दूध दान ही चळवळ व्हावी
बाळाला दूध पाजणारी आई त्याला जन्मभरासाठी रोगप्रतिकारशक्ती, सुदृढपणाचं देणं देत असते. आपल्या बाळाला हे देणं देतानाच ज्या बाळाला ते मिळत नाही त्यालाही ते मिळावं यासाठी प्रयत्न आता काही नवीन माता करताना दिसतात. आपल्या बाळाचा जन्म साजरा करताना इतर बाळांनाही आईच्या दूधाच्या पौष्टिकतेपासुन वंचित राहावं लागू नये यासाठी दूधदान ही चळवळ व्हावी अशी इच्छा स्तनपान जागृती कार्यक्रमानिमित्त या सजग माता व्यक्त करतात.
प्रणाली म्हणाली, ”दूध येत असतानाही ते बाळाला न पाजण्याचा एक विचित्र ट्रेंड सध्या कानावर येतो. मात्र, असं का करू नये हे समजून घेण्यासाठी लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला आणि मदत घेणं आवश्यक आहे. मला बाळाच्या जन्माआधीच अशी मदत मिळाली. त्यामुळे स्तनपानाचं शास्त्र मी नीट समजू शकले. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या महिन्याभरातच माझ्या लक्षात आलं, की बाळाचं पोट भरल्यानंतरही भरपूर दूध शिल्लक राहतंय. आईच्या स्तनांमध्ये दूधाच्या गाठी होऊ नयेत यासाठी दूध पिळून काढण्याचा सल्ला दिला जातो. असं दूध पिळून ते वाया घालवण्यापेक्षा ते गरजू बाळांना देता येतं हे समजलं. मी मिल्क बँकेला दूध देण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा महिने मी दूध देऊ शकले. माझं कुटुंब पुढारलेल्या विचारांचं असल्यामुळे कुणाचा विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. पण बाळाचं पोट नक्की भरेल ना… बाळ उपाशी राहणार नाही ना… अशी काळजी काही काळ माझ्या आईला वाटली. आई आणि आजी म्हणून तिची काळजी साहजिक होती. मिल्क बँकेला दूध देणं आणि त्याचा लाभ नवजात गरजू बाळाला मिळणं हे सर्वोत्तम काम आहे असं मला वाटतं. त्यामुळे ज्या आईला शक्य आहे तिने हे काम करावं. त्यामुळे एखाद्या बाळाला निरोगी आयुष्य द्यायला हातभार लागेल,” असं आवाहन प्रणाली करते.
काजल म्हणाली, ”बाळाच्या जन्मानंतर लवकरच मी मिल्क बँकेला दूध द्यायला सुरुवात केली. किमान सहा महिने मी नियमित दूध देऊ शकले. तब्बल पाच लिटर किंवा त्याहुन जास्त दूध दान केलं. शहरी भागात राहणाऱ्या आईला लॅक्टेशन कन्सल्टंट किंवा स्तनपान सल्लागाराचं मार्गदर्शन, मदत सहज मिळू शकते. त्यामुळे त्यांनी या सोयीचा लाभ घ्यावा आणि जवळच्या मिल्क बँकेला दूध दान करावं. आईचं दूध मिळणं बाळासाठी जितकं महत्वाचं तितकंच ते बाळाच्या आईच्या आरोग्यासाठीही हिताचं आहे. त्यामुळे कोणत्याही विचित्र ट्रेंडला झुगारत दूध दान हाच नवा ट्रेंड व्हावा.”
पहिल्या एका तासात सुरू झालेलं स्तनपान नियमित आणि दीर्घकाळ सुरू ठेवल्यास आईचं गरोदरपणात वाढलेलं वजन उतरण्यास मदत होते. गर्भाशयाचं आरोग्य पूर्वपदावर येण्यास मदत होते. नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. रक्तदाब, दूधाच्या गाठींमुळे उद्भवणारे स्तनांचे विकार यांचा धोका कमी होतो.
-के. भक्ती, पुणे

Leave a Reply