मुलांच्या प्रश्नांना मुलांचीच उत्तरं!
कोविडनं मोठ्यांसह लहानांनाही घरात कोंडलंय त्याला आता दीड वर्ष झालं. शाळा बंद किंवा खरं तर फक्त ॲानलाईन, मित्र मैत्रीणींना भेटायला जायचं नाही, खेळायला जायचं नाही, बागा नाहीत, सुट्टीसाठी बाहेरगावीही जायचं नाही अशा परिस्थितीमुळे मोठ्या माणसांपेक्षा खरं तर लहान मुलंच जास्त कंटाळली आहेत. मोबाईलवरच्या शाळेत मित्र मैत्रीणी दिसतात पण त्यांच्याशी दंगामस्ती करता येत नाही. हे सगळं करोना साथीमुळे होतंय हे माहिती असलं तरी या साथीबद्दल, शाळेबद्दल परिक्षेबद्दल मुलांना प्रश्नही खूप पडलेत. त्यांची उत्तरं त्यांना त्यांच्याच मित्र-मैत्रीणींकडून मिळावीत म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेनं चाईल्ड हेल्पलाईन सुरु केली आहे.
या हेल्पलाईनसाठी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातल्या आठ शाळांमधून प्रत्येकी दोन मुलांची निवड झालीये. निगडीतील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या शंतनु रबडे आणि कनक कुलकर्णी यांनी हेल्पलाईनसाठी काम करण्याचा आपला अनुभव नवी उमेदला सांगितला. शंतनु म्हणाला, “या हेल्पलाईनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याबद्दल विचारलं तेव्हा मी आनंदाने तयार झालो. हेल्पलाईनवर आलेले फोन कसे घ्यायचे, मुलांशी कसं बोलायचं, त्यांचे प्रश्न आजाराबाबत असतील तर डॅाक्टर आणि शाळा, अभ्यास यांच्याविषयी असतील तर शिक्षक यांच्याकडे फोन ट्रान्सफर कसा करायचा याचं प्रशिक्षण आम्हाला दिलं. मास्क वापरायचा हे आपण मागच्या वर्षीपासून ऐकत आहोत. त्या प्रशिक्षणानंतर मास्क वापरण्याचं महत्त्व आम्हालाही अधिक चांगल्या तऱ्हेने समजलं. हेल्पलाईनवर फोन करणाऱ्यांच्या माहितीची नोंद ठेवणं. ज्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नाही त्यांना तसं सांगून दुसऱ्या दिवशी फोन करुन प्रश्नाचं उत्तर देणं हे आम्ही शिकलो आणि आता त्याचा वापर करत आहोत. शंतनु सांगतो, या हेल्पलाईनमुळे महापालिकेचे आयुक्त, शिक्षणाधिकारी अशा व्यक्तींच्या आम्ही संपर्कात आलो. त्यांच्याशी बोलायला मिळतं. त्यामुळे आपण खूप महत्वाचं काम करत आहोत याची जाणीव होते.”
कनक कुलकर्णी म्हणाली, “शाळा आणि अभ्यासाबरोबर इतर उपक्रमही महत्वाचे आहेत असं आई-बाबा नेहमी सांगतात. त्यामुळे हेल्पलाईनसाठी काम करायची तयारी दाखवली. आमच्या वयाच्या अनोळखी मुलांशी बोलणं, त्यांची अडचण, प्रश्न समजून घेणं आणि ते सोडवायला जमेल तशी मदत करायला मिळणं हा नवा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”
शंतनुची आई रुपाली रबडे म्हणाल्या, “कित्येक गोष्टी आपण समोरासमोर समजावून सांगू शकतो. पण फोनवर त्या कश्या समजावून सांगायच्या हे मुलांना सोप्या शब्दात सांगितलं गेलं. ‘दो गज दुरी’ आपण प्रात्यक्षिकातून सांगू शकतो पण फोनवर कसं सांगणार? अशा अनेक प्रश्नांबाबत उत्तरं देण्यासाठी सोप्या युक्त्या शिकवण्यात आल्या. मास्क कसे वापरायचे, तोंडावरील कुठल्या अवयवापर्यंत ते आले पाहिजे, ते वापरुन झाले की त्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने कशी लावायची हे सांगण्यात आलं.
हे ट्रेनिंग देणारे आधिकारी, डॅाक्टर यांनी मुलांना सहज बोलतं केलं. आता हे लिटिल वॅारियर्स महिनाभर हे कार्य नक्कीच यशस्वीपणे पूर्ण करतील असा विश्वास वाटतो.”
ज्ञानप्रबोधिनीचे प्रमोद सादुल म्हणाले, शालेय अभ्यासातलं प्रॅक्टिकलचं महत्व आपण जाणतो.
नागरिकशास्त्र आणि समाजशास्त्र अशा प्रॅक्टिकलमधून मुलं शिकत आहेत हे मला या
उपक्रमाचं वैशिष्ट्य वाटतं.
चाईल्ड हेल्पलाईन सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते 1 या वेळेत उपलब्ध आहे. 7768800333 किंवा 7768900333 या नंबरवर फोन करुन मुलं आपले प्रश्न विचारुन मदत मिळवू शकतात.
– के. भक्ती, पुणे

Leave a Reply