त्यातलं कुणी कधी थोडं जरी धावताना दिसलं की, त्याला आम्ही लगेच पकडायचो आणि आमच्यासोबत बोलवायचो. हळूहळू ऑफिसमध्ये, घराजवळ राहणाऱ्यांना आम्ही असं एकत्र जमून धावतो वगैरे सांगायला लागलो. तुम्हाला आवड असेल तर, तुम्हीही या, असं सांगायला सुरूवात केली. 2010 साली हे सुरू केलं. तेव्हा संस्था करायची वगैरे असा काहीच उद्देश नव्हता. त्यावेळी पुण्यात धावण्याशी संबंधित विशेष स्पर्धा, कार्यक्रम मोजके होत होते. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन सुरू झाल्या होत्या त्या 1983 साली. पण ती स्पर्धा असायची डिसेंबरमध्ये. मग तेव्हा मुंबई, बेंगलोर, दिल्ली अशा ठिकाणच्या मॅरेथॉनला आम्ही जायचो.
2011 साल सुरू झालं आणि या ग्रुपला वाटायला लागलं की आपणही एखादा इव्हेंट करावा. या चौघांना हे वाटलं आणि पुढे पुणे शहरातल्या या ग्रुपने धावण्याला एक आगळंवेगळं वलयच मिळवून दिलं. इतकं की, पुण्यात आता दर महिन्याला LSOM म्हणजेच Last Sunday Of the Month म्हणजे महिन्याचा शेवटच्या दिवशी होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धा तर होऊ लागल्या. Everybody Can Run हे प्रत्यक्षात आणलं ते पुणे रनिंगने. रनिंगला ग्लॅमर मिळालं आणि रनिंग करणारे ग्रुपही वाढले. पुणे रनिंग या ग्रुपने LSOM कशी सुरू केली ते जाणून घेऊ.

LSOM अर्थात Last Sunday of the Month

कोविडच्या पहिल्या लाटेनंतर काही काळ LSOM बंद होत्या. त्या सुरू झाल्या आणि मलाही एखाददोन LSOM मध्ये धावण्याची संधी मिळाली. नंतर आमच्या पीआरसाऊथ ग्रुपची LSOM 25 सप्टेंबर 2022 ला झाली. मी ग्रुपमध्ये सहभागी झाल्यापासूनचा हा पहिलाच इव्हेंट होता. माझ्या थोडं आधी तिथे आलेली साक्षी नाटेकर आणि मी आम्ही दोघी आता चांगल्या मैत्रिणी झालो होतो. आधीच्या एक-दोन LSOM बघितल्या होत्या. तयारी कशी असते, याविषयी उत्सुकता होतीच. ग्रुप काय काय तयारी करतो, वॉटर स्टेशन, धावण्याच्या ठरलेल्या मार्गात उभं राहणारे, धावपटुंना मदत करणारे स्वयंसेवक, नाष्टा काऊंटर, रन पूर्ण केल्यानंतर देण्यात येणारे बॅचेस, ऐनवेळी रनसाठी येणाऱ्यांचं बुकिंग, त्यांना मार्गदर्शन, सगळ्या धावपटुंना चिअरअप आणि वॉर्मअपसाठी म्युझिक, सूत्रसंचालन, सगळ्या ग्रुपसाठी एकसारखे टीशर्ट्स, LSOM साठी ठरलेलं ठिकाण, त्यात कुठं काय काय उभं करायचं, कार्यक्रम झाल्यानंतरची साफसफाई अशा एक ना अनेक गोष्टींचं नियोजन करायचं असतं. नियोजनात भाग घ्यायचा नसला, तरी धावण्याच्या दिवशी आम्हांला देण्यात आलेलं काम करतानाही मजा आली आणि एक वेगळा अनुभव मिळाला. एक इव्हेंट उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी एक दिलाने काम करणाऱ्या किती हातांची गरज असते हे तेव्हा कळलं.
LSOM कशी सुरू झाली याविषयी सुधींद्र सरांनी सांगितलं. मार्च 2011 मध्ये वाटायला लागलं की आपण इव्हेंट करावा. मग मार्च महिन्याचा शेवटच्या रविवारी रनिंगचा इव्हेंट ठरवला. तोवर आम्हालाही धावणं जरा जमायला लागलं होतं. आणि बाकी शहरात रनिंग इव्हेंटला जात होतो. त्यामुळे तिथला थोडा अनुभव होता. पुणे विद्यापीठापासून एनडीएच्या रस्त्यावर हा इव्हेंट झाला. सर म्हणतात, माझ्या आठवणीनुसार त्यावेळी फक्त 10-11 धावणारे या पहिल्या इव्हेंटला आले होते. त्यांच्यासाठी पाणी वगैरे द्यायलाही त्यावेळी या चार जणांच्या ग्रुपमधले दोघांचे ड्रायव्हर दोन-तीन किमीच्या अंतरात गाड्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊन थांबले होते. इतक्या थोड्याश्या लोकांत, मर्यादित साधनांतही ही स्पर्धा उत्तम रितीने पार पडली होती. सर म्हणतात, हा इव्हेंट झाल्यावर आम्ही विचार केला की आता हे दर महिन्याला करायला हवं. तरीही पुढे आणखी 2-3 महिने गेले. आता लोकही वाढायला लागले होते. प्रतिसाद वाढतोय हे बघून वाटलं की, हे सातत्याने केलं पाहिजे. मग या इव्हेंटला नावही दिलं. दर महिन्याला शेवटच्या रविवारी म्हणजे Last Sunday Of the Month अर्थात LSOM असं हे नामकरण. हे सगळं आधी विद्यापीठात करत होतो. मग पुण्यात इतरत्र हे न्यायचं ठरवलं. हे कसं घडलं?
सर सांगतात, आजवर जमणारे आम्ही सगळे रनर्स तेव्हा विद्यापीठात भेटत असू, ते दर रविवारी. लोकांना इतर दिवशी धावायला हवं असायचं, तर ते आपआपल्या भागात करायचे. संख्या वाढत होती. म्हणून मग एकएक ग्रुप बनवायला सुरूवात केली. पाषाण, कोथरूड असं आम्ही ज्या भागात राहायचो, तिथं ग्रुप तयार केले. यात पैशासाठी कुठलीच गोष्ट नसेल, हे अगदी ठाम होतं. सुधींद्र सर म्हणतात, आमच्यापैकी दोघांच्या आपआपल्या कंपन्या होत्या. तर बाकी दोघं चांगल्या नोकरीत होतेच. त्यामुळे पैसे कमावणं हा हेतू कधीच नव्हता. लोकांना धावण्याकडे वळवणं हाच हेतू कायम होता. LSOM सुरू केली, तेव्हाही असा इव्हेंट करायला खर्च किती येतो, ते बघितलं होतं. तो खर्च होता साधारण शंभर रुपये. तेव्हा लोकांकडून या इव्हेंटसाठी फक्त तेवढे पैसे घ्यायला सुरूवात केली. त्यातही सक्ती नव्हती. पैसे कमी पडले तर आम्ही आमच्या खिशातून घालायचो. नंतर असं व्हायचं की, लोकं इव्हेंट आवडला म्हणून शंभरच्या ऎवजी पाचशे रुपयेही द्यायची. खरं तर, हा इव्हेंट अगदी साधा असतो. त्यात काहीही चकचकीतपणा नसतो, अवडंबर नसतं. अशा पद्धतीने LSOM सुरू झाल्या. नंतर ग्रुप वाढले तसंतसं प्रत्येक ग्रुपने दर महिन्याच्या LSOM ची जबाबदारी घेणं सुरू केलं आणि त्या त्या परिसरात हा महिन्याच्या शेवटचा रन सुरू झाला. यामुळेही पुण्याच्या प्रत्येक भागात रनिंगविषयीची जागृती वाढत गेली आणि ग्रुप्सने एकत्र येत व्यायामाला प्राधान्य मिळत गेलं. हे ग्रुप्स कसे तयार झाले ते पाहू.

आणि जीवनशैली बदलते
मी धावायला आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगला जाते, तो पु ल देशपांडे बागेतला पुणे रनिंग साऊथ हा ग्रुप. माझ्या बहिणीच्या आग्रहाखातर मी इथं जायला सुरूवात केली. आमचे प्रशिक्षक आहेत, पद्मराज आणि पुष्कराज सर. नियमितपणे हे दोघं शिकवत असले तरी काहीवेळा प्रसाद पाटील, अमृता पानसे, जयंत संत, अडसूळ सर असे काहीजण व्यायामाचे विविध प्रकार करून घेत असतात. त्यामुळे त्यात विविधता असते. या सर्व सरांचं विशेष म्हणजे ते स्वतः व्यायाम करतातच. शिवाय इतरांकडून हसतखेळत व्यायाम करवून घेतात. तर नव्यांना शिकवत असतानाच त्यांच्या पोझिशन करेक्ट करून घेणं हेही सुरू असतं. हे सगळं सुरू असतानाच इथं कुणीच दुसऱ्याला नावं ठेवत नाही, कुणाचं चुकतंय यावर चर्चा होत नाही. तर चुका सुधारण्यासाठी मदत केली जाते. काहीतरी चांगलं सुचवलं जातं. प्रशिक्षण घेणारा प्रत्येकजणच हे तत्त्व पाळतो, हे विशेष.
रोज व्यायामाला येणाऱ्यांपैकी काही जणांनाही ट्रेनिंग घ्यायची संधी मिळते. अमित ताम्हणकर यांनीही असं ट्रेनिंग घेतलं आहे. ते म्हणाले, हे टीम वर्क आहे. त्यातून काही ध्येय ठरवलेली असतात. म्हणजे आता टीएमएम म्हणजे टाटा मुंबई मॅरेथॉन आहे. यासाठी खूप जणांनी भाग घेतलेला असतो. त्यासाठी मग लॉंग रन झाला की दुसऱ्या दिवशी स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं. तेव्हा लेग वर्कआऊट, अप्पर बॉडी वर्कआऊट ठरलेलं असतं. हे त्या त्या प्रकारे केलं गेलं तर योग्य ठरतं. मला ट्रेनिंग घ्यायची संधी आली तेव्हा वैयक्तिकरित्या मला थोडं दडपण आलं. कारण आपण नुसतंच येऊन व्यायाम करतो तेव्हा आपल्या मनात वेगवेगळे विचार चालू असतात. जेव्हा शिकवत असतो, दुसऱ्यांकडून करून घेत असतो तेव्हा मनानेही 100 टक्के तिथं हजर असावं, सावध असावं लागतं. अमित पुढं म्हणतात, आपण व्यायाम करवून घेत असताना तो आकड्यात मोजणं आणि स्वतःही व्यायाम करणं हे अतिशय अवघड आणि कौशल्याचं आहे. त्यासाठी पद्मराज सर आणि पुष्कराज सर दोघांनाही हॅट्स ऑफ!
पुणे रनिंगची एक शाखा म्हणजेच पुणे रनिंग साऊथ. हा ग्रुप सुरू केला, तो विद्यापीठात रनिंगला जाणारे अनिरुद्ध अभ्यंकर यांनी. ते सांगत होते, “मी जर्मनीत होतो तेव्हाची गोष्ट. साल 2009. कंपनीचा एक ग्राहक तिथल्या मॅरेथॉनला जाण्यासाठी माझ्या मागे लागला होता. मी कधीच रनिंग वगैरे केलं नव्हतं. त्यामुळे मी जायचा प्रश्नच नव्हता. पण त्याने फारच आग्रह केल्याने गेलो. मी शेवटून तिसरा आलो होतो. ते बघितल्यावर मला जाणवलं की, आपला फिटनेस, व्यायाम हे सगळं शून्य आहे. यावर आता आपण काम करायला हवं. मग तिथंच मी धावायला सुरूवात केली. पुढे जर्मनीतून परतलो आणि काही काळात पुणे युनिव्हर्सिटीजवळ एकजण व्यायाम आणि धावायला शिकवतात असं कळलं. तेव्हा महेश नारकर यांना भेटलो. तेव्हा सगळे युनिव्हर्सिटीमध्ये जमायचो आणि तिथंच पळायचो.” युनिव्हर्सिटी परिसरात धावतानाच हा ग्रुप तिथूनच पुढे पाषाण रस्त्यावर असणाऱ्या पंचवटी गार्डनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी जमत होता. धायरी, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, धनकवडी, कात्रज या भागातून तेव्हा मोजकी पाच-सात मंडळी तिकडे ट्रेनिंगसाठी जायची. हळूहळू या लोकांना जाणवलं की, धावणं वगैरे करून रोजची ऑफिसची वेळ गाठायची तर घराजवळचं कुठंतरी जमायला हवं. म्हणून मग विविध भागात ग्रुप सुरू झाले. अभ्यंकर सर तेव्हा नवश्या मारूतीपाशी राहायला होते. मग पुणे रनिंगची पहिली शाखा सुरू झाली, ती कोथरूडला पटवर्धन बाग परिसरातील एका सार्वजनिक बागेत. तिथं संजय राव यांनी अभ्यंकर सरांना प्रशिक्षण कसं घ्यायचं ते शिकवलं. तेही ठिकाण सिंहगड रोडवासियांसाठी तसं लांबचंच. मग अभ्यंकर सरांनीच पुढाकार घेऊन 2015 साली पु.ल.देशपांडे बागेत पीआरसाऊथची सुरूवात केली. सर सांगतात, सुरुवातीला आम्ही फक्त तिघेच जण होतो. मग जसंजसं या ग्रुपविषयी परिसरात माहिती पसरत गेली, तशी लोकं पुल देशपांडे बागेत यायला लागली. ही मंडळी ग्रुपने रस्त्यावर पळायची तेव्हा लोकं थांबवून विचारायची. तुम्ही कोण आहात, काय करता, कोणता इव्हेंट आहे, आम्हीही येऊ का… काही लोक पुल देशपांडे गार्डनमध्ये नुसतं चालायला यायचे. तेही विचारायचे. धावण्यात सामील व्हायचे. एका तासामध्ये पूर्ण शरिराला व्यायाम घडणं. जिमला जायला नको. हे सगळं लोकांना आवडायला लागलं. सिंहगड रोडचा ग्रुप वाढला, तसंतसं मग बिबवेवाडी, धनकवडी, धायरी, नांदेडसिटी असे एकएक ग्रुप सुरू झाले. आता या प्रत्येक ग्रुप्समध्ये किमान 30-25 सभासद आहेत.
अभ्यंकर सर नंतर काहीकाळ पुन्हा भारताबाहेर गेले. एखादा उपक्रम सुरू करणारा मुख्य़ माणूसच त्यातून बाहेर पडतो तेव्हा तो उपक्रम तितक्याच जोमाने पुढे सुरू राहातोच, असं नाही. सरांना तसं विचारलं. ते म्हणाले, “ग्रुप मी सुरू केला असला तरी व्यायाम आणि धावणं या आवडीतून सगळे एकत्र आले होते. एकतर येणारे सगळे रनर होते किंवा त्यांना रनर व्हायचं तरी होतं. आणि हे सगळं विनामूल्य होतं. कुठल्याही प्रकारची फी नव्हती. प्रत्येकजणच उमेदवारी करणारे. व्यावसायिक कुणीच नाही. त्यामुळेच मी नसतानाही खंड न पडता हे चालू राहिलं. पु ल देशपांडे बागेतल्या ग्रुपमधील मंडळी आता वाढली होती. त्यामुळे सर शिकवत होते त्या सगळ्या व्यायामाच्या त्यांनी व्हिडिओ क्लिप्स बनवल्या होत्या. कुठल्या व्यायामानंतर कुठला करायचा, अप्पर बॉडी, लोअर बॉडी, एनिमल वॉक, रनिंगचे फॉर्म्स या सगळ्याच्या क्लिप्स. तेव्हा पद्मराज आणि पुष्कराज दोशी बंधू अगदी नियमित असायचे. तेव्हा त्यांनाच मी विनंती केली की, तुम्ही हे घ्यायला सुरूवात करा. त्यांनीही अगदी आनंदाने जबाबदारी घेतली आणि पूर्वीपेक्षाही उत्तम पद्धतीने ग्रुप तयार केला. इथं एसटीचं नियमित प्रशिक्षण कोण घेणार, हा प्रश्नही येत नाही. कधी सर नसतील तर कुणीतरी उभं राहातंच आणि हे प्रशिक्षण चालू राहतं.
पीआरसाऊथ काय किंवा पुणे रनिंगची कुठलीही शाखा असो. इथं सगळे एकाच उद्देशाने जमत असल्याने हा ग्रुप म्हणजे विस्तारित कुटुंब झालं असल्याचं सगळे सांगतात. ग्रुपबाहेरही त्यांच्या चांगल्या ओळखी झाल्या. नंतर बाकीही बरीच मंडळी ग्रुपला जॉईन झाली आणि इतरही उपक्रम सुरू झाले. रक्तदान, तळजाईवर वृक्षारोपण झालं. दर महिन्याच्या शेवटी वाढदिवस आणि मिळालेलं यश साजरं करणं यातून ग्रुप अधिकाधिक जवळ येत गेला.
पीआरसाऊथची जबाबदारी अगदी कुटुंबप्रमुखासारखीच पार पाडतात, ते पद्मराज दोशी सर. ते या ग्रुपला येऊ लागले तेव्हा ग्रुपमधील सदस्य संख्या होती जेमतेम सात ते आठ जणांची. लोकांच्या कानी या ग्रुपविषयी जसं पडायला लागलं तसं सदस्य वाढत गेले. दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोविड लॉकडाऊनची आठवण ते सांगत होते. ते म्हणाले, लॉकडाऊन झालं तेव्हा कुणालाच बाहेर पडणं शक्य नव्हतं. रोजचं रनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग सगळंच बंद झालं. या काळात काय करायचं, असा विचार सुरू झाला. तेव्हा आमचा फेसबुक ग्रुप होताच. मग जवळपास 60 दिवस ग्रुपमधल्या कुणी ना कुणी रोज लाईव्ह ट्रेनिंग घेतलं.
रनिंग, सायकलिंग करणाऱ्या एकादशी कोल्हटकर. या गेली सहा-सात वर्ष पीआरसाऊथसोबत आहेत. त्या सांगत होत्या, 2015 साली मला स्वतःला हे रनिंग वगैरे असं काहीच माहीत नव्हतं. जिमला जात होते. तिथं पहिल्यांदा रनिंगच्या एका इव्हेंटविषयी कळलं. या ग्रुपविषयीही तेव्हाच कळलं. मग या ग्रुपमध्ये सामील झाले. सिंहगड रोडवरचा हा ग्रुप तेव्हा तसा नवानवाच होताच. त्यामुळे पळणारे सगळेही नवशिके. पाच, दहा किमी धावायचं, असंच तेव्हा होतं. बहुधा 21 किमीही कुणी केलं नव्हतं. सप्टेंबर 2015 मध्ये एकादशी यांनी पहिला विप्रो कंपनीचा रनिंगचा इव्हेंट केला. त्यांचा पहिला रन झाला 10 किमीचा. वय होतं 50. त्या सांगतात, पहिल्याच प्रयत्नात मला पोडियम फिनिश (पहिल्या तिघांत स्थान) मिळालं. आणि तिथूनच धावणं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या दोन्ही गोष्टी अंगातच भिनल्या. रोज धावायचं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या दिवशी तिथं जायचं, हे समीकरणच ठरून गेलं.
एकादशी म्हणतात, इथं कुठंही एका पैशाचा व्यवहार नाहीये. सगळं नि:शुल्क आहे. तेच इतकं वेगळेपण, मोठेपण आहे. आधी अभ्यंकर सर होते नंतर दोशी सर ग्रुपचं सगळं ट्रेनिंग बघायला लागले. ते लांबून म्हणजे कात्रजहून येतात. पण एकही दिवस ते उशीरा येत नाहीत. म्हणजे त्यांच्या कष्टांचा काही मोबदला मिळतोय, असंही नाही. त्यांनी प्रशिक्षित केलेल्या धावपटुंची प्रगती पाहून त्यांना समाधान मिळत असेल. पण आजच्या जगात असं भावनेवर कुणी जगत नाही. आर्थिक लाभ मिळायलाच हवा असं लोकांना वाटत असतं. 2015 पासून हे दोशी बंधू सलग प्रशिक्षण देताहेत. तरीही त्यांनी कधीच मीच का घ्यायचं, असं चुकूनही व्यक्त केलेलं नाही. तशी भावनाच नाही त्यांची मनात, याचं कौतुक वाटतं.

एकादशी पुढे सांगत असतात, 5.30 ला जमले असतील तेवढे सगळे फक्त हाय-हॅलो करतात, लगेच वॉर्मअप सुरू होतो. तो संपला की पुढचे व्यायामप्रकार म्हणजे अनिमल्स, कार्डिओ, अब्ज, स्ट्रेचिंग असं सगळं झालं की नंतरची जेमतेम पाच मिनिटं सगळे गप्पा मारतात आणि निघून जातात. त्यात कुठंही गॉसिप हा प्रकार नसतो. कुणीही कुणाविषयीही इतर काहीही बोलत नाही. कुणी स्पर्धा पूर्ण केली, काही यश मिळवलं असेल, वेगळं काही काही केलं असेल, तर जरूर कौतुक केलं जातं. इथल्या अशा निरोगी वातावरणाचं श्रेय दोशी बंधूंनाच. सगळ्यांना सामावून घ्यायचं, सगळ्यांचं कौतुक करायचं हा त्या दोघांचाच विचार पूर्ण ग्रुपमध्ये उतरला आहे. नवीन येणाऱ्या माणसाकडे लक्ष देणं, नवीन माणूस मागे राहिला तर त्याच्यासोबत धावणं, हे सगळं सरांनी कायमच केलं आहे.
पूर्वी व्यायाम म्हणजे केवळ स्ट्रेंथ ट्रेनिंग असायचं. आता योगा प्रशिक्षण घेतलेलेही काहीजण ग्रुपमध्ये आहेत. धावणार्‍यांना जखमा होण्याचं प्रमाण जास्त असतं. अशावेळी उपयोगी ठरतं ते स्ट्रेचिंग. ते फक्त योगातून मिळू शकतं. म्हणून मग योगा त्याशिवाय इतर काही व्यायामप्रकारही आता घेतले जातात. त्यात आता योगा, पॉवर योगा, टबाटा, किक बॉक्सिंग असे प्रकारही घेतला जातात. त्यामुळे होतं काय की, तोच तो पणा टाळला जातो. वेगळेपण आलं की लोकंही अजून उत्सुकतेने व्यायाम करू लागतात. आणि या सगळ्याचा शेवटी रनिंग करताना फायदाच होणार असतो. तिथं जातानाही आता ग्रुपमधल्या उत्सुकता असते की आज काहीतरी वेगळं असेल.
धावायला सुरूवात केली की, पहिल्यांदा जीवनशैली बदलू लागते. प्रत्येकानेच सांगितलं की, सकाळी धावायला जायचं, तर आपोआपच लवकर उठायची सवय झाली. त्यामुळे अर्थातच रात्रीच्या झोपेची वेळही सुधारता आली. पूर्ण दिवसाचं वेळापत्रकच बदललं गेलं आणि वक्तशीरपणा अंगामध्ये मुरला. एकदा सकाळी स्ट्रेंथ ट्रेनिंग झालं किंवा धाव्णं झालं की मग दिवसभर दुसरा कुठला व्यायाम झाला नाही तरी चालतं. तेही एक वेगळं समाधान असतं.
संजय पाटील हेही पुणे रनिंग साऊथ ग्रुपसोबत धावतात. ते सांगत होते, त्यांनी पहिलीच हाफ मॅरेथॉन केली होती. तेव्हा ग्रुपमधले एकजण त्यांच्या पुढे पळत होते. काही काळात संजय यांनी त्यांना मागे टाकलं. तेव्हा त्यांनी संजय यांचं कौतुकच केलं. संजय म्हणतात, या ग्रुपचं मला तेच आवडलं. मी नवा असूनही त्यांनी माझं कौतुक केलं. असा अनुभव इथल्या सगळ्यांकडूनच येत असतो. सगळेच निःस्वार्थीपणे एकमेकांना मदत करत असतात. चांगल्याला चांगलंच म्हटलं जातं. सध्या संजय दुसऱ्या एका ग्रुपसोबत धावण्याचा सराव करत आहेत. पण तरीही सुरूवात आणि पायाभरणी पीआरसाऊथनेच पक्कं करून घेतल्याचं ते सांगतात.
संजय पाटील यांनी फुल मॅरेथॉन केली ती सीएमईची 2019 ला. नंतर वर्षभरातच त्यांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉनही केली. ते सांगतात, “सीएमईच्या मॅरेथॉनच्या वेळी ग्रुपमधलेच गणेश माने हे निव्वळ माझ्या सोबतीसाठी दुसऱ्या फेरीत शेवटचे दोन किलोमीटर माझ्यासोबत पळत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की, आणखी थोडे प्रयत्न केल्यास तुम्ही सब 5 मध्ये येऊ शकाल. तेव्हा अर्थातच मला सब 5 वगैरे असं काहीच माहिती नव्हतं. पण त्यांच्या सांगण्यावरून मी खरोखर प्रयत्न केला आणि खरंच सब 5 मध्ये आलो.” ही मॅरेथॉन मी चार तास 58 मिनिटात पूर्ण केली. या मॅरेथॉननंतर संजय यांनी 2020 मध्ये टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये हाफ मॅरेथॉन, टाटा अल्ट्रा ही 50 किमीची मॅरेथॉनही पूर्ण केली. नुकतीच त्यांनी गोवा रिव्हर मॅरेथॉनही पूर्ण केली. सर सांगतात, हे सगळं करायची एनर्जी मिळाली ती पीआरएसकडूनच.
संजय म्हणतात, रनिंगमध्ये खरा वाटा आहे तो स्ट्रेंथ ट्रेनिंगचाच. कारण या व्यायामामुळे सगळे मसल्स तयार होतात. म्हणजे खरंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग, रनिंग आणि सायकलिंग हे सगळंच हातात हात घालून असल्यासारखं आहे. तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.
स्ट्रेंथ ट्रेनिंग कसं चालतं ते पाहा या लिंकवर –

व्यायामाचा चुंबक
मागच्या भागात बघितलं, तसं एकादशी या पहिल्याच प्रयत्नात पहिल्या तिघांत आल्या. संजय पाटील यांनीही हाफ मॅरेथॉन, अल्ट्रा अशा स्पर्धा उत्तम रितीने पूर्ण केल्या. तसंच या ग्रुपमधील अनेकांनी आजवर विविध स्पर्धा गाजवल्या आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये आल्यावरच धावण्याशी आणि बाकी काही स्पर्धांशी ओळख होऊन यातल्या प्रत्येकाने त्या त्या स्पर्धा गाजवल्या आहेत. पुणे रनिंगच्या ग्रुपसारखंच काम करणारी आणखीही काही मंडळी पुण्यात आहेत. काही ग्रुप व्यवस्थित पैसे आकारून धावण्याचं प्रशिक्षण देतात तर काही विनामूल्य आहेत. पण त्यांचे काही नियम आहेतच. प्रत्येक ग्रुपचाच काही ना काही वेगळेपणा आहेच. पण पुणे रनिंगने ज्या प्रमाणात रनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं ते वेगळंच.
धावणं, व्यायाम करण्यासाठी पुण्यात जागोजागी जिम आहेत. तशा व्यायामासाठी खास जागा आहेत का? असा शोध घेतला असता सापडलं की, महानगरपालिकेच्या काही बागांमध्ये अशा ग्रुप्सना व्यायामाला परवानगी दिली जाते. मग तिथे असे ग्रुप व्यायाम घेतात शिवाय काही हास्यक्लबही तिथं भरतात. पण धावायला मात्र सिमेंटचा किंवा डांबरी रस्ताच मिळतो. कारण पुण्याच्या सर्वच भागात मोठ्या बागा किंवा ग्राऊंड्स नाहीत. जिथं आहेत तिथं बऱ्याचदा व्यवस्थित फी आकारून धावायला परवानगी मिळते.

कमला नेहरू उद्यान, बीएमएमसीसी ग्राऊंड, शिवाजीनगरची चित्तरंजन वाटिका, हनुमान टेकडी, तळजाई, बालेवाडी स्टेडियम, डेक्कन जिमखाना भागातला हिरवाई ट्रॅक, पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे रेस कोर्स अशा पुण्यातल्या काही बागा आणि ग्राऊंड्समध्ये धावण्यासाठी जाता येऊ शकतं. अर्थात महापालिकेच्या बागा सोडल्या तर बऱ्याच ठिकाणी महिन्याची काही फी भरावी लागते. मला आठवतं, माझी लेक एका ठिकाणी जिम्नॅस्टिकच्या कॅम्पसाठी जात होती. कॅम्पच्या जागेबाहेर त्या मंडळाचं मोठं ग्राऊंड होतं. बाजूने टेनिस, बॅडमिंटन अशा खेळांसाठी राखीव जागा आणि नियमित वर्ग होते. मी आणि मैत्रीण मुलींना कॅम्पला सोडून ग्राऊंडवर चालायचो. काही दिवस चालल्यावर एक दिवस तिथल्या कर्मचाऱ्याने आम्हाला तिथं ट्रॅकवर चालायचं असेल तर महिन्याची ठराविक रक्कम भरून पावती घ्यावी लागते, असं सांगितलं. त्यामुळे पळणं किंवा फक्त चालण्यासाठी काही रक्कम खर्च करायची तयारी असेल तर लोक अशा ट्रॅकवर चालायला, पळायला जातात. याविषयी पुणे रनिंगचे संस्थापक सुधींद्र हरिभट म्हणाले, की रनिंग ट्रॅक असले तरी आम्ही कधीच तिथं सराव केला नाही. कारण हे ट्रॅक असतात जेमतेम 400 मीटर वगैरेचे. आमचे रनिंग करणारे ग्रुप 5, 10, 15, 21 आणि 42 किमी रनिंग करतात. मग त्यांना तेवढ्याच ट्रॅकवर फिरत राहावं लागेल. त्यापेक्षा रोडवरचं रनिंग जास्त सोपं ठरतं.
पुण्यातला डेक्कम जिमखाना हे खेळांसाठीचं मुख्य ठिकाण. आणि ऎतिहासिकदेखील. डेक्कन जिमखान्याच्या उभारणीमागे लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी होते. तसंच इथल्या प्रारंभीच्या क्रीडा उपक्रमांत सर दोराबजी टाटा यांचाही पुढाकार राहिला आहे. सध्या इथं क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, बिलियर्डस, बास्केट बॉल, स्विमिंग अशा काही खेळांचे क्लासेस आहेत. शिवाय इथली सुविधा वापरायची तर त्यासाठी ठराविक शुल्क आहे. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या ते आवाक्यात नाहीत. पुण्यात प्रत्येक मुख्य रस्त्यावर किमान 4-5 तरी जिम आहेतच. पण अर्थातच जिम लावायची तर भले मोठी रक्कम खर्च करावी लागते.
एनसी ग्रुपची नीलाक्षी सांगत होती, सध्या त्यांचे सर परदेशी गेले आहेत. त्याआधीही ते आयर्न मॅन, सायकलिंग टूर अशावेळी नसायचे. पण विशिष्ट व्यक्ती नाही म्हणू अडतंय, असं होत नाही. आता ग्रुपमधील जवळपास सगळेच प्रशिक्षण देण्यात तरबेज झाले आहेत. या ग्रुपमध्ये दर शनिवारी पंकज पांडे योगा घेतात. ग्रुपच्या रनिंगनुसार त्यांनी योगाचा कस्टमाईज प्लॅन करून दिला आहे. या ग्रुपने नुकताच बुऱ्हाणघाटी ट्रेक केला. तेव्हा ट्रेकिंगची प्रॅक्टीस व्हावी म्हणून दर शनिवार, रविवारी सिंहगडला वरचेवर व्हायचाच. राजगड, वासोटा असे गड पर्वती पायथ्यापर्यंत सायकल तिथून दोनदा पर्वती चढणे उतरणे असा क्रम असायचा. बुऱ्हाणघाटीचा 15 हजार फुटाचा ट्रेक या 24 जणांचा पूर्ण झाला. त्याचं सगळं श्रेय हा गट स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि अशा ट्रेकिंग प्रॅक्टीसला देतो. एकमेकांना पाठींबा देत, मदत करत या गटाने ट्रेक पूर्ण केला.
पुणे रनिंगचे संस्थापक सुधींद्र हरिभट सांगत होते, पुणे रनिंग ग्रुपमध्ये रनिंग आणि व्यायामासाठी येणाऱ्यांपैकी कित्येकांनी आयर्न मॅन, अल्ट्रा मॅरेथॉन, काही जणांनी स्वतःच्या ट्रेनिंग अकॅडमी सुरू केल्या. एकजण नगरला असतो त्याने तिथं रनिंग इव्हेंट घ्यायला सुरूवात केली. ग्रुप सुरू केला. एकजण साताऱ्याला असतो तिथं LSOM सुरू झाली.
सुधींद्र सर स्वतः काहीकाळ मुंबईत चांदिवली भागात राहायला होते. तिथंही त्यांनी एक रनिंग ग्रुप तयार केला. सर सांगत होते, ते 2-3 महिने साऊथ आफ्रिकेला होते. तिथंही त्यांनी भारतीय लोकांना जमवून फक्त धावण्यासाठी नाही तर एक फिटनेस ग्रुपचं सुरू केला. वेगवेगळ्या पद्धतीने अशी या ग्रुपची वाढ झालेली आहे. सर सांगत होते, मागे एकदा मला एक मेसेज आला. सर थॅंक्यू. मी विचारलं कोण आहे, थॅंक्यू कशाबद्दल. तेव्हा त्याने सांगितलं, की माझ्याकडे तो धावायला शिकला होता. आता हा मुलगा नॉएडाला असतो. तर तिथंही त्याने असा ग्रुप तयार केला होता. सरांनी एक आठवण आहे सिंगापूरची. एका पर्यटन स्थळी सर त्यांच्या कुटुंबासोबत होते. तेवढ्यात तिथं एकजण कुटुंबासमवेत आले. ते दोघं आले, सुधी सर अशी हाक मारून थेट पायाच पडले. कोण, काय वगैरे बोलणं झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, ते दोघंही पुणे रनिंगला ट्रेनिंगसाठी यायचे. आणि आता सिंगापूरातही त्यांनी त्यांच्या कम्युनिटीमध्ये असे ग्रुप सुरू केला आहे.
या ग्रुपला जॉईन होणाऱ्यांचा वयोगट आहे तो साधारण पस्तीस ते चाळीशीपुढचा. कित्येकांनी पन्नाशी ओलांडली आहे. पण या वयात हे कुठं शिका, असा विचारही कुणाच्या मनाला शिवत नाही. कित्येकांनी ग्रुप जॉईन केल्यावर पोहणं, सायकल चालवणं शिकून घेतलं. काहीजण फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी येतात. काहीजण रनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग असं दोन्हीसाठी येतात. आता काहीजणांचा त्यातूनही एखादा वेगळा ग्रुप आहे जो सायकलिंग, ट्रेकिंग करतो. हे सगळे ग्रुप लोहचुंबकासारखे आहेत. एकदा आपण इथं जायला लागलो की चिकटतोच तिथं. बाकी लोकांचे उपक्रम बघून आपल्यालाही काहीतरी करून बघावंसं वाटतं. ते जमलं की मन उल्हसित होतं आणि पुढच्या नव्या अक्टिव्हिटीसाठी सज्ज होतं.
– वर्षा जोशी-आठवले

Leave a Reply