मोठी माणसं घरी आली आणि आम्ही पुन्हा लहान झालो

माझ्या घरी सध्या शून्य ते सहा वयातली तीन मुलं आहेत. सात महिन्याचा असीम, साडेचार वर्षांची मनवा आणि सहा वर्षांचा ओजस. प्रत्येकाचं एकमेकांशी नीट जमावं यासाठी आम्हांला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. पण, आपण घरात का कोंडले गेलोय याबद्दल ओजसला बरेच प्रश्न पडतात. “मला माझ्या एवढ्या मुलांशी खेळायचंय” ओजसने अजिजीने सांगितलं तेव्हा मनातली भिती, दडपण थोड्या वेळासाठी दूर करून आम्ही त्याला खाली नेलं होतं. एप्रिलच्या शेवटापर्यंत कोरोनाच्या बातम्या फक्त ऐकतच होतो. एप्रिलमध्ये मात्र त्याचा चटका आम्हांला लागला आणि मृत्यूशी तिघांपैकी दोन मुलांचा संपर्क आला.

साडेचार वर्षांची मनवा अचानक आपल्याकडे का आली? ती किती दिवस राहणार? कायमचीच आपल्याकडे राहणार का? असे प्रश्न ओजसच्या मनात होतेच. एकीकडे, आपल्याला एक खेळगडी मिळाल्याचा आनंद ओजस आणि मनवाच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. पण, याची पार्श्वभूमी म्हणजे माझा मित्र, मोठा दीर राम घोडकेचं कोविडमुळे बरं होता होता अचानक जग सोडून जाणं. राम गेला आणि एक आख्खं कुटुंब उध्वस्त झालं. त्याच्या पत्नीचं अपुरं शिक्षण, त्यामुळे अर्थार्जनाचं साधन नाही. अशात, रामच्या जागी नोकरी लागण्यासाठी धावपळ करणं, मुलीला शळेत घालणं, आईबाबा रामसोबत रहात असल्याने त्यांना सावरणं अशा अनेक जबाबदाऱ्या अचानक आमच्या खांद्यावर आल्या. रामचा मोडलेला संसार मार्गी लावायचा निश्चय करून त्या सर्वांनीच आमच्याकडेच कायमचं राहायला यायचं आम्ही सुचवलं. तसं ते यायला तयार झाल्यावर मात्र आम्ही ओजसच्या मानसिक तयारीला लागलो.
तो दिवस अजून माझा थरकाप उडवतो. कोविड सेंटरमधून राम गेल्याचं समजलं आणि मी हर्शददादाला आमच्या सर्व मित्र-मैत्रिमींना कळवण्याची विनंती केली. त्याने ती चोख बजावलीसुद्धा. पण, झालेला परिणाम भयानक होता. “खरंच का राम गेला?”, “हॅलो भरत, एक न्यूज कन्फर्म करायची होती, राम…?” अशा फोन्सने आम्ही त्रस्त झालो. डोळ्यात अश्रू आणि गळ्यात हुंदके कोंडले असताना हा अनुभव खूपच वेदनादायी ठरला.
आम्ही का रडतोय हे ओजस सारखंच विचारत होता. मला रडताना पाहून तोही रडायला लागला. मी त्याला काय झालंय ते सांगण्याचा प्रयत्न केला पण शब्दच उच्चारता आले नाहीत. एकीकडे आमचं दुःख, मग इस्पितळातल्या कामांचा फोनवरून आढावा घेणं, ओजस आणि असीम अशा दोन टोकाचे भेद असलेल्या लहान मुलांना सांभाळणं आणि त्यात विचित्र कॉल्सला उत्तरं देणं. आम्ही मानसिक ताणाच्या डोंगराखाली अडकल्यासारखे झालो होतो. या घटनेमुळे बदललेली समीकरणं जेव्हा खरोखरीच मांडायची वेळ आली तेव्हा ओजसला आम्ही रामकाका गेल्याचं सांगितलं.
“म्हणजे आता पण रामकाकाला कधीच बघू शकणार नाही? त्याचा आवाज आपण कधीच ऐकू शकणार नाही? तो मला फक्त फोटोतच दिसेल का?” आता त्याच्या प्रश्नांनी माझा बांध फुटला. मी गदगदून रडले. पण, हे समजावताना रामच्या मुलीशी मनवाशी खेळणी शेअर करणं, तिला लिहायला, वाचायला शिकवणं, तिच्याशी रामकाकाबद्दल मुद्दाम विषय काढून न बोलणं, ती बोललीच तर तिला तुझा पप्पा देवाघरी गेलाय अशा अर्थाचं काहीच न बोलणं हेही त्याला मुद्दाम सांगितलं.
मनवा घरी आली. रुळली. भावाबहिणींचं छान जमलं. भांडत, खेळत होते. माझी मम्मी त्यांना गोष्ट वाचून दाखवत होती. त्यात कोणीतरी देवाघरी गेल्याचा संदर्भ आला आणि मनवा बोबड्या बोलाने म्हणाली, “आजी, माझे पप्पापण देवाघरी गेलेत.” ओजस ताबडतोब उठला न् धावत भरतकडे गेला. त्याच्या गळ्यात पडून कानात म्हणाला, “पप्पा, मनवाला माहिती आहे की, तिचा पप्पा देवाघरी गेलाय. तिने आजीला सांगितलं.” त्याची समज दाद देण्यासारखी वाटते. तिच्यासमोर सांगायचं नाही, बोलायचं नाही हे त्याने किती नीट समजावून घेतलंय हे आम्हाला समजलं.
मनवा आल्यापासून ओजस आणि ती घर घर खेळतात. ओजस मम्मा होतो, मनवा लहान मुलगी आणि भरतला ती तिचा पप्पा बनवते. त्याला मधेच जाऊन मिठी मारते आणि माझे पप्पा म्हणून त्याच्या अंगावर लटकते. तिचं भावविश्व जपण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहोत. पण, कोविडने आमच्या मुलांना दिलेला हा धडा कठोर ठरलाय हे मात्र नक्की. राम गेल्यावर जवळपास महिन्याभराने मोठी माणसं घरी आली आणि मी आणि भरत पुन्हा लहान झालो.
– अनुजा संखे

Leave a Reply