…या मुलांनाही हवा जगण्याचा आधार

माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही एच.आय.व्ही. एड्सब़द्दल समाजात नकारात्मक दृष्टी दिसून येते. एड्सग्रस्त आर्इ-वडिलांपासून जन्माला आलेल्या मुलांना जन्मतःच एच.आय.व्‍ही.ची लागण झाल्याने कुटुंबातील नातेवाईकही जवळ करत नाहीत. अशा बाल वयातच रोगामुळे आर्इ-वडील दगावल्याने अनेक मुले पोरकी होतात. पोरक्या झालेल्या व कुटुंबाने बहिष्कृत केलेल्या मुलांच्या चेह-यावरील हसू कायमचं विरून जातं. मायेचं छत्र हरवलेल्या अशा बालकांच्या चेह-यावर हसू पेरण्याच काम औंरगाबाद शहरात २००८ पासून सुरू आहे. नीतिन वाकुडे व मनोज वाकुडे यांनी बहिष्कृत केलेल्या एड्सग्रस्त बालकांना आधार दिला. 


एमएस्सी झालेले नीतिन वाकुडे पुण्यातील एका नामवंत कंपनीत ‘व्यवस्थापक’ पदावर काम करत होते. दरम्यान एड्सग्रस्‍त मुलासांठी काम करणा-या मित्राच्‍या माध्‍यमातून सामाजिक कार्यकर्त्‍या सौदामिनी कदम यांच्‍याशी नीतिन यांची ओळख झाली. कदम या एड्सग्रस्‍त विधवा, परित्‍यक्‍ता आणि वेश्‍यांचा सांभाळ करत होत्‍या. या संस्‍थेतील विदारक चित्र पाहून ते विषण्‍ण मनाने बाहेर पडले. एड्सग्रस्‍तांसाठी काम करण्‍याच्या निर्धाराने त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन कामाला सुरूवात केली. मग सुरू झाला औरंगाबादमधल्‍या एकमेव अशा ‘बाबासार्इ’ एड्सग्रस्‍त मुला-मुलींसाठी काम करणा-या संस्‍थेचा प्रवास. मरणाच्‍या दारात पोहोचलेल्‍या मुलांचे आयुष्‍य वाढवण्‍यासाठी आज संस्था संघर्ष करत आहे. ६ ते १५ वयोगटातील ४८ मुले आज संस्थेत आहेत. मुलांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याबरोबरच त्‍यांच्‍या सामाजिक पुनर्वसनाची जबाबदारी संस्‍थेलाच पार पाडावी लागते. त्‍यांची सेवा, संगोपन आणि शिक्षणाची जबाबदरी संस्‍थेंचीच. ही जबाबदारी पार पाडण्‍यात नीतिन यांचा लहान भाऊ मनोज, आर्इ-वडील यांच्‍यासह घरातील बच्‍चे कंपनी वेगवेगळ्या पातळीवर मदत करतात. खरंतर असाध्‍य रोगानं पछाडलेल्‍या बालकांची जबाबदारी अंगावर घेणं, त्‍यांच्‍यासाठी खस्‍ता खाण ही सोपी गोष्‍ट नाही. 
एड्सग्रस्‍त मुलांपैकी काहींना तीन वेळा, तर काहींना दोन वेळा गोळ्या द्याव्‍या लागतात. गोळ्यांची वेळ चुकली की, या मुलांची दैनंदिनी बिघडते. एच.आय.व्‍हीची लागण झालेल्‍या शरिरातील विषाणू कधीच संपत नाही. त्‍याला फक्‍त गोळ्यांनी बंदिस्‍त कराव लागतं. गोळ्यांचा डोस थांबला की, मग शरिराला विविध आजाराची लागण सुरू होते. यामुळे प्रत्‍येक मुलाची विशेष काळजी घ्‍यावी लागते. प्रत्‍येक दिवशी सकस आहार द्यावा लागतो. गोळ्यांचा डोस सुरू असल्‍याने सामान्‍य व्‍यक्‍तीपेक्षा या मुलांना जास्‍तीचा आहार लागतो. मुलांना औषधांचा डोस व आहार वेळेवर मिळावा यासाठी कधी उसनवारी, कधी हातपाय जोडून, कधी उधारीवर नीतिन यांना वेळ धकवून न्‍यावी लागते. एका मुलाच्‍या संगोपनासाठी शासनाकडून महिन्‍याकाठी ११०० रूपये मदत मिळते. मात्र, एका मुलाच्‍या गोळ्यांचा खर्चचं महिन्याकाठी हजारावर जातो. संस्‍थेतील प्रत्‍येक मुलासाठी एआरटी कार्ड तयार केले आहे. या कार्डामध्‍ये संबंधित मुलाचे वय, वजन, आजार, आजाराची स्‍टेप कुठली, गोळ्या, उपचार कुठे केला जातो याविषयी सविस्‍तर माहिती देण्‍यात आली आहे. त्यामुळे कोणत्‍या मुलाकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. याचा अंदाज काळजी घेणा-यांना येतो. 
औरंगाबाद, बीड, अहमदनगर, जळगाव, नाशिक अशा विविध जिल्‍ह्यातून आलेल्‍या मुलांना मनपाच्‍या शाळांनी प्रवेश नाकारला होता. मात्र नीतिन यांनी शाळेच्‍या प्रशासनासोबत संघर्ष करत या सर्व मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला. यांनतर मुलांच्‍या शिक्षणाची गाडी सुरू झाली. 
या आजारी मुलांच्‍या अल्‍पशा आयुष्‍यात वाढ होण्‍यासाठी समाजातील लोकांनी मदतीचा हात पुढे करण्‍याची गरज आहे. अशा मुलांसाठी मदत करणा-यांच्‍या संख्‍येत वाढ झाली, तर नक्‍कीच या कोमेजलेल्‍या पंखांना भरारी मारता येईल. त्‍यांना मुक्‍त जीवन जगण्‍याची संधी प्राप्त होर्इल.

– हनुमान लवाळे, औरंगाबाद