नागपूर जिल्ह्यातला पारशिवणी तालुका. इथलं जेमतेम 450 लोकसंख्येचं गरंडा गावात. गावातल्या गरंडा जिल्हा परिषद शाळेत 2018 साली खुशाल मधुकर कापसे सरांची बदली झाली. या शाळेत सरांनी संविधान स्तंभ उभारला, संविधानाची ओळख लोकांना, विद्यार्थ्यांना कशी करून दिली, त्याची ही गोष्ट.
ज्या संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला संविधानापासून सामान्य माणूस दूरच राहिला. प्रास्ताविकेच्या वाचनातून शालेय स्तरावर फक्त संविधानाची ओळख होते. अशा परिस्थितीत गरंडा जिल्हा परिषद शाळेतील कापसे सरांनी भारतीय संविधान स्तंभ उभारण्याची संकल्पना मांडली आणि लोकांनी त्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाचा कोणताही निधी नसतांना लोकसहभागातून भव्य असा संविधान स्तंभ शालेय परिसरात निर्माण केला.
श्रमदानातून 7 फूट रुंद आणि 15 फूट उंच असा हा संविधान स्तंभ आहे. 3 फूट बाय 5 फूट आकाराच्या काळया रंगाच्या ग्रॅनाईटवर सोनेरी रंगात प्रास्ताविका कोरली आहे. स्तंभाच्या वरच्या भागात दीड बाय दोन आकाराच्या ग्रॅनाईटमध्ये कोरलेली भारतीय राजमुद्रा बसविली आहे. खालच्या बाजूस “संविधान कितीही चांगले असले तरीही राबविणारे माणसे चांगली नसतील तर ते संविधान वाईट ठरते. आणि संविधान कितीही वाईट असले तरी राबविणारे माणसे चांगली असतील तर ते संविधान चांगले ठरते.” हा संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला इशारा ग्रॅनाईटवर कोरून बसविला आहे. अशाप्रकारे शासनाचा कोणताही निधी नसतांना जवळपास एक लाख रुपये बांधकाम मूल्य असलेला हा संविधान स्तंभ गरंडा सारख्या छोट्याशा गावात उभारणे ही बाब सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
संविधानाची ओळख व जागृती विद्यार्थी जीवनापासूनच व्हावी या उद्देशाने खुशाल मधुकरराव कापसे सर गेल्या बारा वर्षापासून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जागर सविधानचा’ हा उपक्रम घेत आहेत. 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. “२६ नोव्हेंबर – संविधान दिन ते २६ जानेवारी – गणराज्य दिन” असा ‘जागर संविधानाचा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम २६नोव्हेंबर २००८ पासून कापसे सरांनी सुरू केला.
या काळात विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केलं जातं. भारतीय संविधान प्रास्ताविक पाठांतर स्पर्धा, संविधानावर आधारित घोषवाक्य लेखन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वकृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधान जागृती केली जाते.
विद्यार्थी, शिक्षक व समाज याकरिता कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या ‘वेध प्रतिष्ठान’ नागपूरचे खुशाल कापसे हे सचिव म्हणून आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून वेध प्रतिष्ठानद्वारे सन २०१५ मध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला शिक्षकांच्या माध्यमातून वाणाच्या स्वरूपात एक हजार घरांमध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाटप करण्यात आले. २०१५-१६ मध्ये पं. स.भिवापूर व कुही मधील जि. प.विद्यार्थ्यांसाठी संविधान प्रास्ताविक व राष्ट्रीय प्रतिकांवर आधारित ‘सामान्य ज्ञान स्पर्धा’ घेण्यात आली.
शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या पाऊलवाट फाऊंडेशन, पारशिवनी आणि महात्मा गांधी कला-वाणिज्य महाविद्यालय,पारशिवनी यांचे संयुक्त विद्यमाने गेल्या सात वर्षांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित सामन्य ज्ञान स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करीत आहे. जि. प.प्राथमिक शाळा, पारशिवणी इथं लोकसहभागातून शाळास्तरावर असणारा देशातील पहिला संविधान स्तंभ सन २०१५ मध्ये निर्माण केला.
सर म्हणतात, ” भारतीय संविधान हे धर्म, जात, पंथ, पक्ष या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार करते. तसंच संविधान हे भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. लोकशाहीचे प्रेरणा स्थळ म्हणून हा भारतीय संविधान स्तंभ उभारण्यात आला” असं संविधान स्तंभ निर्मितीचे संयोजक खुशाल मधुकरराव कापसे सांगतात.
सहकार्य -खुशाल टेकाडे, काटोल, नागपूर