हेही दिवस ही निघून जातील
मी त्वचा रोगतज्ञ आणि लेसर कन्सल्टंट म्हणून धुळे इथं प्रॅक्टिस करते. मला दोन मुली. मोठी अवनी तेरा वर्षाची तर धाकटी रेवा आठ वर्षाची. सगळं सुरळीत सुरु असलेल्या आमच्या आयुष्याला अचानक आलेल्या कोविड साथीने वेगळंच वळण दिलं. मुलं घरी, मुलांची शाळा घरी, मुलांचं playground घरी, मुलांचं सगळं जगच घराच्या चार भिंतीमध्ये बंद झालं.
सुरवातीला दोन तीन महिने मुलांना त्यातही मजा वाटली. तशी मजा त्यांनी केलीही. खरं सांगायचं तर मी ही थोडी निवांत झाले. कारण पहिल्यांदाच धावपळीतून थोडं सुटल्यासारखं झालं होतं. पण दिवसामागून दिवस जायला लागले आणि परिस्थिती मात्र आहे तशीच राहिली. हळूहळू मुलांचा टीव्ही बघायचा वेळ वाढू लागला. छोटीचं मोबाईल बघणंही वाढलं. आता मात्र काळजी वाटायला लागली. मग आम्ही गच्चीवर झाडं लावायला सुरुवात केली. रेवाला हे आवडलं. त्यामुळे ती लगेच सहभागी झाली. कुंड्यांना भोकं पाडणे, माती भरणे, बी लावणे, नवीन झाडाची वाट पाहणे या सगळ्यात ती गुंतून गेली. झाडांना छान फुलंही आली. मग भाज्या लावल्या. हे सगळं प्रत्यक्ष करताना त्यांचा खरंतर सायन्सचा सरावच झाला होता. फुलांच्या मागे फुलपाखरं आली आणि त्यांच्या संपूर्ण जीवनचक्राचा अभ्यास आणि आनंद सगळ्यांनाच मिळाला. वेगवेगळे पक्षी, त्यांची नावं, त्यांचा जीवनक्रम याचे वाचनही वाढले. रेवा हे सगळे ती तिच्या शब्दात लिहू लागली. चित्र काढू लागली. त्यामुळे तिचा बराच वेळ सद्कारणी लागला. आमच्यातलं संभाषण वाढलं. आता मी खरीखरी निवांत झाले.
मोठी जरा वेगळी. ती काही यामध्ये रमली नाही. शिवाय तिला तिच्या अभ्यासाचीही चिंता होतीच. तिला प्रसन्न ठेवणंही महत्त्वाचं होतं. तिला इंग्लिश गाण्यांची आवड. मग मीही तिच्यासोबत ही गाणी ऐकू लागले. हळूहळू अभ्यास ही सुरु झाला. टीनएजमधली महत्त्वाची गोष्ट कोणती तर ती संभाषण. त्यामुळे बाकी काही केलं नाही केलं तरी रोज तिच्यासोबत काहीतरी बोलत राहायचे. गप्पा मारता मारता घरातल्या कामातही अवनी मदत करू लागली. मी पाहिलेले रुग्ण, तिच्या ऑनलाईन शाळेच्या गमती जमती, तिच्या आजोबा, पणजोबांच्या गोष्टी, जागतिक युद्धाच्या काळातलं लोकांचं आयुष्य, कोविडकाळातील प्रश्न अशा कुठल्याही विषयावर आमची चर्चा व्हायची. तिचा आत्मविश्वास टिकून ठेवणंही मला महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळे शक्य होईल तेव्हा शाळेच्या कार्यक्रमांमध्ये तिला भाग घ्यायला प्रोत्साहन देत गेले.
असे बरेच चढउतार पार करत, वळणं घेत दीड वर्ष आता उलटलं आहे. हे सगळं कठीण आहेच, पण पर्याय सध्या तरी काही नाही. त्यामुळे संयम, सकारात्मक विचार आणि प्रार्थना या सगळ्यामुळे वाटतं की “हेही दिवस ही निघून जातील!!”
– डॉ. प्रीती अभिजित शिंदे.

Leave a Reply