सन २०१४ ची गोष्ट. सकाळी उठून स्वतःच आवरायचं. घरातली कामं करायची. तयार होऊन ९ वाजता ऑफिसला जायचं. संध्याकाळी घरी यायचं. मग स्वयंपाक, जेवण, गप्पाटप्पा, दुसऱ्या दिवसाची तयारी आणि अलार्म लावून झोपायचं. अलार्म वाजल्यावर सकाळी आपणच तो बंद करणार अशी प्रत्येकीला खात्री असते. किंबहुना उद्याचा दिवस वेळेत सुरु व्हावा म्हणूनच अलार्म लावतात. तिनेही असाच अलार्म लावला आणि झोपली. दुसऱ्या दिवशी अलार्म वाजणार त्याच्या काही क्षण आधी तिचे पोट भयंकर दुखू लागले. अलार्मचा आवाज कानात घुमत होता मात्र उठून तो बंद करण्याचीही ताकद तिच्यात नव्हती. क्षणात गाडीत घालून तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. डोळे उघडले तेव्हा ती दवाखान्यात होती. नाशिकच्या डॉक्टरांनी तात्पुरती औषधं, वेदनाशामक गोळ्या देऊन तिला अँब्युलन्समधून तात्काळ मुंबईला हलवण्याच्या सूचना दिल्या. मुंबईला पोहोचू की नाही अशी धाकधूक वाटत असताना घरच्यांसोबत ती मुंबईला मोठ्या दवाखान्यात पोहोचली. तेथे परिस्थिती पाहून तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. ४ दिवसांनी तिला भरपूर सूचना, भरपूर औषधं देऊन दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. तपासण्या अंती तिला प्राथमिक अवस्थेतला कॅन्सर झाला असल्याचं निदान झालं. कर्करोगाशी यशस्वी लढा, जनजागृती, सौदर्य स्पर्धा आणि नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप अशा गोष्टी एकाचवेळी करत आज ती समाजापुढे एक नवा आदर्श ठरली आहे.
आपण बोलत आहोत, नाशिकच्या मिसेस ग्लोबल युनाइटेड एलिट लाइफटाईम क्विन डॉ.नमिता कोहोक यांच्याविषयी. कॅन्सर झाला हे कळल्यावर त्या खुप दु:खी झाल्या मात्र आपल्याला याच्याशी लढा द्यावा लागेल याची जाणीव होऊन त्या खंबीर झाल्या. नाशिक, मुंबईत शस्त्रक्रिया, केमोथेरपी,असंख्य औषधं याला त्यांनी धैर्यानं साथ दिली. योग्य आहार, व्यायाम, आराम, सकारात्मक दृष्टिकोन, कुटुंबाची साथ यामुळे त्या कॅन्सरवर मात करू शकल्या. याच दरम्यान नर्सच्या आग्रहामुळे सप्टेंबर २०१५ मध्ये हॉंगकॉंग इथं कर्करुग्णांसाठी आयोजित मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाईड स्पर्धेत सहभागी झाल्या आणि २७ देशातील स्पर्धकांमध्ये त्या विजयी ठरल्या. मुकुट शिरावर आल्यावर वेगळ्या जबाबदारीची जाणीव त्यांना झाली. ही जबाबदारी हेच जीवनाचे मिशन ठरवून न थकता आजपर्यंत विविध प्रकारच्या ५९० कार्यक्रमांद्वारे त्यांनी कॅन्सर जनजागृती केली. आजही त्या सोप्या शब्दात संवाद साधतात. कॅन्सर होऊ नये, म्हणून काय करता येईल, झाला तर काय करायचं, या आजारासाठी लढण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती, खंबीरपणा याबाबत त्या सांगतात.
अमेरिकेतील मिसेस ग्लोबल युनाइटेड एलिट लाइफटाईम क्विन, कर्करोगावर मात केलेल्या महिलांशी संबंधित आहे. स्पर्धकानं कर्करोगासाठी केलेली जनजागृती आणि इतर कामं याचा विचार यात होतो. निष्ठा, चिकाटी, अपार मेहनत, कुटुंबाची साथ यामुळे नमिता ५ वर्षात ४ वेळा या किताबाच्या मानकरी ठरल्या आहेत. यंदाही जुलै २०२२ मध्ये अमेरिकेतील मिनियापोलीस इथं ४८ देशातील स्पर्धकांमध्ये पहिल्या आल्या.
जनजागृतीसोबतच गरजू रुग्ण विशेषतः लहान मुलांच्या केमोथेरपीसाठी निधी जमा करणे, कर्करोगग्रस्तांना आवश्यक वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात. कोरोना काळात मुंबईत उपचार घेत असलेल्या १७९ कॅन्सर रुग्णांना,त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना सुखरूप गावी पोहोचण्यास नमिता यांनी मदत केली. मुलांना मास्क, खाद्यपदार्थ, पुस्तकं या काळात त्यांनी पुरवली. कर्करोग रुग्णाला शक्य असेल ती मदत करण्यासाठी त्या कायम तत्पर असतात. कर्करोगाशी लढताना आरोग्य, फिटनेस याविषयी आवड निर्माण झाली. अलीकडे पॉवर लिफ्टिंग प्रकारात त्या रमतात. त्या दोनवेळा ‘भारतीय महिला कॅन्सर सर्व्हायवर नॅशनल पॉवर लिफ्टर’ म्हणून विजेत्या ठरल्या आहेत. मे २०२२ मध्ये कोलकाता इथल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी ३ सुवर्ण पदक मिळवली. २५० स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. अवघ्या ३ महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया होऊन देखील त्यांनी ही कामगिरी केली. ‘गोल्ड मेडल नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन सिनियर ग्रुप’ मध्ये त्या ‘गोल्ड मेडल बेस्ट बेच प्रेस’, ‘गोल्ड मेडल बेस्ट डेड लिफ्ट’ या प्रकारातही विजेत्या ठरल्या. आशय रानडे ( नाशिक), श्रीबास गोस्वामी (कल्याण) यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं. स्वत:चे वजन ५० किलो असलेल्या नमिता यांनी या स्पर्धेत बेंच प्रेस, स्क्वाट आणि डेडलिफ्ट मिळून एकूण १७७.5 किग्रॅ वजन उचललं.
आपण या आजारातून बरे झालो, ही देवानं दिलेली मोठी संधी असून त्याचं सोनं करायचं असल्याचा नमिता सांगतात. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करायची, ज्या पातळीवर शक्य आहे त्या पातळीवर मदत करायची हे त्यांचं ध्येय आहे.