कॅन्सर, करुणा आणि कृतज्ञता

टाटा हॉस्पिटललगतची संध्याकाळ

कॅन्सर म्हटलं की पोटात खड्डा हे ठरलेलंच. आणि असहाय्यतेची भावनादेखील. हा आजार मृत्यूचं सावट घेऊन येतो. त्यामुळे, कुणी कॅन्सर पेशंट्ससाठी, त्यांच्या नातलगांसाठी मदत करतंय, हे कळल्यावर तसं करणार्‍यांबद्दल कृतज्ञता दाटून येते. त्यांना आपणही मदत करावी हेही वाटतंच. याच भावनेतून डिसेंबरअखेरीस एका संध्याकाळी अनघाबरोबर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ इथे गेले. मुंबईकर असल्याने हा भाग चांगला परिचयाचा आहे.  काम बघण्याच्या निमित्ताने बरीच नवी माणसम भेटली. कॅन्सररुग्ण आणि त्यांचे नातलग यांना केल्या जाणार्‍या मदतीचं एक दालनच माझ्यापुढे उघडलं.

अनघा गोगटे ही आधी फेसबुक मैत्रीण. नंतर तिच्या कुटुंबियांच्या श्रीजी ऑइल्समधून मी घाण्याची तेलं विकत घ्यायला सुरूवात केल्याने आमच्या प्रत्यक्ष भेटी सुरू झाल्या. तिने एकदा फेसबुकवर लिहिलेलं वाचलं की, ती काही मित्रांसह कॅन्सररुग्ण आणि त्यांचे नातलग यांच्यासाठी जेवण पुरवण्याच्या कामात आहे.  टाटा हॉस्पिटलमध्ये दर दिवशी हजारो रुग्ण येत असतात. मी गेले त्या दिवशीच्या रुग्णांची त्यांच्या वेबसाइटवरची नोंद ४,१७५ ही होती. आणि ही संख्या धरून २०२२ सालातले त्या दिवशीपर्यंतचे एकूण रुग्ण बारा लाखाच्या वर झाले होते. मुंबईत्ले १५%, महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतून आलेले  ४०% आणि देशभरातल्या विविध राज्यांतून आलेले ६०%  असं रुग्णांचं  प्रमाण असतं.  प्रत्येक रुग्णासोबत एक किंवा दोन नातलग असतात. कॅन्सर झालेल्या लहान मुलांसोबत तर हटकून त्यांचे आई-बाप दोघंही असतात. म्हणजे रुग्णसंख्येच्या दुपटीने त्यांचे काळजीवाहक नातलग.

मुंबईतल्यांना किंवा मुंबईआसपासच्यांना इथे ये-जा करणं शक्य होतं. पण बाहेरून आलेल्यांचं फार अवघड. एकदा इथे आलं की, निदान झाल्यावर उपचारांसाठी किती दिवस मुक्काम करावा लागेल ते कॅन्सरच्या प्रकारावर, रुग्णाच्या शरीरस्थितीवर, उपचार पद्धतीवर अवलंबून.  पहिली तपासणी, मग निदाननिश्चितीसाठी, उपचारदिशा ठरवण्यासाठी आणखी तपासण्या, निदान ठरणं, गरजेप्रमाणे शस्त्रक्रिया, त्यानंतरचे उपचार, यात दोन टप्प्यांत ठराविक काळ जाऊ द्यावा लागणं वगैरे. सहज चार-सहा महिने जातात. कधी कधी तर वर्षही जातं. दूर अंतरावरून आलेल्यांसाठी नाममात्र भाड्याने हॉस्पिटलने केलेली निवासव्यवस्था आहे. तिथे ने-आण करण्यासाठी मोफत बसेसही ठेवल्यात. पण अनेकांना राहाण्यासाठी तेवढं भाडं देणंही परवडत नाही. आणि रुग्णसंख्या इतकी वाढती आहे की,  ही सगळी व्यवस्था अपुरीच पडते.  मग हॉस्पिटलच्या आसर्‍यालाच लोक वास्तव्य करतात. म्हणजे रुग्णालयाच्या इमारतीलगतच्या अगदी फूटपाथवरच त्यांचा निवारा असतो. वस्त्रं त्यांनी बरोबर आणलेली असतात. तरी, आता थंडीच्या मोसमात त्यांना कुणी गरम कपडे, पांघरुणं वगैरे पुरवतं.  दोन वेळचं अन्न ही त्यांची रोजची गरज. ते पुरवणारेही अनेक गट, संस्था आहेत.

अनघाबरोबर मी टाटा हॉस्पिटलला पोचले तेव्हा संध्याकाळचे सव्वा सहा झाले होते. मुंबईत थंडीला सुरुवात झालेली. काळोखही लवकर पडू लागलेला. हॉस्पिटलच्या दोन इमारतींना जोडणार्‍या पुलाखाली आम्ही गेलो. तिथे जय आणि त्याचे सहकारी टू व्हिलरवरून अन्नपदार्थांच्या डब्यांसह पोचले. लोक वाटच बघत होते. गेली सात वर्ष दररोज संध्याकाळी जय आणि त्याचे मित्र इथे अन्नवाटपाचं काम करत आहेत.  त्यांनी लोकांना रांगेत उभं राहायला सांगितलं.  रांग मोडणार्‍यांना जय चक्क दटावत होता. आणि लोक त्याचं ऎकतही होते. त्या दोघांत एक हक्काचं, खात्रीचं नातं तयार झालेलं दिसलं. तिथे पोचल्या पोचल्या मी लोकांशी बोलायला सुरूवात केली. बघता बघता दोनेकशे लोकांची रांग झाली.  रांगेतल्यांशीही माझं बोलणं सुरूच होतं. जय, त्याचा मित्र, अनघा यांनी वाढायला सुरूवात केली. त्यांना आणखी मदतीची गरज होती. अनघाच्या सांगण्यावरुन मीही वाढण्यात मदत करू लागले. भात, डाळ, उसळ, चपात्या हे पदार्थ होते. सगळं ताजं, गरम. केळीदेखील होती. जयने सांगितल्यानुसार दोनशे लोकांसाठी १४ किलो भात, चार किलो डाळ, सहा किलो भाजी लागते. पण दोनशे माणसांवर हे थांबत नाही. रांग वाढत राहाते. त्यामुळे पहिल्या माणसाला वाढण्य़ापासून हात थोडा आखडता घ्यावा लागतो. मी वाढायलाच उभी राहिल्याने अनघाने हे माझ्या लक्षात आणून दिलं. काही लोकांकडे ताटं असतात. अनेकांकडे नसतात. तीही त्यांना द्यावी लागतात. एका जेवणासाठी सध्या सुमारे साडेपाच हजार खर्च येतो. जयचं हे काम ज्यांना माहीत झालंय, ते त्याला मदत करतात. देणग्या मिळवून देतात. अनघाही त्यासाठी मदत करते.  मुंबई शहराला असं करण्याची सवय आहेच.

कोण हा जय? आणि अनघा त्याच्या कामात कशी सहभागी झाली?

झपाटलेला जय,  संवेदनशील अनघा आणि मृण्मयी

जय होलमुखे, राहाणार धारावी. शालेय धड्यांमध्ये रुग्णसेवेविषयी वाचलेलं डोक्यात रेंगाळत होतं. पुढे शिवाजी महाराजांची भक्ती जडली. गड-किल्ले भटकू लागला. तेव्हा तिथल्या आसपासच्या गावां-पाड्यांतली साधनसुविधांची कमतरता बघायला मिळाली. जय स्वतः गरिबी सोसत होताच. त्यामुळे कुणी, विशेषतः मुलांनी आवश्यक गोष्टींपासून वंचित राहू नये, असं त्याला वाटत असे. तिथेच त्याने मुलांना शालेय साहित्य वगैरे द्यायला सुरुवात केली. एकीकडे त्याचं कॉलेजही सुरू होतं. तो बरेचदा रक्तदान करत करत असे.  आताही, कॅन्सर रुग्णांना प्लाझ्मा मिळण्यासाठी तो रक्त देतो. २०१४ पासून त्याने सायन, केइएम या रुग्णालयांत येणारे रुग्ण आणि त्यांचे नातलग यांच्यासाठी डबा घेऊन जायला सुरूवात केली. तेव्हा फक्त पुलाव नेत असे.  आणि २०१६-१७ पासून  टाटा हॉस्पिटलच्या रुग्णांसाठी असं जेवण पुरवणं सुरू झालं. या सर्व वर्षांत हरहुन्नरी जय  हाऊसकिपिंग, सुरक्षारक्षक, वाशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग टीचर, मेंदी, रांगोळी काढून देणं, फुलांची सजावट करणं असं करून पैसे मिळवत राहिला. आणि स्वकमाई लोकांना मदत करण्यासाठी उपयोगात आणत राहिला. आता, त्याने ‘अन्नदाता सुखी भव’ या नावाने संस्था सुरू केली आहे. आणि त्याचं कॅन्सर रुग्णांना जेवण पुरवण्याचं काम, ज्याला तो आणि त्याचे सहकारी अन्नदान म्हणतात, ते स्थिरावलं आहे. यात तो नेहमीच पदरमोड करत असूनही अधनंमधनं पैसे पुरे पडत नाहीत. पण अशा प्रत्येक वेळी अनपेक्षितपणे मदत मिळून जाते आणी पुरवठ्यात खंड पडत नाही.  मुंबईत भरपूर माणुसकी आहे असं जय आवर्जून सांगतो.

अनघा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक लेक. दादरला शाळा, कॉलेज. नंतर लग्न होऊन गोरेगावला राहायला गेली. २०१७ मध्ये तिच्या आईला कॅन्सर झाला. आईच्या तपासण्या, उपचार यासाठी तिची टाटा मेमोरियल हस्पिटलमध्ये जा- ये सुरू झाली. तेव्हा तिला जयचं काम दिसलं. त्या कामाचं मोल तिने जाणलं. ती आईला तिकडे नेत असे आणि त्या दोघी परत घरी येत असत. बाहेरगावांहून, बाहेरराज्यांतून येणार्‍यांची परवड तिला दिसत असे. आई गेल्यावर तिला जयच्या कामाला जोडून घ्यावंसं वाटलं. अलिकडेच तिचे वडीलदेखील कॅन्सरने गेले. कॅन्सररुग्ण आणि त्यांचे नातलग यांचं दुःख, ताण तिच्यापेक्षा कुणाला अधिक समजू शकेल?

काही वर्षांपूर्वी मी सुमन दिवाकर या माझ्या मैत्रिणीबरोबर परळ भागातच इंडियन कॅन्सर सोसायटीत जात असे. तिथे कॅन्सर रुग्णांच्या पुनर्वसनाचं काम चालतं. तिथे लहान मुलांचा वॉर्ड आहे. तो बघताना प्रत्येक वेळी आतून ढवळायचं, या मुलांसाठी काय करू, काय नको असं व्हायचं. माझी दुसरी मैत्रीण पत्रकार मृण्मयी रानडे हिने कॅन्सररुग्ण असलेल्या मुलांसाठी पोषक आहार देण्याचं काम केलं आहे.

मार्च २०१७ मध्ये मृण्मयीने तिच्या एका माजी सहकारी मैत्रिणीच्या फेसबुक भिंतीवर वाचलं की, त्या मैत्रिणीच्या काही परिचित व्यक्ती टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लहान मुलांसाठी दरमहा पोषक आहार पाठवतात. यातली बहुतांश मुलं परराज्यांतून आलेली, गरीब घरांतली. मुलांसोबत आईवडीलही इथेच येऊन राहिलेले. त्यामुळे नियमित उत्पन्न नसतंच. मुलांना औषधं रुग्णालयाकडून मोफत वा कमी किंमतीत मिळत असली, तरी पोषक आहार नसल्याने औषधांचा पुरेसा परिणाम दिसत नाही. मग तिथल्याच डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अक्रोड, बदाम वा कॉंप्लान पावडर असा पूरक आहार दिल्यास प्रकृतीवर चांगला परिणाम दिसतो. इम्पॅक्ट फाउंडेशन या संस्थेतर्फे हे काम केलं जातं. अमीता भाटिया ही तिथली स्वयंसेवक मुलांच्या वॉर्डमध्ये काउन्सेलर म्हणून काम करते. अमीता वा श्री. फाउंडेशनचे श्री. नानावटी यांच्या परिचयातले लोक त्यांच्या घरी सुकामेवा पाठवत. त्यांच्या घरचे सदस्य या मेव्याची छोटी पाकिटं घरी तयार करत आणि मुलांमध्ये वाटत. मृण्मयीला हे समजल्यावर तिने अमीताला नक्की गरज किती आहे ते विचारलं. उत्तर कळल्यावर मृण्मयीला हबकायला झालं. कारण शेकडो किलो कॉम्प्लान वा सुका मेव्याची दरमहा आवश्यकता होती, इतकी मुलं तिथे उपचार घेतात. मग मृण्मयीने यावर फेसबुकवर  लिहिलं. दहापंधरा जणांनी प्रतिसाद दिला. तेव्हापासून या सगळ्यांनी मिळून ऑनलाइन ऑर्डर करून थेट वॉर्डात हा आहार पाठवणं सुरू केलं. मृण्मयी दरमहा विशिष्ट तारखेला सगळ्यांना आठवण करून देत असे. त्यासाठी त्यांनी एक फेसबुक ग्रूप तयार केला होता.  यात किती रकमेचा आहार पाठवा अशी अर्थात मर्यादा नव्हती त्यामुळे कोणी अर्धा किलो तर कोणी पाच किलोही पाठवत असे. पुढे ऑनलाइन पाठवण्यात आणि वॉर्डात डिलिव्हरी घेण्यात काही अडचणी आल्या. एका महिन्यात मृण्मयीने सगळा माल स्वतःच्या घरी मागवला.  तो टॅक्सीत घालून योगिनी भिडे  या मैत्रिणीसह  वॉर्डात  पोचवला. मृण्मयी सांगते, “तिथलं  दृश्य पाहून आम्ही इतक्या हलून गेलो की बाहेर येऊन  रडू फुटलं. आपण जी काही मदत करतोय ती दर्या में खसखस म्हणावी इतकी थोडी आहे हे कळून चुकलं.”  त्यानंतर परळलाच राहणाऱ्या मृण्मयीच्या एका मैत्रिणीने तिच्या घरी सामान गोळा करून ते पोचवायला सुरुवात केली. तिच्याकडे सामान पाठवण्यातही अडचणी होत्या, अनेकदा ती घरी नसताना डिलिव्हरी पोचे, वगैरे वगैरे. काही महिन्यांनी ती पुण्यात राहायला गेली. पुन्हा प्रश्न उभा राहिला. मग आणखी एक मित्र पुढे आला, त्याच्याकडे काही महिने सामान पाठवलं. मग कोविड आला. आणि डिलिव्हरी वगैरे सगळंच बदलून गेलं. आता पुन्हा हा उपक्रम मृण्मयी सुरू करणार आहे. नवीन वर्षातलं पहिलं काम तेच करायचं तिने ठरवलंय.

अक्राळविक्राळ रुग्णसंख्येचं व्यवस्थापन

कॅन्सररुग्णांची संख्या इतकी वाढती आहे की हजारो,लाखो हातांच्या मदतीची गरज आहे. अशी मदत करणार्‍या व्यक्ती शोधताना ठाण्याच्या रश्मी जोशी आणि त्यांनी सुरू केलेल्या आधार रेखा प्रतिष्ठान यांच्याविषयी समजलं. रश्मीताई आता साठीच्या वयात आहेत. ही संस्था त्यांच्या नवर्‍यासह त्यांनी सुरू केली. नवर्‍याला कॅन्सर झाला. बार वर्ष हा आजार वस्‍तीला राहिला. या काळात जोशी दांपत्याला आधाराची गरज आणि किंमत समजली. म्हणून स्व-मदत गट सुरू केला. २०१७ साली श्रीयुत जोशी निवर्तले. त्यानंतर काही काळ काम थंडावलं.  रश्मी यांनी मोठ्या निष्ठेने ते पुन्हा सुरू केलं. ठाण्यातल्या रुग्णांना परळला जायला-यायला मोफत टॅक्सीसेवा – या सेवेचा लाभ दर महिन्याला ३५-४० रुग्ण घेतात,  रुग्ण आणि कुटुंबीय यांना कर्करोगविषयक वैज्ञानिक माहिती पुरवणं,  उपचारांसाठी आर्थिक मदत करणं,  कॅन्सर तपासणीचे कॅंप्स भरवणं आणि या आजारातून बरं झालेल्यांचा स्व-मदत गट  इतकी कामं  आधार रेखा प्रतिष्ठानकडून चालतात. कामासाठी पैसे आणि मनुष्यबळ यांची कमतरता मुळीच जाणवत नाही, असं रश्मी यांनी सांगितलं. नवर्‍याच्या आजारपणाच्या काळातले त्यांचे अनुभव ऎकणं फार जड गेलं. इतक्या जीवघेण्य़ा अनुभवातून गेलेल्या या बाईने नवरा गमावल्यानंतरही इतर कॅन्सररुग्णांसाठी काम करत राहाणं, हे माणूसपणाची कमान उंचावणारं आहे.

कर्करोग हा जरी वैद्यकीय विषय असला तरी त्याच्या विळख्यात सापडलं की, अनेक बाजूंनी मदतीची गरज लागते. उपचारांचा खर्च ही आर्थिक बाजू. हा आजार आपल्यालाच का झाला, या प्रश्नाने रुग्णाचा जीव पोखरलेला असतो. त्यावर फुंकर घालण्यासाठी मानसशास्त्राची मदत लागते. कॅन्सरमुळे रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना समाजात वावरणं नकोसं होऊ शकतं, ही सामाजिक बाजू. हे सगळं सांभाळण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये विविध विभाग आहेत. आणि प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांची फौजदेखील आहे. आणि तरी हेही सारं अपुरं पडतंय. २०१२ साली इथली रुग्णसंख्या १० लाख होती. २०३५ साली ती १७ लाख होईल असा अंदाज आहे. त्यामुळे इतक्या संख्येला मदत मिळण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू आहेत.   केवट (Kevat), प्रत्येक रुग्णाला तिथल्या उपचारांत सोबत करणारी एक माहितगार व्यक्ती देणं, हा हा अभिनव उपक्रम देशात पहिल्यांदा टाटामध्येच सुरू केला आहे. युवक-युवतींना त्यासाठी टाटा समाजविज्ञान संस्थेच्या मदतीने खास प्रशिक्षित केलं जातं.

चंदू परब हे तिथले सर्वात वरिष्ठ सोशल वर्कर. कोणालाही फूटपाथवर राहायला लागू नये, असं कळवळ्याने ते म्हणत होते.  कॅन्सरमुळे, त्यावरच्या उपचारांमुळे अगोदरच नाजुक झालेली रुग्णांची  तब्येत. फूटपाथवर राहून अन्य आजारांच्या संसर्गाचा धोका वाढतो. परळजवळ भोईवाडा इथे म्हाडाच्या इमारतींमधली घरं बाहेरून येणार्‍या या गरीब रुग्णांना लवकरच उपलब्ध होतील. मविआ सरकारने तसा निर्णय घेतलाय.  त्यानंतर तिथेच त्यांना जेवण पुरवण्याची व्यवस्था करणं शक्य होईल, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडचं काम म्हणजे रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणं. महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले आरोग्यविमा योजना, केंद्राची आयुष्यमान भारत योजना, टाटा रुग्णालयाने देऊ केलेलं अर्थसहाय्य, विविध कंपन्यांच्या देणग्या या सगळ्यातून रुग्णाला अधिकाधिक आर्थिक मदत मिळवून देण्याचं काम परब यांची टीम करते.

शासनाची भूमिका, धोरण या संदर्भात कळीचं ठरतं. नवी उमेद हा मंच चालवणारी आमची संपर्क संस्था महाराष्ट्र विधिमंडळात मांडल्या जाणार्‍या प्रश्नांचा, मुद्यांचा अभ्यास करते. २०२० ते २०२२ या तीन वर्षांत झालेल्या विधानसभेच्या नऊ अधिवेशनांत कॅन्सरसंबधी एकूण दहा प्रश्न विचारले गेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कॅन्सरवर उपचार होण्याची सुविधा असायला हवी, अशी आमदारांची अपेक्षा वाजवीच आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात केमोथेरपी सुविधेसह तज्ञ डॉक्टरांची संख्या वाढविण्याबाबतच्या २८ फेब्रुवारी २० रोजी विचारलेल्या प्रश्नाला तत्कालीन आरोग्यमंत्री राजेशा टोपे यांनी दिलेलं उत्तर असं: राज्यात कर्करोग संस्थेच्या तुलनेत तज्ञ डॉक्टरांची संख्या कमी आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्य असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमधल्या जिल्हा रुग्णालयांत कॅन्सर डे केअर सेंटर (किमोथेरपी युनिट) स्थापन करण्यात आलं आहे. या दहा आणि आणाखी सहा जिल्ह्यांतल्या वैद्यकीय स्टाफला टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई इथे एक महिन्याचं किमोथेरपीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. उर्वरित २० जिल्ह्यांतील  स्टाफला सन २०२०-२१ पर्यंत प्रशिक्षण देण्याचं नियोजन आहे. जिल्ह्यामध्ये मागणीनुसार  कर्करोग औषधांचा साठा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु आहे. सद्यस्थितीत २३ जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोग रूग्णांची तपासणी केली जाते.  २३ जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर वॉरीअर कार्यरत आहेत. ते कर्करोग रूग्णांना सुविधा पुरवत आहेत.

गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील लस महिलांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याबाबतच्या २५ ऑगस्ट २२ रोजी विचारलेल्या प्रश्नाला सध्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दिलेलं उत्तर असं: किशोरवयीन मुलींमध्ये गर्भाशय मुख कर्करोग होत असल्याचे आढळून येत नाही. तथापि त्यांना Human Papilloma Virus infection होण्याची शक्यता असल्यामुळे व त्यामुळे वयाच्या मुख्यत: ३० वर्षानंतर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता असल्यामुळे किशोरवयीन मुलींना वयाच्या साधारणत: वयाच्या १४ व्या वर्षी Human Papilloma Virus Vaccine (HPV) ही लस देण्यासाठी उपलब्ध आहे. तथापि भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत या लसीचा समावेश नाही. या लसीची किंमत प्रति डोस रु.३०००/- असून लसीकरण पूर्ण करण्याकरीता ०२ ते ०३ डोस घेणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, HPV लसीकरणामुळे गर्भाशय मुख कर्करोग होणारच नाही अशी शाश्वती नसल्याबाबत संशोधनाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे HPV लसीकरणानंतरही गर्भाशय मुखाची नियमित तपासणी दर ०५ वर्षांनी करण्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. टाटा मेमोरिअल येथील तज्ञांच्या मतानुसार स्त्रियांची गर्भाशय मुख तपासणी Visual Inspection by Acetic acid (VIA) या साध्या सोप्या चाचणीद्वारे तपासणी करुन व प्राथमिक टप्प्यात निदान करुन लवकर उपचार केल्यास रुग्ण पूर्णत बरा होतो. यास्तव सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सदर कर्करोग प्रतिबंध व लवकर निदान होण्यासाठी लोकसंख्या आधारित सर्व्हेक्षण कार्यक्रमांतर्गत ३० वर्षावरील सर्व महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी केली जात आहे.

सरकारकडून अग्रक्रमाने ही कामं व्हायला हवीत, हे खरंच. पण रुग्णसंख्या इतकी अक्राळविक्राळ की बलाढ्य सरकारही कमीच पडेल.

करुणामयी मुंबई

अनघाकडून दिलीप विघ्ने या अंतर्बाह्य समाजाशी एकरूप झालेला माणसाविषयी कळलं. दिलीप हाडीमासी दादरकर, मुंबईकर. ते टाटा रुग्णालयाचे बिन कागदोपत्री आणि बिन पगारी कर्मचारी असाल्यासारखे. रोज सकाळी शिवाजी पार्क भागातल्या घरापासून चालत परळला रुग्णालयात पोचायचं. आणि गरजूंना मदत करून पुन्हा पायी घरी परतायचं.  आता निवृत्त असले तरी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात काम करता करता तरूण वयातच त्यांची लोकसेवा सुरू झाली. नोकरी सांभाळून संपर्कात येणार्‍या लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत राहाणं. यातून त्यांचं नेटवर्क वाढत गेलं. त्याचा फायदा लोकांना आणखी आणखी मदत करण्यात होऊ लागला. एका जिवलग मित्राला  कॅन्सर झाल्याचं निमित्त त्यांना टाटा रुग्णालयाशी घेऊन गेलं. २००३ साली त्यांची पत्नी रंजना यांनाही स्तनाचा कॅन्सर झाला. रंजना महाराष्ट्र बॅंकेत शाखा व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेल्या. रंजना बर्‍या तर झाल्याच. आणि उत्तम तब्येत असल्याने दिलीप यांच्यासह लोकांना मदत करण्यात त्याही आघाडीवर असतात. दिलीप म्हणजे कॅन्सरचा माहितीकोष. त्यांच्या भरभरून बोलणं थेट आतड्यातून आल्यासारखं अस्सल.

चंदू परब म्हणाले की, रुग्ण गरीब असले तरी ते भिकारी नसतात.  त्यांचा मान सांभाळूनच आम्ही हे करतो. आणि कोणीही कोणालाही मदत करताना हे भान ठेवायलाच हवं, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. मुलांच्या वॉर्डातल्या ख्रिसमस पार्टीचं फार प्रेमाचं आमंत्रण त्यांनी मला दिलं. त्यांच्याही बोलण्यात मुंबईचं कौतुक डोकावत होतंच. म्हणजे असं की, रुग्णसंख्येच्या मानाने कमी असली तरी आता देशभरात उप्र, पंजाब, आंध्रप्रदेश, बिहार, आसाम या ठिकाणी स्वतः टाटांनीच कर्करोग रुग्णालयं सुरू केली आहेत. तसंच टाटामधल्या डॉक्टर्सकडून प्रशिक्षण घेऊन त्या धर्तीचीही रुग्णालयंही इतरत्र काम करतात. तरी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांतून आणि भारतातल्या राज्यांतून कॅन्सररुग्णांना मुंबईकडेच धाव घ्यावीशी का वाटते? त्याची दोन कारणं दिसतात. पहिलं, टाटा मेमोरियल हॉस्पिटलची उत्तुंग विश्वासार्हता. दुसरं, करुणामयी मुंबईतून लागेल ती मदत मिळण्याची खात्री.

लोकही अगदी हेच बोलत होते. बिहार, झारखंडचे बरेच जण होते. पाटण्यात उत्तम कर्करोग रुग्णालय आहे. तरी आम्हाला तिथल्या उपचारांबद्दल विश्वास वाटत नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल इथून आलेले लोक होते.  नांदेड, नाशिकचेही होते. इथे फूटपाथवर राहावं लागतं त्याचं काही वाटत नाही का? असं विचारल्यावर लोक म्हणत होते की, फूटपाथवरदेखील आम्हाला काही कमी पडू दिलं जात नाही. कारण ही बंबई खूप मदत करणारी आहे. आम्हाला इथे कसलीच भीती वाटत नाही.  टाटा रुग्णालयाबद्दलचा विश्वास आणि मुंबईतली सुरक्षितता असा दुहेरी लाभ मिळत असल्याची त्यांची भावना आहे. सविता गोस्वामी, तिथल्या सायको-ॲकॉलॉजिस्ट यांची सामाजिक बाजू मांडणारी निरीक्षणं महत्वाची वाटतात. सहा महिन्यांहून अधिक काळ राहायला लागलेल्यांपैकी काही जण मुंबईत रोजंदारीचं काम शोधतात. अगदी धर्मशाळेत किंवा फूटपाथवर राहायला लागलं तरी बायका मुंबईतल्या मोकळ्या वातावरणाने सुखावतात. त्यांच्या गावांच्या तुलनेत इथला मोकळेपणा त्यांना भावतो. अजूनही कॅन्सर म्हणजे कलंक, लपवण्यासारखा आजार असं अनेकांना वाटतं. मुंबईत मदत करणारेदेखील फार चौकशा करत नाहीत. मुंबई त्यांचा ते आहेत, त्या स्थितीत स्वीकार करते. त्यामुळे त्यांच्या गावातल्यापेक्षा इथे त्यांना  स्वतंत्र वाटतं.

यावर काय म्हणणार? असो.

लोकांमध्ये कॅन्सरविषयीची जागरूकता वाढो. आणि त्याचा विळखा पडलेल्यांना सावरायचं बळ मिळो. या रुग्णांविषयीचं समाजाला वाटणारं ममत्व कायम राहो. त्यांना मदत करणारे आणखी हजारो हात तयार होवोत.  त्यातले काही हात हा लेख वाचणार्‍यांचेही नक्की असोत.

मदत करण्यासाठी:

१)   टाटा मेमोरियल सेंटर: https://tmc.gov.in/m_donation_new

२)   जय होलमुखे, अन्नदाता सुखी भव: Google Pay 9619907431

Name – Jay Holmukhe / Account no 3810366940 / IFSC code   CBINO284565 / Central Bank of India, Dharavi Branch

३)   रश्मी जोशी, आधाररेखा प्रतिष्ठान:  9869465144

मदत घेण्यासाठी:

१)   आधाररेखा प्रतिष्ठानची नि:शुल्क टॅक्सी सेवा – ठाणे ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ – 9869465144 / 986923857

२)   टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याबाबतच्या माहितीसाठी –

दिलीप विघ्ने – 9869287700

–         मेधा कुळकर्णी

Leave a Reply