सर्वांच्या सहभागाचा वनमहोत्सव

शहरीकरणाच्या वाढत्या वेगात सर्वाधिक मोल चुकवावे लागते ते वृक्षराजीला.या प्रक्रियेत हिरवाई लुप्त होत चालल्याने कालांतराने ही शहरे बकाल स्वरूप धारण करतात. बहुतांश बड्या शहरांचे हे वास्तव लक्षात घेत नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी,नागरिक यांच्या सहकार्याने ‘वन मोहत्सव’ या अनोख्या प्रयोगाची मुहूर्तमेढ रोवली आहे. महोत्सवाचे यंदाचे हे दुसरे वर्ष. शहराच्या सभोवताली हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करून हिरवाईची अशी तटबंदी उभारायची कि भविष्यात इतर शहराप्रमाणे प्रश्न निर्माण होणार नाही याची तजवीज नाशिककरांनी केली आहे.पर्यावरण प्रेमी शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम आकारास आला आहे.


पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवड हा उद्द्येश ठेऊन ही चळवळ सुरु झाली आहे.यातून ‘आपलं पर्यावरण’ हा ग्रुप तयार झाला आहे. आता हाच ग्रुप पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवड या करिता काम करत आहे. या महोत्सवात यंदा पाच हजार झाडे आपलं पर्यावरणने लावली आहेत. ही झाडे नाशिक,नगर,कर्जत आणि गुजरात येथून आणण्यात आली होती. या शिवाय वेगवेगळे पर्यावरण पूरक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.
हरित नाशिक, सुंदर नाशिक हे स्वप्न प्रत्यक्षात यावे या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मागील वर्षी सातपूर परिसरातील फाशीचा डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले होते. आणि आता देवराई म्हणून हा परिसर नावारूपाला आलेला आहे. यावर्षीही पर्यावरण दिनाचे निमित्त साधून पाच जून रोजी तब्बल पाच हजार रोपांची लागवड करण्यात आली. त्यासाठी म्हसरूळ परिसरातील वनविभागाच्या मोकळ्या आवाराची निवड केली गेली.

शिवाय, त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारत शहरभोवती हिरवाईची तटबंदी करण्यास हजारो हात सरसावले. यासाठी जेष्ठ नागरिक, नोकरदार, विद्यार्थी यांनीही भाग घेतला. रोपांची लागवड करतांना अनेकांनी त्यांच्या संवर्धनाची शपत घेतली. तर काहींनी मंत्रांच्या जयघोषात वृक्षारोपण केले. वन विभाग आणि ‘आपल पर्यावरण’ संस्थेने वृक्षारोपण तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने व्हावे यासाठी पाच हजार खड्डे खोदून आधीच त्यात शेणखत आणि रासायनिक खत विशिष्ट प्रमाणात आणून ठेवले. रोपण झालेल्या रोपांना क्रमांक देण्यात आले. त्या त्या विभागासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी वड, पिंपळ, आंबा, बकुल, मोह, पळस, भोकर, पायर, खडकपायर, शिवन, भोर, विलासंती, चिंच, पापडा यांसह विविध प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. महापालिकेने २५ हजार क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांसह ९ टन खत उपलब्ध करत महत्वपूर्ण योगदान दिले. इथलं आणखी एक आकर्षण होते पर्यावरण जत्रेचे. मधुमक्षिकापालन,घरगुती कचऱ्यापासून खतनिर्मिती,घरगुती शेती,गच्चीवरील बाग,पक्ष्यांची घरटी आदी पर्यावरणाशी संबंधित कक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला. काहींनी प्लास्टिकमुक्त नाशिकसाठी कापडी पिशव्यांचे वितरण केले. हजारो नागरिकांच्या सहभागाने होणारा नाशिकचा ‘वन महोत्सव’ सर्वांना मार्गदर्शक ठरणारा आहे, हे निश्चित.