फटाके, लावायचे-फोडायचे नाहीत तर मातीत पेरण्याचे आणि त्यातून भाजी मिळवण्याचे. ग्राम आर्टने तयार केलेले. सेंद्रिय पद्धतीनं उगवलेला कापूस,त्याच कापसाच्या राख्या आणि आता दिवाळीनिम्मित सीड फटाके.
नागपूरपासून साधारण ६० किलोमीटरवरचं परादसिंगा. या गावात ‘ग्राम आर्ट’ नावाचा गट शाश्वत पद्धतीनं विकासासाठी काम करतो. अनेक शेतकरी,कलाकार,कारागीर, पुण्यामुंबईमधील तरुण या गावात जाऊन काम करतात. गटाचा बीजपर्व उप्रकम आहे. फटाके पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. सण साजरे करताना पर्यावरणप्रिय, समाजप्रिय मार्ग शोधण्याची मोहीम बीजपर्व. बीजपर्वने दोन वर्षापूर्वी सीड फटाके बनवण्याची सुरुवात केली. फटाके उडवू नका, ते वाईट असतात सांगण्यापेक्षा आपण वेगळ्या पद्धतीनं फटाक्यांचा आनंद घेऊ शकतो ही भूमिका घ्यावी, असं गटाला वाटलं .
सीड फटाके बनवताना जुना, रद्दीत गेलेला कागद वापरला जातो.शेती करताना गट मोठ्या प्रमाणात देशी बियांच संवर्धन करतो. बियांचा वापर फटाके बनवताना केला जातो. मायक्रोग्रीन लाल फटाक्याच्या माळेत लाल माठ,हिरवा माठ, कोथींबीर,मोहरी अशा ७ प्रकारच्या बिया असतात. कांदा – चकरी , सुतळी बॉम्ब, गोल्डन पाऊस, लक्ष्मी बॉम्ब, कोथींबीर टिकली,काकडी रॉकेट. प्रत्येक फटाका बनवताना बियांचा आणि फटाक्याच्या वापराचा संबंध लक्षात घेतला आहे.जसं की काकडीची वेल उंच वाढते म्हणून काकडी रॉकेट आणि चकरी ही जमिनीला फिरते म्हणून जमिनीत वाढणारे कांदा हे पीक.
या फटाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दारू वापरण्यात आली नाही. ते जाळण्याची आवश्यकता नाही.दिवाळीच्या दिवशी हे फटाके मातीत लावून आपण घरच्या घरी भाजी मिळवू शकतो. यामुळे नुसते पर्यावरणच नाही तर आपले आरोग्य सुधारण्यास मदत होईल असे गटातील सदस्य तन्मय सांगतात. बाजारातील फटाके आणि सीड फटाके दिसायला सारखेच आहेत. गावातील स्त्रिया, कलाकार मंडळी मिळून हे काम करतात.आता सात गावातील १०० स्त्रिया आणि गटातील सदस्य फटाके बनवत आहेत.स्त्रियांना घरचं काम सांभाळत हे काम करता यावे म्हणून त्यांना घरीच काम दिलं जातं. काम करताना कोणत्याही पद्धतीच्या विजेवर चालणाऱ्या यंत्राचा वापर केला जात नाही.
विविध उत्पादनातून मिळणारा पैसा गावविकासासाठी वापरण्यात येतो. उत्पादन विकत घेणाऱ्या व्यक्तींना उत्पादनाला लागणारा वेळ,खर्च, त्यातून मिळणारा नफा, वापरला जाणारा कच्चा माल याबाबत माहिती दिली जाते.उपक्रमाला पर्यावरण प्रेमींचा चांगला पाठिंबा मिळत आहे.
-संतोष बोबडे
Related