दुष्काळातली माणुसकी

३०० कुटुंबांना पुरवितात मोफत पाणी – नेताजीराव देशमुखांचा स्तुत्य उपक्रम

सध्या लातूरमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून
मिरजेहून रेल्वेने पाणी मिळत असल्याने लातूरच्या काही भागातील नागरिकांना या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र बहुतांश भागात लोक पिण्याचे पाणी जास्तीचे पैसे देऊन विकत घेत आहेत, काहीजण शेत शिवारातील आटलेल्या विहीरीच्या झèयाचे पाणी भटकंती करून आणत आहेत. काही भागात विलासराव देशमुख फाउंडेशन टँकरने मोफत पाणीपुरवठा करीत आहे.अशा सगळ्या परिस्थितीत काहींनी लोकांच्या रिकाम्या घागरी परत जाऊ नये, यासाठी स्वत:च्या बोअरचे मोफत पाणी देणे सुरू केले आहे.

दरम्यान नळाद्वारे लातूर शहराला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी लातूर
शहरातील नागरिकांकडून होत असताना महानगरपालिका प्रशासनाने आजघडीला ते शक्य नसल्याचे सांगितले. मात्र प्रभाग क्रमांक ३५ मधील रुद्रेश्वरनगर, श्रद्धानगर, नेताजीनगरमध्ये माजी नगरसेवक नेताजी रघुनाथराव देशमुख यांनी त्यांच्या शेतातील बोअरपासून उपरोक्तनगरांमध्ये पाईपलाईन करून स्वखर्चातून नळाद्वारे ३०० घरांना मोफत पाणीपुरवठा दररोज सुरू करून
माणुसकीचा प्रत्यय दिला आहे.

लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ३५ मध्ये माजी नगरसेवक तथा कुणबी मराठा
सेवा संघाचे अध्यक्ष नेताजी रघुनाथराव देशमुख यांनी सामाजिक बांधीलकी
ठेवून आपल्या शेतातील बोअरवरून स्वखर्चाने दोन इंच पाईपलाईन एक हजार फूट लांब खोदून अंथरली आहे. या पाईपलाईनवर रस्त्याच्या कडेने नळाचे तीन पॉंईट बसविण्यात आले आहेत. या तीन नळाद्वारे रुद्रेश्वरनगर, श्रद्धानगर,
नेताजीनगरमधील ३०० कुटुंबांतील एक हजार नागरिकांना मोफत पाणीपुरवठा होत आहे.

दुष्काळी परिस्थितीतही नळाद्वारे दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सदर
ठिकाणी मोफत पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा
करण्यासाठी माजी नगरसेवक नेताजी देशमुख यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.

लातूर शहरात मोफत पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक हात पुढे आले. मात्र प्रभाग क्र. ३५ मधील रुद्रेश्वरनगर, श्रद्धानगर, नेताजीनगरात बोअरचे पाणी
नळाद्वारे पुरवठा करण्यात येत असल्याचा लातूर शहरातील एकमेव सामाजिक
उपक्रम आहे. या उपक्रमामुळे आज ३०० कुटुंबांची तहान या नळाच्या पाण्यावर
भागत आहे.

शिवाजी कांबळे