आईच्या डोळ्यातील पाण्याने मिळवून दिले ओंकारला राष्ट्रीय पारितोषिक
घरी कांदा चिरतांना आईच्या डोळ्यात टचकन पाणी का बरे आले असेल? या जिज्ञासेपोटी बीड तालुक्यातील कुर्ला जिल्हा परिषद शाळेचा बालवैज्ञानिक ओंकार शिंदे याला त्या दिवशी रात्रभर झोपच आली नव्हती. त्याने शाळेतील विज्ञान शिक्षकांच्या मदतीने आपल्यातील जिज्ञासू वृत्ती आणि बालवैज्ञानिक जागा ठेवून कांदा कापतांना डोळ्यात पाणी येऊच नये म्हणून स्मार्ट चाकू तयार केला. याच त्याच्या स्मार्ट चाकूने दिल्लीत दोन महिन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पारितोषिक मिळवून दिलं आहे. आता हा लहानगा बालवैज्ञानिक काही महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जानेवारीमध्ये जपानमधील टोकीओ येथे जाणार आहे. विशेष म्हणजे आता भारत सरकारच्या नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने त्याच्या स्टार्ट चाकूची पेटेंटसाठी नोंदणी केली आहे. पेटेंट मिळाल्यांनतर भविष्यात कमी वयातील मराठवाड्यातील पहिला शास्त्रज्ञ होणार आहे.
दिल्ली येथील प्रगती मैदानावर सप्टेंबर महिन्यात यंदाचे राष्ट्रीय इन्स्पायर अॅवार्ड प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनासाठी देशभरातून ५ लाख ६७ हजार नावीन्यपूर्ण आयडिया आल्या होत्या. तर राज्य स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर ५८५ नाविन्यपूर्ण आयडिया होत्या. त्यात या प्रदर्शनासाठी सुपर सिक्सटी आयडिया निवडण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पारितोषिक पटकावले असून त्यात सहावीत शिकणारा ओंकार शिंदे हा राष्ट्रीय पारितोषिक पटकावणारा सहावा विद्यार्थी ठरला आहे. त्याला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
ओंकारचे विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे म्हणाले, की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलातही प्रचंड टॅलेंट आहे. गरज आहे ती ते टॅलेंट शोधण्याची आणि त्याला योग्य ती दिशा देण्याची. माझ्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सहा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकले असून हाच माझ्यासाठीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आहे. या पुढेही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर कसे यश मिळेल यासाठी काम करणार आहे.
कांदा कापत असतांना जर अचानक घरात वीज पुरवठा खंडीत झाला तर चाकुवरील एलएडी लाईट सुरू होतो. त्यामुळे कांदा कापतांना हाताला इजा होत नाही. या स्मार्ट चाकूत चार्जिंग युनिट आणि चाकू वेगळा करता येतो. त्या मुळे हा चाकू स्वच्छ धुता येतो. त्याच बरोबर त्याची घडीसुध्दा करता येते. आणि तो कुठेही जाताना जवळ बाळगता येतो. मोबाईलच्या चार्जरने तो चार्ज करता येतो. चार्जिंग पूर्ण झाल्याची सूचना इंडिकेटरच्या सहाय्याने मिळते. एकदा चार्ज केल्यांनतर हा चाकूने पाच ते सहा किलो कांदा सहज कापता येतो.
28 मार्च, 2022 रोजी नवी उमेदवर आईच्या डोळ्यातलं पाणी कायमचं थांबलं! ही ओंकारची स्टोरी नवी उमेदवर प्रसिद्ध झाली होती. त्याची लिंक –
– दिनेश लिंबेकर, बीड

Leave a Reply