उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातलं कसबे तडवळे. इथं राहणाऱ्या मनीषा वाघमारे या तरूणीची ही गोष्ट. मनीषाला समाजकार्याची आवड. कोविडची साथ सुरू झाली तेव्हापासूनच मनीषाने जागृती ग्रुप, पुणे आणि होप फाऊंडेशनसोबत काम सुरू केलं. उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यांमध्ये गरीब लोकांना अन्नधान्याचं कीट वाटप केलं. तर यावर्षी तिने कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरवण्याचं काम स्वखर्चातून केलं. दिवसभरात दीडशेहून अधिक लोकांना 30 किमी गाडी चालवत तिने रुग्णालयात डबे पोहोचवले.
सुरुवातीला ती शंभर डबे देत होती. नंतर तिचं काम बघून लोकांनीच तिच्या कार्याला आर्थिक हातभार लावला. त्यामुळे जेवणाचे डबे वाढवण्यात आले. खरंतर मनीषाच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. १६ वर्षांपूर्वी तिच्या वडलांचे निधन झालं. आई अंबिका वाघमारे या चप्पल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय डगमगला तरीही त्यांनी अन्नदानाचं काम सुरू ठेवलं आहे. या कामात आईसोबत माया आणि तेजल या बहिणींची मदत तिला कायम मिळते आहे.
मनीषाच्या याच कामाची दखल डेटॉल या कंपनीने घेतली आहे. हँडवॉश उत्पादनावर ‘डेटॉल सॅल्यूट्स’ या शीर्षकाखाली मनीषाच्या फोटोसह तिने केलेल्या कामाची माहिती छापली आहे. मनीषा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. भविष्यात तिला अधिकारी व्हायचं आहे. पुण्यातील तिचे काही मित्रमैत्रिणी हे सामाजिक कार्यात योगदान देत असतात. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत मनीषाला समाजकार्याची आवड निर्माण झाली. संकटांना आणि परिस्थितीवर मात करत समाजकार्य करणार्या तिच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
– अमोल वाघमारे
Related