आनंदाची जत्रा
नुकताच मला तिसरा महिना लागला आणि मी केयाला टॉप सिक्रेट सांगितलं. “केडाम्मा, घरात आता लहान बाळ येणार तुझ्याशी खेळायला. आता तू मोठी ताई होणार…” मॅडम जाम खूष!! मी बाळासोबत असं खेळणार, माझ्या वस्तू देणार, मी त्याचा मेकअप करणार, शाळेत घेऊन जाणार, माझ्या सायकलवरून फिरवणार, माझ्यातला खाऊ देणार वगैरे तिची स्वप्नं चालू झाली. तिचं हे स्वप्नं रंजन तिने बातमी कळल्यावर दोन दिवसात तिच्या डायरीत लिहून काढलं. तिच्या डायरीतल शेवटचं वाक्य म्हणजे ‘मला भाऊच पाहिजे’ असं होतं.
त्याच आठवड्यात लॉकडाऊनची बातमी आली आणि केयाला शाळेतही सुट्टी लागल्याचा अतीव आनंद झाला. तिच्यासाठी दोन आनंदाच्या बातम्या एकामागून एक मिळाल्या. सुट्टी आहे आणि आईच्या पोटातून बाळ यायला अजून वेळ आहे तोपर्यंत आपल्याला सोसायटीत दिवसभर खेळायला मिळेल या बिचारी आशेत होती. लॉकडाऊन म्हणजे काय हे समजावून सांगितल्यावर तिची आशा धुळीस मिळाली.
पहिला आठवडा एवढ्या रिकाम्या वेळेत काय करायचं हे ठरवण्यात गेला. बाळ येणार म्हटल्यावर मॅडमने तिच्या भावलीचे कपडे, तिने शिवलेले भावलीचे फ्रॉक, चड्डी माझ्या कपाटात आणून ठेवलं. बाळ यायला अजून उशीर आहे हे कळल्यावर आता काय करायचं हे ठरवण्यात तसाच एक आठवडा गेला. माझी कामं एकीकडे सुरू होती. वसतिगृहात चार महिन्याचं धान्य आणून ठेवलं, सिलेंडरची नोंदणी करून ठेवली. मुलींना आणि मुलांना प्रत्यक्ष भेटून कुणीही कुठेही जायचं नाही अशी मी त्यांना वारंवार तंबी देत असल्याने तिलाही आता लॉकडाऊनच गांभीर्य लक्षात यायला लागलं. चिडचिड, मैत्रिणी भेटत नाही, बाहेर खेळायला मिळत नाही म्हणून काहीवेळा रडारड यात दोन आठवडे गेले. मग मॅडमचा मोर्चा गोष्ट वाचन, कागदांचा खेळ, भावलीशी खेळणं, मला फारसं वाकून काम करायला न देणं, माझी काळजी घेणं असं चालू झालं. बाबा रोज तिच्यासाठी काहीतरी क्रिएटिव्ह खेळ शोधायचा आणि ते तिच्याशी खेळण्यात काही तास तिला एंगेज करायचा. याच दरम्यान लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या बालगृहातील तीन मुली घरी रहायला आल्या. नंतर युट्युबवरच्या नव्या रेसिपी करणं, मला खायला घालणं, त्या रेसिपी लिहून काढणं, पुन्हा त्या करून पाहणं, मुलींसोबत पत्ते, घरातल्या टाकाऊ गोष्टींपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे उद्योग, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालून नीट कपाटात ठेवणं अशी घरातील ही रोजच्या कामांची यादी आम्ही एव्हाना तयार केली होती. घरात इतके लोकं असल्याने माझ्या गरोदरपणाचे विशेष लाड केयाने आणि वसतिगृहातील मुलींनी केले. अगदी डोहाळ जेवणाचा इव्हेंट ही या मुलींनी मस्त पार पाडला. इव्हेंटचं रितसर प्लॅनिंग आणि सूत्रसंचालन करण्यात केयाचा हात कुणीही धरू शकणार नाही, हा एक नवाच पैलू आमच्या लक्षात आला. तिने घरात खेळता येतील असे अनेक खेळही शोधून काढले. मॉल-मॉल, हॉटेल-हॉटेल, डॉक्टर वगैरे तर ती खेळत होतीच पण त्यातला मला आवडलेला खेळ म्हणजे ‘खुल जा सिम सिम’. घरातल्या हरवलेल्या वस्तू सापडून देण्याच्या तिच्या भन्नाट दुकानाच्या खेळाला आमच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. माझ्या हरवलेल्या चपला, कानातल्यांचे जोड, बाबाचा मोबाईल चार्जर, हेडफोन, नेलकटर, नॅपकिन्स, तिची हरवलेली गोष्टींची पुस्तकं, काही भांडी असं बरंच काही तिने आमच्याकडून पैसे घेऊन(खोटेखोटे पैसे) शोधून दिलं होतं. हा खेळ तीन चार आठवडे सहज चालला.
तिच्या पिगी बॅंकेतले पैसे आईच्या डोहाळ जेवणाच्या गिफ्टसाठी संपले होते. आता पिगीमध्ये पैसे कसे येतील? यावर तिने घरात ‘आनंदाची जत्रा’ भरवली. या जत्रेत तिने तयार केलेल्या कागदांच्या, जुन्या कापडाच्या पिशव्या, भावलीचे फ्रॉक, पिपाणी, टाकाऊ गोष्टींपासून केलेल्या क्लिप्स हे सगळं विकायला ठेवलं होतं. जत्रेतल्या खोलीत प्रवेश करताना एन्ट्री फी, त्याचा पास, त्या पासच्या आधारावर जत्रेतले काही खेळ मोफत, काही वस्तूंवर सवलती असं बरंच काही होतं. तिने बनवलेली भेळ, सरबत, मी बनवलेला पातळ पोह्याचा चिवडा हे खाद्यपदार्थ त्या जत्रेत आपण विकत घेऊ शकत होतो. घरातला सिंथेसायजर, इलेक्ट्रॉनिक तानपुरा, तबला, तिने फुग्यापासून तयार केलेलं वाद्य हे सगळं या जत्रेत 5 रुपये देऊन वाजवायला मिळत होतं. रिंग टाकून हवी असलेली वस्तूही त्या जत्रेत मिळत होती. बापरे! या जत्रेत माझ्याकडून, बाबांकडून तब्बल 233 रुपयांची कमाई तिने केली. वसतिगृहातील तायांना मात्र सर्व खेळ मोफत होते. त्याबदल्यात तिने एकीकडून जत्रेत एक स्वयंसेवक ठेवला होता, तिच्या जत्रेतील माहिती सांगण्यासाठी.
बाळ घरी आल्यावर तर केडूच्या आनंदाला उधाण आलं होतं. कारण तिला भाऊच मिळाल्याचा आनंद खूप मोठा होता. बाळाच्या छोट्या छोट्या कामात मदत करते. ही तिची मदत आमच्यासाठी खूप मोठी आहे. त्यात आम्हाला झालेला कोरोना. हे सगळं तिने खूप धीराने घेतलं. त्या दरम्यान बाळाचं, बाबाचं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणं, माझी तारांबळ, आईबाबाला सोडून तायांसोबत राहणं, 15-20 दिवस खूप टेन्शनमध्ये गेले, तरी ती घाबरली नाही.
एव्हाना केयाला लॉकडाउन का, कशासाठी हे चांगलं लक्षांत आलं आणि घरात एवढया गोष्टी करता येतात हे माहीत झाल्याने आता ती घरीच राहणं पसंत करते. बाळासोबत खेळ, अभ्यास, शाळा, अभ्यास, पुस्तकं वाचण्यात, वेगवेगळे खेळ खेळण्यात ती वेळ घालवते.
– गायत्री पाठक पटवर्धन

Leave a Reply