मागच्या वर्षी लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे शाळा, क्लास सगळं बंद झालं. आमच्या दोन्ही मुलींचं बाहेर पडणं एकदम बंद झालं. मोठी मुलगी साक्षी मागच्या वर्षी 10 वीत असल्यामुळे तिचे ऑनलाईन क्लासेस आणि अभ्यास यातून तिला वेळच मिळत नसायचा. अर्थातच तिला घरात बसून कंटाळा येण्याचा प्रश्नच नव्हता. एक गोष्ट खरी, की तिलाही शाळा, क्लास कधी सुरू होतात, आपण शिक्षक, मैत्रिणी यांना कधी भेटतो याची ओढ होती. परंतु लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. नंतर ऑनलाईन क्लासेसमुळे डोके दुखी, सतत मोबाईल वापरानं हात, डोळे दुखणं इ. त्रासांना सामोरं जावं लागलं. हे सगळं झालं तरी ऑनलाईन क्लासेस चालूच ठेवावे लागले. सध्या तरी त्याला पर्याय नाही. अध्ययनात कितीही अडचणी आल्या तरी मुलांनी वर्षभर ऑनलाईन क्लासेस करून त्यांच्या परीने 10 वी परिक्षेची तयारी केली होती. परंतु परिक्षाच रद्द झाल्यामुळे आमची साक्षी थोडी निराश झाली. परीक्षा देऊन मेहनतीने कष्ट करून ती परीक्षा पास होणे हा आनंद खूप मोठा असतो. परंतु कोरोनाने हा आनंद मुलांपासून हिरावून घेतला. मुलांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे, तेही एका दृष्टीने योग्यच म्हणावं लागेल.

धाकटी सिद्धी ही मागच्या वर्षी पाचवीत गेली. वर्षभर शाळा नसल्यामुळे अभ्यास नाही. सुरूवातीला तिला कंटाळा यायचा. बाहेर खेळायला जाता येत नाही. मामाच्या गावाला किंवा इतर कुठं बाहेर फिरायला जाता येत नाही, म्हणून ती थोडी चिडचिडी झाली होती. परंतु आम्ही काही पर्याय देण्याआधी तिनेच तिचा पर्याय निवडला. ती चित्रं काढू लागली. दिवसभर ती तिच्या चित्रांमध्ये रमत असे. आकाशदिवा, वेगवेगळे क्राफ्ट, चित्रे यामध्ये तिचा छान वेळ जाऊ लागला. फेसबुक तसंच व्हॉटसअॅपवर ही चित्रं अपलोड केल्याने अनेकांनी तिच्या कलेचं कौतुक केलं. त्यामुळे तिचा उत्साह वाढत गेला. या काळात तिनं घरातही बरीच मदत केली. झाडू मारणे, कपड्यांच्या घड्या करणे, लहान-सहान कामात मदत करणे या गोष्टी ती आवर्जून करते. लहान असल्यामुळे थोडी हट्टी आहे. त्यामुळे तिने सांगितलेलं साहित्य पेन, पेन्सिल, कलर्स, ड्रॉईंग पेपर वेळेत आणलं नाही तर ती खूप चिडते. घरातील टाकाऊ वस्तूंपासून तिने ख्रिसमस ट्री, फोटो फ्रेम, पेन स्टॅन्ड आदी कलाकृती अत्यंत कलाकुसर करून बनवल्या आहेत. मागच्या दिवाळीतही तिने पण पणत्यांवर छान रंगकाम केलं होतं. विशेष म्हणजे तिला हे कर ते कर असं सांगावं लागत नाही. ती हे सगळं स्वतःहून करते. घरच्या घरी तिने मास्क बनवला. टाकाऊतून टिकाऊ कसे बनवावे याचे विचार सतत तिच्या डोक्यात असतात. त्यानुसार ती वेगवेगळ्या वस्तू बनवत असते.
घराच्या परसबागेत सिद्धीने वेगवेगळी फुलझाडे लावली. मागच्या महिन्यात तिने आंबा खाऊन त्याची कोय लावली. आता तिथं उगवलेलं इवलंसे रोप पाहून तिला खूप आनंद झाला. त्या रोपाची ती खूप काळजी घेत असते. त्याला दररोज पाणी देत, त्याचं निरीक्षण करते. साक्षी स्वभावाने खूपच शांत आहे. ती ग्रीटिंग कार्ड खूपच छान बनवते. स्वच्छता व टापटीप तिला खूप आवडते. घरातील सर्व वस्तू, पुस्तकांची व्यवस्थित मांडणी करून ठेवते. साक्षी व सिद्धी दोघी चित्र खूप छान काढतात. सिद्धीला कोणता रंग कुठे भरावा हे बरोबर कळतं. शिवाजी महाराजांचे चित्र तिने खूप छान काढले आहे. लॉकडाऊनचा परिणाम सगळ्यांवर झाला आहे. घरात बसून लहान-मोठे सर्वजण कंटाळले आहेत. दोघी जणी त्यांचा वेळ थोडा टीव्ही पाहण्यात, थोडा अभ्यास आणि छंद जोपासण्यात घालवतात. पण तरी सिद्धीला कंटाळा आला की, ती मामाच्या गावाला औरंगाबादला जाऊया म्हणते. मागच्या लॉकडाऊनपासून तिने मामाकडे जायचं म्हणून खूप वेळेस हट्ट केला, परंतु इच्छा असूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तिला नेऊ शकलो नाही. त्यामुळे फोनवर मावशी आणि आजीशी बोलणं होतं.
– अनिता बाळासाहेब काळे, परभणी
Related