“घरातून निघून एवढे दिवस झाले, पण कुठेच काही त्रास नाही. उलट सगळीकडे स्वागतच झालं. खूप प्रेम मिळालं.” कमल गाला सांगत होता. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये त्याच्याशी भेट झाली. सायकलवरून ज्योतिर्लिंगांची यात्रा तो करतोय. सायकलिंग आणि व्यायामाचं महत्त्व, आरोग्य आणि कोरोनाबाबत जागृती, हा त्याच्या यात्रेचा मूळ उद्देश.

कमलनं गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला दिल्लीहून प्रवास सुरू केला. दिल्लीहून कोलकाता, नंतर कन्याकुमारी-केरळ- कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र. पुढे गुजरात-मध्यप्रदेश आणि शेवटी दिल्ली. कमल सांगतो, ”कोरोना काय आहे, त्याच्या संसर्गापासून बचाव कसा करायचा याची मी सखोल माहिती घेतली आणि मगच प्रवासाला निघालो. प्रवासाचा सर्व खर्च माझा मीच करतो पण ठिकठिकाणचे लोक चहा, नाश्ता आग्रहाने देतात. मंदिरे बंद आहेत, नियमावली कडक आहे त्यामुळे धर्मशाळांऐवजी मी हॉटेल, लॉजमध्ये मुक्काम करतो. पौष्टिक आणि स्थानिक अन्न खातो. फास्टफूड टाळतो. दररोज अर्धातास योगा करतो. सायकलिंग तर उत्तम व्यायाम आहेच. ज्या अपेक्षेने प्रवास सुरू केला होता त्याच्या कैकपट चांगले, समाधानकारक अनुभव मला आले. मीही माझ्या परीने कोरोनाबाबत जनजागृती करतो. रोजचा कोणताही व्यायाम कसा तुम्हाला फीट ठेऊ शकतो आणि आरोग्य चांगले राहिल्याने दवाखान्याचे पैसे कसे वाचतात हे पटवून देतो. शिवाय मला मंदिरांची आवड निर्माण झाल्याने तोही अभ्यास या मोहिमेतून करतो आहे. मंदिरे, तेथील धार्मिक वातावरण, लोक, त्यांचे जगणे, संघर्ष सारे काही जवळून अनुभवता येत आहे.”
सायकलिंगविषयी महाराष्ट्रात बराच उत्साह असल्याचं कौतुक तो करतो. दर 50 किलोमीटरवर एखादा तरी सायकलिंग ग्रुप स्वागताला असतो, त्यामुळे इतर ठिकाणांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त वेळ लागल्याचं कमल सांगतो. त्याच्या नियोजनानुसार आणखी साधारण 15-20 दिवसात त्याची यात्रा पूर्ण होईल.
3 वर्षांपूर्वी त्याने सायकलवरून चारधाम यात्रा केली. तेव्हापासून मंदिरांना भेटी देत अभ्यास करण्याची आवड निर्माण झाल्याचं कमल सांगतो.
– भाग्यश्री मुळे, नाशिक
Related