संवादाचा मास्क

गेल्या वर्षभरापासून बाहेर जाताना नाका-तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, हे आपल्या सर्वांना कळलं आहेच. पण मास्कच्या वापरामुळं आपल्या सभोवतालच्या काही व्यक्तींना संवाद साधण्यात, समजून घेण्यात अडचणी येत आहेत. कर्ण आणि मूकबधीर व्यक्ती समोरच्याचं बोलणं समजून घेण्याकरता ओठांच्या हालचाली वाचत असतात. पण मास्कमुळे या संवादात अडथळे येतात. पुण्यातील चित्रकार चिंतामणी हसबनीस यांच्या हे लक्षात आलं. ‘मास्कलाच एखादी खूण असेल तर मास्क लावलेल्या व्यक्तीशी वेगळ्या पद्धतीनं संवाद साधायचा आहे’ हे समोरच्या व्यक्तीला चटकन कळू शकतं, असा विचार त्यांनी केला. फेब्रुवारीत त्यांनी विशिष्ट खूण असणारं मोठ्या आकारातलं स्टिकर तयार केलं. विशेष गरज असणाऱ्या ओळखीतल्या लोकांना त्यांनी ही स्टिकर्स दिली.

‘दृष्टीबाधित व्यक्ती, स्पर्श आणि कोरोना’ या विषयावर हसबनीस यांचं मे महिन्यात रेडिओवर व्याख्यान झालं. काही दिवसातच त्यांच्या लक्षात आलं की, स्पर्श करायचा नसल्यामुळं दृष्टीबाधितांना अडचणी येतात. त्याप्रमाणंच मूक आणि कर्णबधीर व्यक्तींकरता मास्क सुरक्षित आहे, पण गैरसोयीचाही आहे. त्यातूनच मग हसबनीस यांना ऐकू न येणाऱ्या व्यक्तींच्या मास्कवर स्टीकर लावण्याची कल्पना सुचली. हा स्टीकर मास्कवर असणाऱ्या व्यक्तीची अडचण सामान्य व्यक्तींना कळेल आणि त्यानुसार त्यांच्याशी संवाद साधेल. कानाचं चित्र आणि त्यावर तिरपी रेघ असं साधं सुटसुटीत चित्र या स्टिकरवर आहे. त्यातून लगेच लक्षात येतं की, या व्यक्तीला ऐकू येत नाही. असा विशेष मास्क वापरणाऱ्या व्यक्तींशी आपण जरा काळजीपूर्वक वागण्याचा, त्याला एखादी गोष्ट नीट समजेल अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करू. सुरवातीला हसबनीस यांनी स्टिकर्स काही ओळखीच्या संस्था, शाळा आणि व्यक्तींना वापरायला दिली. यातून लक्षात आलं की, मास्क धुताना हे स्टिकर्स काढावे लागत असल्याने त्याचं गम जाणार. जर हे चित्र कापडी मास्कवर छापलं तर जास्त सोयीचं होईल. त्यामुळं हे चित्र कापडी मास्कवर छापायला त्यांनी सुरूवात केली. नफ्याचा विचार न करता हसबनीस आणि मास्क बनवून त्यावर प्रिंट करणारे व्यावसायिक हे विशेष मास्क बनवत आहेत.

हसबनीस यांना ही कल्पना सुचली त्यामागे त्यांची संवेदनशीलता आणि चित्रंच आहेत. हसबनीस यांची चित्रकारीताही वेगळी आणि विशेष आहे. दृष्टीबाधित व्यक्तींना चित्रांचा आनंद घेता येईल अशी विशेष चित्र ते गेली 6-7 वर्ष काढत आहेत. या चित्रांना स्पर्श करून दृष्टीबाधित व्यक्तींना ही चित्रं पाहता येतात. यामुळे चित्र या दृश्य माध्यमाचा आनंद त्यांनाही घेता येतो. दृष्टीबाधित व्यक्ती त्यांना कळलेल्या चित्रांचा अर्थ डोळसांना सांगतात. हा अर्थ हसबनीस हावभाव आणि खुणांच्या सहाय्यानं मूक आणि कर्णबधीर व्यक्तींना समजावून सांगतात. अनेक विशेष शाळांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये ते हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमामुळं आपल्यालाही चित्र समजू शकतं याचा आनंद आणि समाधान या व्यक्तींना मिळत आहे. आता यापुढं कान आणि त्यावर तिरपी रेघ असं चिन्ह असलेला मास्क कोणी बांधला असेल तर, त्यांच्याशी संवाद साधताना विशेष काळजी घ्यायची हे आपण सर्वांजण नीट लक्षात ठेऊ.

तुम्हांला हे विशेष मास्क हवे असतील तर चिंतामणी हसबनीस यांना मेसेंजरमध्ये संपर्क करा. वाजवी दरात ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

– साधना तिप्पनाकजे

Leave a Reply