अवघ्या महिन्याभरात ग्रंथालयाचे १०० हून अधिक वाचक

अवघ्या महिन्याभरात ग्रंथालयाचे १०० हून अधिक वाचक. हे आहे ई बुक ग्रंथालय. नाशिक जिल्ह्यातला शालेय स्तरावरचा पहिलाच उपक्रम. वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून विलास सोनार यांनी सुरू केला. . सोनार, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे ग्रंथपाल. ”नवमाध्यमांमुळे वाचनसंस्कृती लोप पावली जात असल्याचा सूर सारखा ऐकायला मिळतो. मी पट्टीचा वाचकवेडा. नवमाध्यम आपली दुखरी नस होत असताना त्याचा वापर वाचनचळवळीचा प्रसार करण्यासाठी करायचं ठरवलं.” सोनार सांगत होते. 


ई बुक ग्रंथालयात १६०० हून अधिक पुस्तकं आहेत. यासाठी कुठलंही शुल्क नाही. उपक्रमांतर्गत व्हाट्स अप ग्रुपवर दररोज एखादी कथा, लघुकथा, कांदबरी, शोधनिबंध, पाककृती अशी कुठल्याही विषयाशी संबंधित पोस्ट टाकली जाते. महिन्यातून दोनदा वाचकांकडून सूचना मागवण्यात येतात. कधी पीडीएफ पुस्तक तर कधी ध्वनिमुद्रित पुस्तक पोस्ट केलं जातं. भ्रमणध्वनी हातात असेल तर अगदी इतर कामं करताकरताही ही पुस्तकं एकाच वेळी कुटुंबातल्या इतर व्यक्तीही ऐकू शकतात. पुस्तकातल्या फॉंटचा आकारही वाढविता येतो. अशा विविध वैशिष्ठयांमुळे दिवसागणिक वाचक संख्या वाढत आहे. वाचकांकडून वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांची मागणी होत आहे. दिवाळी अंकही ग्रुपवर पोस्ट करण्यात आले. सध्या पुलंचं ‘असा मी असामी’आणि वपुंचं कथाकथन देत असल्याचं सोनार सांगतात. 
सुरुवात शाळेपासून झाली. आता हा उपक्रम नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थापातळीवर सुरू आहे. संस्थेच्या विविध व्हॉट्स ग्रुप वर सोनार यांनी उपक्रमाची माहिती देत लिंक पाठविली. अशा प्रकारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक यांच्यापर्यंत उपक्रम पोहोचला आहे. आता विद्यार्थ्यांनाही या माध्यमातून वाचनाची गोडी लागावी यासाठी शाळेच्या संकेतस्थळावरून पालकांसाठी हे ग्रंथालय लवकरच खुलं करण्याचा प्रयत्न असल्याचं सोनार सांगतात. 

-प्राची उन्मेष, नाशिक