पाणीबचत शिकवणारे तहसीलदार

बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका. कायम दुष्काळग्रस्त. पावसाचं प्रमाण कमी. सात मध्यम आणि १९ लघू प्रकल्प असूनही पाणीटंचाई. का? तर या प्रकल्पांतल्या पाण्यावर डल्ला मारण्यात लोक तरबेज. त्यामुळे पिण्याचं पाणी बारमाही टँकरच्या भरवशावर. यातच जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी २०१६ मध्ये जिल्ह्यातल्या सर्व तलावांमधलं पाणी आरक्षित केलं. तरीही, तलावांमधली पाणीचोरी सुरूच राहिली. आकडे टाकून वीज घ्यायची आणि पाणी चोरायचं. या पाण्यावर पदरात पडेल, ते पीक घेण्याची लोकांची लालसा वाढतच होती. 
मग तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी एक उपाय शोधला. महावितरण,पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, तहसील, पंचायत समितीचे अधिकारी, नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सरपंच – सर्वांचीच बैठक घेतली. उपलब्ध पाणीसाठ्याचं संवर्धन, संरक्षण केल्यासच तहान भागवता येईल. टँकरच्या पाणीपुरवठ्यावर तहान भागवणं, टँकरची मागणी करणं म्हणजे सरपंचांचं, गावप्रमुखाचं अपयश आहे, हे समजावून दिलं. छावणीचालकांनाही गोरे यांनी आवाहन केलं. जनावरांसाठी टँकरने बाहेरून पाणी आणता, तर नागरिकांसाठीही आणा. त्यांनीही साथ दिली. नगर, पाथर्डी, वेलतुरी, जामखेड, उंदरखेल, सीना धरणाचा कालवा, वाहिरा येथून टंचाईकाळात पाणी आणावं लागलं. जबाबदारी निश्चित करून दिल्याने सगळ्यांनीच मनापासून साथ दिली. इथंच गोरे यांनी अर्धी मोहीम जिंकली. मग जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना, नियोजनानुसार जलयुक्त शिवारची कामंही सुरू झाली. नादुरूस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे टँकरऐवजी नळयोजनेचं पाणी सुरू झालं. 


पिंपळा, टाकळशिंग, वाहिरा, सय्यदमीर लोणी हा नगररोडचा डावा भाग. कमी पावसाचा. नियोजन करून पाणीसाठा कसा वाढेल ते पाहिलं. आणि ऑगस्टमध्ये सर्वच्या सर्व १६५ टँकर बंद झाले. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पाणीसाठा वाढला. मुख्य म्हणजे बेसुमार पाणीउपसा आणि पाणीचोरी हे थांबलं. ग्रामस्थ आणि यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे यश आल्याचं तहसीलदार गोरे सांगतात.
याआधी रामेश्वर गोरे वाशी तहसील कार्यालयात नियुक्त होते. तिथे तहसील आणि पंचायत समितीचं कार्यालय एकाच इमारतीत. दोन्ही कार्यालयांना अवकळा आलेली. शिस्त नावालाच. अनागोंदी कारभार. गोरेंनी प्रथम कर्मचार्‍यांना विश्वासात घेतलं. काम करण्यासाठी उमेद, पाठबळ दिलं. कार्यालयाची कामाची गती वाढू लागली. सहा महिन्यांपासून रखडलेलं, दिडशे निराधारांचं शासनाकडून मिळणारं मानधन गोरे यांनी निराधारांच्या खात्यावर जमा केलं. हळूहळू अन्य कामांचा उरकही वाढला. आणि २०१५ मध्ये वाशी तहसील कार्यालयाला महसूल दिनी आदर्श तहसीलदार पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे गोरे यांनी बीडला नायब तहसीलदार या पदावर असतानाही हा पुरस्कार मिळवला होता. 
कोण म्हणतं शासकीय यंत्रणा काम करत नाही? 
रामेश्वर गोरे यांनी शिस्त आणि नियमांचं पालन करत कामांना वेग दिलाच. पण लोकांना विश्वासात घेऊन, कर्मचार्‍यांवर विश्वास टाकून पाणीबचतीचं मूल्यही लोकांत रुजवलं. यामुळे दुष्काळी स्थितीतही पाण्याची बचत करता येते, हे सिद्ध झालं. शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोचतो, हा विश्वास आष्टीचे (जि. बीड) तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी आपल्याला दिला आहे.

– मुकुंद कुलकर्णी, बीड