नाशिकमधली नॅब युनिट महाराष्ट्र संचलित भावना चांडक महानॅब स्कूल फॉर द ब्लाइंड संस्थेची अंध मुलींची शाळा. १ ली ते १० वीचे वर्ग. एकूण पटसंख्या ७०. या मुली औरंगाबाद, अहमदनगर आणि नशिक जिल्ह्यातील विविध गाव शहरांमधल्या आहेत.
कोरोनामुळे मार्च २०२० पासून काही काळ त्यांच्या शिक्षणाला ब्रेक लागला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच शाळा आणि वसतिगृह सोडून त्यांना आपापल्या घरी परतावे लागले. पण मग थोडे दिवसांनी शाळेनं ऑनलाईन पद्धतीनं शिकवायचं ठरवलं. पालकांना याबाबत कल्पना दिली. जानेवारीपर्यंत ऑनलाईन शाळा चालली. त्यानंतर मोठे वर्ग सुरू करण्याचे आदेश आल्यावर जानेवारी २०२१ पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. पण पुन्हा कोरोनाचा प्रकोप झाल्यानं मार्चपासून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले.

मुलींचं शिकणं थांबू न देण्याचं आव्हान मुख्याध्यापिका वर्षा साळुंखे, शिक्षिका नीता सोनी, लता आव्हाड या शिक्षिकांनी यशस्वीपणे पेललं. इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत या मुलींचे शिक्षण आणि ते ही ऑनलाईन पद्धतीने आव्हाह्नात्मक, तांत्रिकदृष्ट्या अवघड, आर्थिक दृष्ट्या न परवडणारे. पण तरीदेखील ते आनंददायी करण्याचा प्रयत्न विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षक या तिघांच्या एकत्रित प्रयत्नातून होत आहे. शाळेने सुरुवातीपासून ब्रेल लिपीतली क्रमिक पुस्तके, इतर साहित्य घरी दिले. त्यामुळे अभ्यास सुलभ झाला. यशिवाय दररोज ३ तास पहिली ते १० वीचे ऑनलाईन वर्ग. मुली आपल्या शिक्षकांचा आवाज ऐकत अभ्यास समजावून घेतात. पालकांच्या मदतीनं रोजच्या रोज गृहपाठ करून पाठवतात. अभ्यासाबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया, न समजलेला भाग याविषयी संदेश रेकॉर्ड करून शिक्षकांना पाठवतात. शिक्षक त्यांच्या शंकांचे निरसन करतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवत त्यांच्या शंकांचे समाधान केले. सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच या दृष्टीबाधित विद्यार्थिनी तंत्रज्ञानाची कास धरली. मुली घरूनच अभ्यास करून परीक्षेलाही सामोऱ्या गेल्या. मुलीना मराठी, गणित, समाजशास्त्र, परिसर, हिंदी आदि विषय नियमितपणे शिकविले जातात. मात्र कोरोनामुळे नाच, गाणे, खेळ, इतर उपक्रम होत नसल्यानं शारीरिक विकास नेहेमीसारखा होत नसल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे मुलीना, पालकांना फोन हाताळता येऊ लागला, ऑनलाईन अभ्यासाच्या सर्व तांत्रिक गोष्टी चुकत का होईना माहिती झाल्या ही त्यातली जमेची बाजू. ब्रेल लिपीतील शिक्षण स्पर्शाद्वारे होते. पूर्वप्राथमिक वर्गातील मुलींना जवळून, हाताला धरून शिकवणं गरजेचं असतं. त्यामुळे जुलैपासून शाळेनं पालकांच्या संमतीने १ ली च्या ४ मुलींचे शिक्षण प्रत्यक्ष शाळेत सुरु केले. एकावेळी एकाच मुलीला प्रवेश, रोज एक तास शाळा असे करत नियम पाळत शाळा सुरूझाली आहे. ऑनलाईन वर्ग सुरु ठेवण्यासाठी काही गरीब विद्यार्थिनींना मोबाईलची गरज आहे. नवे, जुने मोबाईल कुणी दान दिले तर मुलींचे शिक्षण आणखी सुकर होऊ शकेल.
– भाग्यश्री मुळे, नाशिक
Related